दोन गद्दार, एक कवीकार कोण होणार शिर्डीचा खासदार.!

सागर शिंदे 

सार्वभौम (अकोले) :- 

शिर्डी लोकसभा एससी राखीव असल्यामुळे उमेदवारांना काही कमी नाही. मात्र, जात प्रवर्गात देखील जातीय मतभेद निर्माण झाल्याने विविध पक्षांना उमेदवार देतांना मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. डोईजड उमेदवार नको, तो आर्थिक दृष्ट्या सक्षम, त्यात दगडापेक्षा विट मऊ, एससी समाजातील बड्या नेत्यांच्या मागे असणारे राज्यातील मतदान संभाळणे त्यात बौद्धांची बंडखोरी स्थानिक नेत्यांना कधी परवडत नाही. त्यामुळे, त्यांना मोठे करायचेच नाही, कानाखाचा माणूस हवा अशा अनेक संकल्पनांच्या गर्त्यात शिर्डीची उमेदवारी अडकून पडली आहे. मात्र, काही झाले तरी आ. बाळासाहेब थोरात किंवा ना. राधाकृष्ण विखे यांना मुजारा केल्याशिवाय कोणाची डाळ शिजते असे होत नाही. अन वरिष्ठांनी उमेदवार बळजबरीने लादलाच तर २००९ मध्ये कॉंग्रेसच्या सलगीने लढलेल्या रामदास आठवले यांचे काय झाले हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे, आता कॉंग्रेस, भाजप, शिंदे गट, दादा गट, पवार गट, ठाकरे गट शिर्डी लोकसभेच्या बाबत काय भुमिका घेतय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उत्कर्षाताई रुपवते यांची उमेदवारी.!

खरंतर आ.सत्यजित तांबे यांच्यासारख्या लढाऊ आणि अभ्यासू व्यक्तीप्रमाणे उत्कर्षा रुपवते आहेत. मात्र, कॉंग्रेसने रुपवते कुटुंबाची बाबुजींपासून कामय वाताहत केली आहे. निष्ठेच्या झाडाला प्रतिष्ठा मिळते मात्र फळ मिळत नाही माग त्याचा उपयोग काय? एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणारा हा मतदारसंघ जितका विखेंनी बांधला तितका थोरातांना बांधता आला नाही. कुरघोडीच्या राजकारणातून का होईना विखेंनी संघटन बांधून ठेवले तर आ.थोरात संगमनेर पुरते सिमीत राहून त्यांनी राज्याच्या राजकारणात स्थान निर्माण केले. त्यामुळे, शिर्डी लोकसभा कॉंग्रेसला मागताना देखील त्यांचा नाममात्र रेटा असतो. देशात भाजपाला रोखण्यासाठी राज्यात कॉंग्रेसला ज्या ठिकाणी बळ आहे तेथील जागा लढविणे गरजेचे वाटते. त्या यादीत शिर्डी लोकसभा फक्त स्वबळावर लढण्याची वेळ आली तरच उमेदवार हवा म्हणून बाहुले उभे केले जातात. वाटाघाटीत शिर्डी अगदी सहज सोडून दिली जाते. दुसरी बाजु म्हणजे मतदारसंघ बांधायला काही लोक ५ ते १० वर्षे खर्ची घालतात. मात्र, रुपवते यांना वेळ मिळेल तसा आणि निवडणुका आल्यानंतर अकोले, संगमनेर आणि अन्य तालुक्यांची आठवण होते. अर्थात खा. सुजय विखे यांच्याप्रमाणे त्या देखील एक सक्षम व युवा उमेदवार असून स्वबळाचा देखील त्यांनी नारा दिला तरी लोकांना त्यांना स्विकारावं इतकं काम त्यांनी पुढील पंचवार्षीकला करावे. यंदा कर्तव्य नाही हे तितकेच शक्य आहे.

रामदास आठवले यांची उमेदवारी.!

