वाकचौरेंच्या गद्दारीचा ठपका पुसेना अन कार्यकर्ते सोबत येईना.! कॉंग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्ते अंतर्गत बंडखोरीत.!
- सुशांत पावसे
सार्वभौम(संगमनेर):-
लोकसभा निवडणुकीत रणधुमाळी सुरू झाली तेच ठाकरे गटाचे उमेदवार कोण?हा प्रश्न अनेकांना होता. बबन नाना घोलप यांना ठाकरे गटाकडून संपर्कप्रमुख म्हणुन शिर्डी मतदारसंघाची जबाबदारी दिली. त्यांनी हा मतदारसंघ पिंजुन काढला. महाविकास आघाडीकडुन आपली उमेदवारी करण्यासाठी त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले. मात्र, ठाकरे गटात दोन गट पडले. आणि बबन नाना घोलप यांचे पोस्टर भर चौकात जाळले. बबन नाना घोलप कसे पराभूत होतील आणि बंडखोर माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे कसे खासदार होतील हे मातोश्रीवर खेवरे नाना गटाने पटवुन दिले. यामध्ये सर्वात मोठा वाटा होता तो संगमनेरकरांचा. शेकडो गाड्या भरून मातोश्रीवर गेले भाऊसाहेब वाकचौरेंचा पक्ष प्रवेश केला.मात्र, निवडणुकीची वेळ आली तर हेच सैनिक कुठल्या बिळात लपले हे कोणालाच ठाऊक नाही. आज भाऊसाहेब वाकचौरेंसोबत कोणी आहे की नाही हाच शोध घेण्याचा विषय झाला आहे. वाकचौरेंची प्रमुख पदाधिकाऱ्यांची सभा झाली तर तेथील वादाचा व्हिडीओ व्हायरल करून त्यांनाच पाडण्याचा घाट काही सैनिकांनी केला असल्याची चर्चा होत आहे. तर व्हायरल ऑडिओ मधुन ठाकरे गटाची गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. ज्या वाकाचौरेंना संगमनेरात गद्दार म्हणुन हात उचलला, मारहाण केली त्यांनाच मतदान करण्याची वेळ आल्याने सैनिकांची देखील कोंडी झाली आहे.
खरंतर, जेव्हा 2014 साली मोदी लाट आली तेव्हा काँग्रेसचे दिग्गज लोक पक्ष सोडुन भाजपमध्ये जात होते, भाजपकडून खासदार होत होते. शिवसेना भाजप युती असल्याने मोठ्याप्रमाणात सेना भाजपा मध्ये येणाऱ्यांची संख्या होती. तेव्हा खा. भाऊसाहेब वाकचौरेंना दुर्बुद्धी सुचली आणि ते काँग्रेस मध्ये गेले. दोन मंत्र्यांवर इतका विश्वास ठेवला की, त्यांचा 2 लाख मतांनी दारुण पराभव झाला. अवघ्या महिन्याभरात सापडलेले उमेदवार खा. लोखंडे हे निवडुन आले. वाकचौरे येथेच थांबले नाही त्यांनी सेना सोडली तर काँग्रेस धरले, काँग्रेस सोडली तर भाजपा धरले,भाजपा सोडली तर पुन्हा उद्धव ठाकरे यांची सेना धरली. तर कधी अपक्ष त्यामुळे, ते आज इथे तर उद्या तिथे दिसतील. हा माणुस एका विचारांवर ठाम नाही. कार्यकर्ते टिकावता आले नाही. त्यामुळे, आपला माणुस आपल्यासाठी ही विश्वासहर्ता त्यांनी गमावली आहे. आज पुन्हा लढण्याची वेळ आली तर विश्वास कोणी ठेवायला नाही. त्यामुळे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी नवीन चेहरा शोधण्याची आवश्यकता होती. मात्र, काही सैनिकांनी मातोश्रीवर जाऊन खा. वाकचौरे हे पुन्हा निवडुन कसे येतील याचे गणितं सांगितली. त्यांचा पक्षप्रवेश केला. आज मैदानात लढण्याची वेळ आली तर ते कुठे दिसत नाही. अनेकांनी ना. विखे पाटील यांचे आश्रय घेतला आहे. त्यामुळे, ते निवडणूकीतून अदृश्य झाले आहे. ना.विखे पाटील पालकमंत्री असल्याने वैयक्तीक कामे, गावचे कामे, कोणाची रिकामे धंदे, घेऊन काही काँग्रेस, उ.बा. ठा सेनेचे लोक त्यांच्याकडे जात असल्याने त्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत केवळ बघ्याची भुमिका घेतली आहे.
