विखेंनी आठवलेंचा काटा का केला.! आम्हीही काटाच करणार कार्यकर्ते अंतर्गत बंडात! आता काटा लोखंडेंचा...!!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
रामदास आठवले यांना शिर्डीतून उमेदवारी देऊ नये अशा प्रकारचे पत्र विखे पा. यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना दिले होते असे रिपाई नेत्यांचे मत आहे. त्यामुळे, आठवले यांची इच्छा असून देखील आता त्यांना राज्यसभेवर आयत्या बिळात नागोबा प्रमाणे भाजपासोबत राहावे लागले आहे. मात्र, विखे यांना आठवले का नको आहे? याबाबत अनेक राजकीय विश्लेषकांनी मत-मतांतरे व्यक्त केली आहेत. त्यात सर्वात महत्वाची दोन कारणे फार वास्तववादी ठरली आहेत. पहिले म्हणजे डॉ. सुजय विखे जर निवडून आलेच तर त्यांना केंद्रात मंत्री करण्यासाठी ताकद पणाला लावावी लागणार आहे. त्यामुळे आठवले हे शंभर टक्के अडसर ठरले असते. कारण, समाज म्हणून त्यांना केंद्रीय राज्यमंत्री का होईना त्यांची बोळवण करावी लागलीच असती. त्यामुळे, एका जिल्ह्यातून उत्तर आणि दक्षिण असे दोन मंत्री करणे हे भाजपाला अशक्य झाले असते. त्यामुळे, हा प्रश्न निर्माण होण्यापुर्वीच तो समुळ नष्ठ झालेला बरा म्हणून आठवले यांना विखेंनी कडाडून विरोध केला आणि शिंदे गटाला प्राधान्य दिले. तर, दुसरी महत्वाची बाजु म्हणजे गेल्या वर्षभरात कोपरगाव, राहुरी आणि आश्वी या तीन ठिकाणी ऍट्रॅसिटीच्या कारणाहून प्रचंड रहाकाळ माजले होते. त्यात विखे यांना फार कडाडून विरोध झाला. त्यास केंद्रीय मंत्री आठवले यांनी हस्तक्षेप केल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली होती. त्यात विखे यांच्यापेक्षा आठवले यांचे वजन भारी भरले होते. त्यामुळे, हाताने दुखणे वाढवून घेण्यापेक्षा जिल्ह्यावरील पकड आणि आपल्या मुलाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी विखेंनी आठवले यांचा काटा केला असे बोलले जात आहे. त्याचा परिणाम येणार्या निवडणुकीत दिसेल असे कार्यकर्त्यांचे मत आहे.
इतिहास साक्ष आहे, पुत्र प्रेमापोटी आई-वडिल काय-काय करु शकतात. त्यामुळे, विखे कुटुंबाने जे केले त्यात काहीच गैर नाही. सन २०१९ मध्ये राधाकृष्ण विखे हे कॉंग्रेसकडून राज्याचे विरोधीपक्षनेते होते. पत्नी सुद्धा कॉंग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुलगा मात्र भाजपाकडून खासदारकी लढवत होता. त्यानंतर एक काळ असा आला की, विरोधीपक्षनेत्यांनीच गृहनिर्माण मंत्री म्हणून शपथ घेतली आणि राजकीय नैतिकतेचा पुर्णत: चोथा करुन टाकला. त्यामुळे, पुत्राच्या हाट्टापाई ज्यांनी कॉंग्रेस पक्षाचा काटा केला. त्याच व्यक्तीने रामदास आठवले यांचा काटा केला असे मत कार्यकर्त्यांनर व्यक्त केले. अर्थात याकडे राजकीय गणिमीकावे या दृष्टीने पाहिले तर त्यात गैर काहीच नाही. मात्र, सत्ता आणि राजकीय स्थैयासाठी एखाद्याचे राजकीय करियर दावणीला बाधायचे ही निती रिपाई नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे, त्याचे पडसाद आता उमटताना दिसू लागले आहे.
खरंतर, सामाजिक राजकिय गणित पाहिले. तर, रामदास आठवले यांना राज्यसभेवर घेऊन त्यांना मंत्रीपद दिले म्हणजे त्यांची ताकद भाजपा जाणून आहे. त्यामुळे, येणार्या काळात देखील त्यांना मंत्रीपद द्यावे लागणार यात तिळमात्र शंका नाही. अशात जर आठवले शिर्डीतून निवडून गेलेच असते, तर हमखास मंत्री होते. त्यामुळे, झाले काय असते, की सुजय विखे जर दुसर्यांदा खासदार झाले तर त्यांना मंत्री होण्याची प्रचंड ईच्छाशक्ती आहे. सध्या अमित शहा आणि राधाकृष्ण विखे यांचे चांगले आहे. त्यामुळे, सुजय विखे यांना लाल दिव्यास बसविणे सहज शक्य आहे. त्यामुळे, देशात नगर जिल्ह्यातून दोन मंत्री करणे म्हणजे भाजपाची राजकीय समिरणे बदलली असती. विखे यांना थांबावे लागु शकले असते यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे, आठवले यांच्यासाठी शिर्डीत पुरक वातावरण नाही अशा प्रकारचे पत्र विखेंनी भाजपाला दिल्याचे खुद्द आठवले यांनी देखील पुण्याच्या एका बैठकीत सांगितले होते.
