दलित महिलेवर बीडीओ व गटशिक्षण अधिकारी याच्याकडून अन्याय.! चुकीची बदली करुन ‘बाई’ डोंगरात.! आयुक्तांकडे लेखी तक्रार.!
सार्वभौम (अकोले) :-
शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेत एका दलित महिला शिक्षिकेवर बीडीओ आणि गटशिक्षण अधिकारी यांनी अन्याय केला. ज्या ठिकाणी बदली पात्र नव्हती तेथे बदली करण्यात आली. तर, या अधिकार्यांना त्यांची चुक लक्षात आल्यानंतर पुन्हा आणखी दुरवर या महिला शिक्षिकेची बदली करण्यात आली. विशेष म्हणजे सगळ्यांना त्यांच्या सोईस्कर आणि हव्या तशी बदल्या दिल्या. मात्र, या महिलेला गाडी चालविता येत नाही, ज्या ठिकाणी बदली केली तेथे वाहनांची सुविधा नाही, गेल्या काही दिवसांपासून ही शिक्षिका मानसिक तणावात असून त्यांची गेल्या काही दिवसांपुर्वी सर्जरी झालेली आहे. असे अनेक प्रश्न असताना या शिक्षिकेसाठी जवळची शाळा उपलब्ध होती. तरी देखील यांनी हाटीवादाने म्हणा, व्यक्तीद्वेषाने म्हणा किंवा जातीयवादाने म्हणा पण या महिलेची गैरसोय करुन तिला त्रास कसा होईल अशा पद्धतीने दोन वेळा बदल्या केल्या आहेत. हा सर्व प्रकार या बाईंनी विभागीय आयुक्त ते अगदी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह अनेक विभागांना पत्राद्वारे कळविला असल्याचे निवेदनात नमुद केले आहे. त्यामुळे, या महिलेच्या बाबतीत इतका रोष का? किंवा संबंधित महिलेने मी दलित आहे असा देखील पत्रात उल्लेख केला आहे. मग यामागील कारण काय? याची चौकशी शिक्षणमंत्री व शिक्षण अधिकारी यांनी करावी. अशी मागणी रिपाईचे राज्यसचिव विजय वाकचौरे यांनी केली आहे. जर, या महिलेसोबत जातीयवाद होत असेल तर राज्यभर आंदोलन छेडले जाईल अशी प्रतिक्रीया वाकचौरे यांनी दिली आहे.
त्याचे झाले असे. की, एक शिक्षक महिला अकोले तालुक्यातील एका शाळेवर २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त झाल्या होत्या. अतिरिक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या ज्येष्ठता यादीत त्यांचा क्रमांक तीन नंबर तर प्राधान्यक्रम यादीनुसार ११ वा क्रमांक होता. यात एकुण १५ शिक्षकांचे समायोजन झाले. याच समायोजन प्रक्रियेत या महिलेवर अन्याय झाल्याची भावना त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे. की, अकोले पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने पुर्ण रिक्त पदे असलेल्या शाळा दाखविल्या नाही. समायोजन प्रक्रियेत संबंधित महिला शिक्षिकेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसावीदरा ही शाळा दिली होती. मात्र, वास्तवत: या शाळेवर जागाच रिक्त नव्हती. मग यांनी कोणत्या मुद्द्याहून त्या शाळेत नियुक्ती केली? ज्या शाळेत रिक्त पदे नाहीत त्या शाळेत बदली करुन संबंधित महिला शिक्षिकेची यांनी फसवणुक केली आहे अशा प्रकारची भावना त्यांनी पत्रात नमुद केली आहे.
दरम्यान, बीडीओ आणि गटशिक्षण अधिकारी यांचा हा भोंगळ कारभार त्यांच्या लक्षात आल्यानंतर कायदेशीर गोष्टी तथा नैसर्गिक न्यायाचे तत्व वेशिवर टांगून यांनी त्यांची चुक झाकण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा या शिक्षिकेची बदली करुन त्यांना जांभुळदरा येथे नेमणूक केली आणि दबाव टाकून तेथे हजर होण्याचे आदेश दिले. आता जांभळदरा हे दुर्गम भागातील क्षेत्र असून तेथे कोणत्याही प्रकारचे अन्य वाहन जात नाही. त्यामुळे, जी शिक्षिका अकोले शहरात रहायला आहे, ज्या शिक्षिकेला गाडी येत नाही, जिची नुकतीच सर्जरी झाली आहे, जी आजकाल कौटुंबिक व मानसिक समस्येला सामोरे जात आहे. अशा महिलेस थेट जांभुळदरा शाळा देणे म्हणजे ही कोणती शिक्षा आहे? हा कोणता व्यक्तीद्वेष आहे? विशेष म्हणजे मी दलित असल्याचे देखील या महिलेने अर्जात म्हटले असून नेमकी यातून काय सिद्ध होते आहे. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होते आहे.
