संगमनेरात रेल्वे अपघात.! बालक गंभीर जखमी अनेकांचे प्राण वाचले, रेल्वे रुळाहून घसरताच चालक पसार, गुन्हा दाखल करा.!
संगमनेर शहरातील संजय गांधी नगर येथे राहणारा एक सात वर्षाचा मुलगा नेहरु गार्डन येथे खेळण्यासाठी गेला असता तेथील लहान मुलांची रेल्वे तथा चाचा नेहरु एक्सप्रेस ही रेल्वे रुळाहून खाली घसरली आणि तिचे सर्व डब्बे जमिनीवर कोसळले. यात विराज मारुती शिंदे हा बालक रेल्वेच्या डब्ब्याखाली गेला असून त्याला फार मोठी दुखापत झाली आहे. ही रेल्वे संगमनेर नगरपरिषदेने सुरू केली असून प्रत्येक मुलांमागे पाच रुपये वसूल केले जातात. त्यामुळे, अतिशय जिर्ण झालेली ही खटारा रेल्वे नगरपरिषदेने सुरू का ठेवली? त्याची देखभाल करण्याची जबाबदारी कोणाची? पैसे हवे मग मुलांचे जीव नकोत का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर रेल्वे चालक तेथून पसार झाला, त्यामुळे त्याने कर्तव्य सोडा.! पण नैतिक जबाबदारी देखील पार पाडली नाही. त्यामुळे, त्याच्यावर प्रशासनाने गुन्हा दाखल करावा आणि संबंधित जखमी मुलाच्या दवाखान्याचा खर्च करुन त्यास नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी समाजसेवकांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, आज रविवार दि. १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विराज मारुती शिंदे हा बालक नेहरु गार्डन येथे खेळण्यासाठी गेला होता. रविवार असल्यामुळे तेथे खेळण्यासाठी मुलांनी एकच गर्दी केली होती. विराजने देखील घरातून पाच रुपये घेतले आणि तो रेल्वेत बसण्यासाठी गार्डनमध्ये गेला. घरापासून गार्डन जवळ असल्यामुळे त्याच्यासाठी तेथे खेळणे विशेष नव्हते. पण, घरातील परिस्थिती फार बेताची असल्यामुळे त्याला रेल्वेत बसणे शक्य होत नव्हते. मात्र, त्या दिवशी त्याने पाच रुपयांचा हट्ट करुन तो रेल्वेत बसला होता.
दरम्यान, अनेक मुलांची गर्दी होती. रेल्वेत अन्य मुले देखील बसलेली होती. जेव्हा गाडी सुरू झाली तेव्हा मुलांनी एकच आनंद व्यक्त करीत आरडाओरड केला. मात्र, रेल्वे पुढे सरकली आणि काही क्षणात तिचे इंजिन रुळाहून खाली घसरले. एकापाठोपाठ एक डब्बे रुळाखाली आले आणि कोसळले. यावेळी विराजने प्रसंगावधान राखून खाली उडी मारली. मात्र, बाजुला जाळी असल्यामुळे तो तेथे अडकला. त्याने उडी मारली त्याच्या पाठोपाठ एक डब्बा देखील त्याच्या अंगावर पडला. त्यामुळे, त्याला डोक्याला, तोंडाला, दाताला, पायाला मार लागलाच. पण, त्याचा एक बाजुचा हात पुर्णपणे सोलपटून निघाला. हातावर कातडे राहिले नव्हते. ही सर्व घटना घडताच गार्डनमध्ये एकच आरडाओरड झाली. यावेळी गाडीचे डब्बे उचलायचे आणि मुलांना बाहेर काढायचे तर रेल्वे चालक तेथून पळून गेला.
दरम्यान, हा सर्व प्रकार उपस्थित लोकांनी पाहिला असता या मुलास बाहेर काढले. तेव्हा तो पुर्णत: रक्तबंबाळ झालेला होता. विशेष म्हणजे या मुलाच्या डोक्यावर असणार्या मुख्य पालकाचे छत्र हलरपल्यामुळे त्याची परिस्थिती नाजूक होती. त्यामुळे, त्याच्यावर स्थानिक उपचार झाले असले तरी पैसा नसल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. विशेष म्हणजे येथे मोठमोठे दवाखाणे आणि उपजिल्हा रुग्णालय असून देखील या मुलास लोणीला हलविण्याची वेळ आली हे संगमनेरचे काही कमी दुर्दैव नाही. आता विराज त्याच्या आजीसोबत असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याला झालेल्या जखमा या त्यास कायमच्या अधु करतील अशा आहेत.
दरम्यान हा सर्व प्रकार शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी सोशल मीडियातवर शेअर केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यांनी तत्काळ त्यांच्याशी संपर्क केला आणि संबंधित मुलाचा खर्च आम्ही करु असे आश्वासन दिले. मात्र, नगरपरिषदेने त्या बालकास एखाद्या खाजगी रुग्णालयात उपचार करावेत, त्याची जी शारिरीक हानी झाली आहे ती भरुन द्यावी, नगरपरिषदेने सुरू केलेली रेल्वे काही फुकट नव्हती. त्यामुळे, या मुलास दोन लाख रुपयांची भरपाई दिली पाहिजे. तसेच जो कोणी यात दोषी आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.