दरम्यान, भाऊसाहेब वाकचौरे यांना निवडुन आणायची धुरा सर्वेतोपरी आ. थोरात साहेबांची आहे. कारण, ते सर्वात जेष्ठ व राज्याचे नेते आहेत. महाविकास आघाडीचे प्रमुख घटक आहेत. काँग्रेसला उमेदवारी मिळाली नाही म्हणुन ना. विखे पाटील त्यांच्यावर टिका करत आहे. जर पुन्हा खा. वाकचौरे पडले तर सर्व खापर हे आ. थोरात साहेबांवर फुटणार आहे. खरंतर, आ. थोरात साहेब यांनी उमेदवार ठरवणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. उत्कर्षा रुपवते यांनी काँग्रेसचा राजिनामा देत वंचितचा झेंडा हाती घेतल्याने शिर्डी मतदारसंघाचे गणिते बदले आहेत. त्यांनी वाकचौरे यांना अडचणीत आणुन अगदी पराभवाच्या उंबरठ्यावर आणुन ठेवले. त्यामुळे, आ.थोरात साहेबांना दिवस-रात्र एक करून प्रचार करावा लागणार आहे. आजतागायत काँग्रेसची यंत्रणा शिर्डी मतदारसंघात कुठे दिसुन आली नाही. एक सभा वगळता विशेष काही केले नाही. जेव्हा राहता तालुक्यातील गणेश कारखाना निवडणूक लागली तेव्हा तीन महिने अगोदर राहता तालुक्यामध्ये तळ ठोकला होता. दहशतीचे झाकण उघडणार अशी भाषणे करून मतदारांची मन जिंकली. विखे पाटलांचा संपूर्ण पॅनल पाडला. मात्र, लोकसभेला शिर्डी मतदारसंघात आज पर्यंत ते शांत आहे. खरंतर, काँग्रेसला उमेदवारी मिळाली नाही म्हणुन ते शांत आहे. की, खा. लोखंडे यांनी कधी त्रास दिला नाही म्हणुन यांच्यापेक्षा आहे तोच बरा.! याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, खा. वाकचौरे यांचे निवडणूक चिन्ह मशाल हे नवीन आहे. ते खेडेगावातील वाडी- वस्तीवर पोहचवणे ही तारेवरची कसरत आहे. तेच आदवासी भागात माहित नाही, तेव्हा मशाल लोकांना माहित कशी व्हायची हा मोठा प्रश्न आहे. त्यात हे महाशय कोणाला विचारात न घेता एकटेच फिरत आहे. हा मतदारसंघ मोठा आहे. तब्बल 17 लाख मतदान या शिर्डी मतदारसंघात आहे. त्यामुळे, प्रत्येकाची साथ त्यांना हवी. मात्र, पक्षातील अंतर्गत गटबाजी. त्यांनी कपडे बदलतात तसे पक्ष बदलुन स्वतःवर ओढवलेली नाराजी आणि गमविलेली विश्वासार्हता त्यामुळे, भाऊसाहेब वाकचौरे हे एकटे पडलेले दिसतात. बोटावर मोजण्या इतके सैनिक सोडले तर त्यांच्यासोबत कोणी दिसत नाही. खरंतर, यावर त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. खा. लोखंडे यांना धनुष्यबाण चिन्ह असल्याने चिन्हाचा फायदा त्यांना नक्कीच होईल. त्यातच वंचितचे उमेदवार उत्कर्षा रुपवते हे असल्याने बंडखोर माजी खा.वाकचौरे यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागेल की काय असे चिन्ह निर्माण झाले आहे. कारण, भाऊसाहेब वाकचौरे हे 2014 व 2019 साली पराभुत झाले. त्यानंतर श्रीरामपुर विधानसभेला देखील पराभुत झाल्याने ते आज्ञात वासात गेले. त्यामुळे, ऐन वेळेस त्यांना उमेदवारी दिल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सैनिकांमध्ये नाराजी आहे.