यात एक गोष्ट पुढील भागात नमुद केल्या जातील. की, कोणाच्या बदल्या कशा झाल्या आहेत. कोण कोठे आहे आणि त्यांचे कसे समायोजन केले आहे. म्हणजे तोंड पाहून, राजकीय हस्तक्षेपाला बळी पडून, नेत्यांची मर्जी राखून, संघटनांच्या प्रतिनिधींची हुजरेगिरी करुन शिक्षण विभागात काय-काय चालते यावर आता अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी बोलु लागले आहेत. विशेष म्हणजे येथे जर मागासवर्गीय व्यक्तींवर अन्याय होत असेल. तर, हजारोेंच्या संखेने पंचायत समितीवर येऊन अधिकार्यांना जाब विचारण्याची आणि त्यांना खुर्चीतून पायउतार करण्याची ताकद येथील वैचारिक संघटनांमध्ये आहे. त्यामुळे, या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. असे मत विजय वाकचौरे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, संबंधित महिलेवर अन्याय झाला आहे हे त्यांच्या पत्रातून स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे २० पटापेक्षा कमी शाळेंवर दोन शिक्षक देऊ नये असे आदेश जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी दिले होते. असे असताना देखील नियम ढाब्यावर बसून बीडीओ पाडुरंग कोल्हे आणि गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांनी हा अट्टाहास कोणत्या हेतूने केला? दुसरी गोष्ट म्हणजे जवळच्या आणि मोठ्या शाळेंवर जागा असताना देखील त्या शाळा ब्लॅक करुन इतक्या लांब देण्याची संकल्पना यांच्या सुपिक मेंदुत कशामुळे आली असावी? तिसरी गोष्ट म्हणजे अनेकांच्या बदल्या एकीकडे आणि काम दुसरीकडे सुरु आहे. मग याच महिलेने काय घोडे मारले होते? जिची दोन्ही वेळा आडवळणीच बदली करणे यांना योग्य वाटले.! चौथी बाब म्हणजे जर कोणालाच मदत न करता कायदेशीर बदल्या केल्या असत्या तर मान्य होते. पण, याच महिलेला सपोर्ट करायचा नाही. बाकी सर्व आपले ही दुजाभावाची भावना आली काशी? पाचवी गोष्ट म्हणजे शिक्षकांनी संतुष्ट राहून शिकविले पाहिजे, आनंदाने शिक्षण दिले पाहिजे म्हणून समाधानकारक बदल्या संकल्पना आहे. मग, या महिलेवर अशा प्रकारची बदली लादून त्या व्यवस्थित मुलांना शिकवतील का? हे साधे मानसशास्त्र आहे, सहावी बाब म्हणजे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पत्नीस समायोजनाने धु्रवतार्यासारखे स्थान निर्माण करुन दिले आहे. अगदी अधिकार्यांनी देखील. मग, नियमाच्या बाहेर जाऊन एकाच महिलेला इतका त्रास देण्याचे कारण काय? अशी अनेक उत्तरे अनुत्तरीत आहेत. यामागील गौडबंगाल काय? याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी शिक्षणमंत्री यांच्याकडे करण्यात येणार आहे.
क्रमश: भाग २
![]() |
उदंड प्रतिसाद.! |
टिप: रोखठोक सार्वभौम हे कोणाची चापलुसी करीत नाही. ना कोणाच्या दबावाला बळी पडते. विशेष म्हणजे कोणाकडे जाहिरातीचा तगादा नाही, ना कोणाला ब्लॅकमेल ना कोणाचे हाप्ते सवूल केले जाते. असे एकही उदा. अपवादात्मक सुद्धा सापडणार नाही. त्यामुळे, जे काही अन्यायात्मक वाटते त्यावर कायदेशिर, रोखठोक व पुरावे राखून लिखाण केले जाते.