रिपाईचा काय परिणाम होईल.!
विखे यांनी आठवलेंना डावलल्यामुळे ज्या पद्धतीने रिपाईचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्याचे पडसाद येणार्या काळात उमटताना दिसणार आहे. रिपाईचे कार्यकर्ते डॉ. सुजय विखे यांना मदत करतील असे चित्र सध्या तरी नाही. जसे शिर्डी २००९ मध्ये आठवले यांना पराभूत केल्यामुळे रिपाई नेते आणि बौद्ध समाजाने भाऊसाहेब वाकचौरे यांना पाडून सदाशिव लोखंडे यांना ताकद दिली होती. तसे आता निलेश लंके यांना ताकद देऊन रिपाईचे नेते व कार्यकर्ते सुजय विखे यांना पाडण्यासाठी दंड थोपटू शकतात. ही निवडणुक चुरशिची होणार आहे. कारण, २०१९ मध्ये अवघा एक महिना सुद्धा संग्राम जगताप यांना मिळाला नव्हता. तरी ४ लाख २३ हजार १८६ मते मिळाली होती. आता तर बराच काळ लंके नावाचे वादळ, त्यात पारनेर, राहुरी, कर्जत जामखेड येथे मजबुत पकड असून पाथर्डी, शेवगाव येथे सुद्धा चांगले वातावरण दिसते आहे. विशेष म्हणजे पवार व ठाकरे यांच्यावर झालेल्या राजकीय अन्यायाची देखील लाट मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे, ही निवडणुक वाटते तितकी सोपी मुळीच नाही. यात रिपाई नेत्यांचा वाटा विखेंना तोटा म्हणून सहन करावा लागण्याची शक्यता आहे. त्यात पर्याय म्हणून वंचित उमेदवार नसल्याने द्विधा मनस्थिती असलेले मागासवर्गीय मतदान लंकेंच्या पारड्यात पडेल असे जाणकारांचे मत आहे.
आठवले, वाकचौरेंनंतर लोखंडेंचा काटा...
सन २००९ साली रामदास आठवले यांनी कॉंग्रेसकडून उमेदवारी केली होती. तेव्हा आ. थोरात आणि ना. विखे यांनीच त्यांचा पराभव केल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांचा देखील काटा करण्यात आला. त्यांना शिवसेनेतून, कॉंग्रेस आणि भाजपा असा प्रवास करायला लावून त्यांचा देखील काटा केला. वाकचौरे यांना फार उशिरा राजकीय शहाणपण आले आणि त्यांनी विखे-थोरात वाट सोडून शिवसेना जॉईन केली. आता वेळ सदाशिव लोखंडे यांची आहे. तीन वेळा खासदार करुन संसदेत ज्येष्ठत्व देण्यापेक्षा ते घरी बसलेले कधीही चांगले अशी भुमिका देखील पाटील घेऊ शकतात. उद्याच्या काळात पुन्हा मंत्रीपदाच्या रांगेत दोन उमेदवार नको. म्हणून लोखंडे यांचा देखील पत्ता कट होऊ शकतो. कारण, अजून सुद्धा विखे यंत्रणा लोखंडे यांच्यासाठी सज्ज झालेली नाही. उलट उत्तरेतून दक्षिण काबीज करण्याचा शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे, आली रे आली आता तुझी बारी आली... अशा प्रकारचे वाक्य सोशल मीडियात फिरताना दिसत आहे.
वंचितला दक्षिणेत उमेदवार मिळेना.!
वंचितवर बी टिमचे आरोप वारंवार झाले, अर्थात यात किती तत्थ्य आहे देव जाणे.! पण, उत्तरेत वंचितने उत्कर्षाताई रुपवते यांना उमेदवारी दिली. त्यामुळे, भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयाचा झेंडा झुकता झाला आहे. मात्र, दक्षिणेत २०१९ नंतर दलित आणि अन्य मागासवर्गीय समाजाने विखे परिवाराला साथ दिल्याचे पहायला मिळते म्हणून तर ७ लाख ४ हजार ६६० अशा विक्रमी व ऐतिहासिक मतांनी विखे विजयी झाले. मात्र २००९ मध्ये भाजपा विजयी उमेदवाराला फक्त ३ लाख १२ हजार ४७ मते होती. तर २०१९ मध्ये दक्षिणेतून वंचितला फक्त ३१ हजार ८०७ मते होती. तुलनात्मक उत्तरेत वंचितला ६३ हजार मते होती. त्यामुळे, कोणती मते कोठे जातात याचे गणित देखील प्रत्येक पक्षाला माहित आहे. एकंदर आता उत्तरेत उमेदवार भेटला आहे. मात्र, दक्षिणेत सर्व उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन सुद्धा वंचितला अद्याप उमेदवार मिळाला नाही का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता उमेदवारीची अंतीम मुदत संपण्याच्या आत उमेदवार मिळाला म्हणजे बरे.! कारण, या बलाढ्य नेत्यांपुढे त्याने समाजात जायचे कधी, बुथ नियोजन कराचे कधी आणि प्रचार चिन्ह घरीघरी न्यायचे कधी? हा फार मोठा प्रश्न त्याला असणार आहे. जर वंचितला उमेदवार मिळाला नाही. तर, भाजपाला सोपेच जाणार आहे.