२००९ मध्ये आठवले यांनी कॉंग्रेससोबत असताना शिर्डी लोकसभेची उमेदवारी केली होती. मात्र, ना.विखे आणि आ. थोरात कॉंग्रेसचे दिग्गज एकत्र असताना दिड लाख मतांनी आठवले पडले. पण आता परिस्थिती तशी नाही. आठवले आणि त्यांचे राज्यभरातील मतदार संभाळायचे असेल तर भाजपला त्यांचा विचार करावा लागेल. अन्यथा राज्यसभेवर आठवले आहेत असे गृहित धरले तर जो दोलायमान परिस्थितीत असणारा आंबेडकरी समाज आहे. तो शंभर टक्के प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितकडे झुकतो. त्यामुळे, काय होते हे २००९ आणि २०१४ मध्ये सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे, शिंदे गट संभाळताना आणि आठवले यांना डावलताना भाजपाची फार मोठी कोंडी होत आहे. असे झाले तर वंचितमुळे महाविकास आघाडीला आच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाही. यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आठवले यांनी त्यांच्या समांतर कोणता नेता मोठा होऊ दिला नाही. त्यामुळे, राजा बोले अन दल हले अशी परिस्थितीची रिपाईत आहे. जर आठवले यांना उमेदवारी मिळाली तर सगळे दुय्यम फळीतील नेते झेंडे फडकविण्यासाठी सज्ज राहतील. पण, जर उमेदवारी मिळाली नाही. तर, भाजपाच्या विरोधात बंड पुकारून अनेक ठिकाणी याच नेत्यांच्या उमेदवार्‍या दाखल झाल्याचे पहायला मिळेल. त्यामुळे, एक जागा का होईना.! आठवलेंचा विचार भाजपाला करावा लागेल आणि राज्यात व केंद्रात बळ मिळण्यासाठी विखेंना आठवलेंची जबाबदारी घेऊन स्वत:ची ताकद सिद्ध करावी लागेल. त्यामुळे, भाजपा नेमकी काय भुमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बबनराव घोलप यांचा प्रयत्न.!

उद्धव ठाकरे यांना सोडून जवळजवळ सगळेच नेते गेले होते. तेव्हा त्यांना गद्दार म्हणत घोलपांनी आपली मातोश्रीप्रती निष्ठा दाखविली होती. तेव्हाच त्यांना नगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून नेमले. त्यानंतर घोलप यांचे काम जोमात सुरू झाले होते. मात्र, त्यांनी थेट जुन्या नेत्यांच्या निवडी रद्द करुन नव्यांना संधी दिली आणि तोच निर्णय त्यांना घातक ठरला. मातोश्रीहून या सर्व निवडी रद्द होऊन पुन्हा निवडी रद्द झाल्या. त्यानंतर घोलप यांच्या निष्ठेला उतरती कळा लागली. त्यानंतर ते कधी शिंदे गटाच्या संपर्कात होते तर आता भाजपाच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांची स्थिती घर का ना घाट का अशी झाली असून त्यांना कोठून का होईना.! पण, शिर्डी लोकसभा लढविण्याची इच्छा आहे. परंतु, शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांना संभाळायचे की आठवले यांची मनधरणी करायची? यात घोलप वेटींग लिस्टमध्ये असल्याचे दिसते आहे. मात्र, घोलप यांना देखील अदखलपात्र ठरवून चालणार नाही. त्यांची कायदेशीर आडचण झाली नसती तर आज तेच शिर्डीचे खासदार असते. इतकी हवा त्यांनी केली होती. हे असे असले तरी आता तो जनाधार नाही हे देखील विसरून चालणार नाही.

सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी.!

२०१४ च्या मोदी लाटेत कधी न दिसलेला हा अनोळखी चेहरा शिर्डीत चमकला. कोण खा. लोखंडे हे अद्याप देखील लोकांना माहित नाही. लोकांना अश्‍वासने द्यायची आणि झुलवत ठेवायचे अशी यांची ओळख. दरम्यानच्या काळात खासदार हरवला आहे अशा बातम्या आल्या होत्या. खरंतर शहरे वगळता हजारो खेडेगावांमध्ये खा. लोखंडे कोण आहे याची माहिती नाही. किंवा आपला खासदार कोण? असा प्रश्‍न केला तर माहित नाही. असे उत्तर ८० टक्के सामान्य लोक देतील. यांचे नशिब म्हणावे लागले २०१९ ला सर्जिकल स्ट्राईकच्या लाटेत यांचे नशिब फळले. लोखंडे निवडून आले हा विश्‍वास अनेकांना धक्का देणारा होता. प्रत्येकजण म्हणत होता. मी मतदान केलेच नाही, मग हे निवडून आलेच कसे? अशा अनपेक्षित विजयांमुळे चांगल्या ईव्हीएमवरती प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे, दोन वेळा ज्या चुका झाल्या त्या आता कोणी करणार नाही अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. तर, ज्या उद्धव ठाकरे यांच्या जिवावर यांनी दिल्ली गाठली त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसून यांनी गद्दारी केली अशी देखील चर्चा आहे. मग भाऊसाहेब वाकचौरे आणि लोखंडे यांच्यात फरक काय? असे म्हणत लोक पर्यायी चेहरा शोधत आहेत. त्यामुळे, लोखंडे हे उमेदवार असूच शकत नाही अशी चर्चा असली. तरी, घोलप, आठवले आणि शिंदे गटाचा अग्रह म्हणून लोखंडे अशा त्रिकोणात शिर्डीची उभेदवारी अडकली आहे.

भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी.!

जसे वारे तसे उपनावे अशा स्वभावाचे हे व्यक्तीमत्व आहे. २००९ साली शिवसेनेची हवा पाहून आपला माणूस आपल्यासाठी असा नारा देत ते निवडून आले. मात्र, त्यानंतर विखेंच्या छायेखाली त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांचा दारुन पराभव झाला. कॉंग्रेसमध्ये देखील यांचे मन रमले नाही. त्यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला आणि श्रीरामपूर विधानसभा लढवत पराभवाचा धोंडा पायावर पाडून घेतला. तीन पक्ष सोडून देखील त्यांचे मन स्वस्थ बसले नाही. त्यांनी शिर्डी लोकसभेची बदलती हवा पाहिली आणि पुन्हा शिवसेनेत जागा खाली होताच शिवबंधन बांधून घेतले. म्हणजे उद्या जर शिवसेनेने नाकारले तर हे तिकीटासाठी रिपाईत गेले तर नवल वाटण्याचे काहीच कारण नाही. सत्तेच्या मोहात जसा शिंदे गट बाहेर पडला त्यापुर्वीच भाऊसाहेब वाकचौरे यांनी गद्दारीचा नारळ फोडला होता. इतकेच काय.! निष्ठावंत शिवसैनिकांनी त्यांच्या अंगावर निषेध म्हणून शाईफेक केली. तर, त्यांच्यावर संगमनेरात गुन्हे दाखल केले. म्हणजे ठाकरे साहेबांनी कार्यकर्त्यांना निष्ठेचे फळ देखील फार चांगले दिले आहे. ज्याने गुन्हे दाखल केले त्याच्यासाठी गावभर झेंडे लावत फिरायचे आहे, त्याच्यासाठी सतरंजा उचलून यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा म्हणत घसे फाडायचे आहेत. म्हणजे राजकारणात नैतिकता नावाचा प्रकार असतो की नाही? असा प्रश्‍न वाकचौरे यांच्याकडे पाहून पडतो. त्यामुळे, खुद्द ठाकरे गटातून तर विरोध होतोच आहे. मात्र, महाविकास आघाडीतून देखील त्यांना विरोध होतो आहे. त्यामुळे, ठाकरे गटाने जरी त्यांना ग्रिन सिग्नल दिला असला. तरी, त्यावर विचार व्हावा म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेऊन भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उमेदवारीस विरोध केला आहे. त्यामुळे, अंतिमत: काय होते? याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

क्रमश: भाग १ 

- सागर शिंदे