संगमनेरात पोलिसांना सुरी व काठीने हल्ला, तिघे जखमी, दोघांवर गुन्हा दाखल.! पोलिसांचा धाक संपला.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर पोलीस आणि त्यांना पळू-पळू मारहाण या घटना आजकाल संगमनेरात नव्या राहिल्या नाहीत. पण, आजकाल तपास आणि चौकशी करण्यासाठी गेल्यानंतर देखील पोलिसांवर शस्त्रास्त्र हल्ला होतो. ही बाब मात्र दुर्दैवी आहे. ज्यांच्या खांद्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे त्यांचीच डोकी फोडली जात असेल तर येथे पोलिसांचा काही धाक आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो. आज पहाटे संगमनेर तालुक्यातील वडगाव येथे बाप लेक यांच्यात मारामार्या झाल्या होत्या. त्या सोडविण्यासाठी पोलीस गेले असता त्यांच्यावर भाजी कापण्याच्या सुरीने हल्ला करण्यात आला. तर, काहींना काठीने मारहाण करुन धक्काबुक्की करण्यात आली. यात पोलीस हेडकॉनस्टेबल बन्सी येसू टोपले, ओेंकार शेंगाळ आणि राजेंद्र घोलप असे तीन पोलीस जखमी झाले आहेत. याप्रकरणी तेजस दत्तू काशिद व दत्तू काशिनाथ काशिद (दोघे रा. वडगाव पान, ता. संगमनेर, जि. अ.नगर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. पण, इतका गंभीर गुन्हा होऊन देखील पोलीस अधिकाऱ्यांनी कलम 307 नुसार कारवाई का केली नाही. की अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांचे काही घेणेदेणे नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. संगमनेरात पोलिसांवर हात उचलणे ही एक फॅशन आणि पॅशन झाली असून कठोर पाऊले न उचलल्यामुळे काळ सोकावल्याची नाराजी पोलीस कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, शनिवार दि. ९ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे दत्तू काशिद याने त्याच्या मुलीस मारहाण केली असे त्याचा मुलगा तेजस काशिद याला वाटले होते. तेव्हा बहिनीला मारहाण कशाला केली या कारणाहून बाप-लेकांमध्ये वाद झाले होते. दोघांचे वाद टोकाला गेल्यामुळे तेजस याने घराच्या परिसरात असणारी एक मोटार उचलून ती बापाच्या डोक्यात टाकली. त्यामुळे हा वाद अधिक विकोपाला गेला. दोघांना शेजारी आणि गावकरी यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची मानसिकता दिसून आली नाही. दोघे एकमेकांना भिडले आणि त्यांच्यात वारंवार मारामार्या होत होत्या. म्हणून, या घटनेतून एखादा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून काही व्यक्तींनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फोन केला आणि सदर घटनेची माहिती दिली.
दरम्यान, नाईट ड्युटीवर असणारे पोलीस कर्मचारी बन्सी टोपले, ओेंकार शेंगाळ आणि राजेंद्र घोलप यांनी तत्काळ वडगाव पान गाठले. तेथे गेल्यानंतर अनेक बघे जमा झाले होते. पोलिसांनी या दोघांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही दोघे एकमेकांवर चाल करुन जात होते. यावेळी पोलिसांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता कोणीच माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हा पोलिसांनी दोघांना पोलीस गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेजस काशिद याने गाडीत बसण्यास विरोध करुन घटनास्थळाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी धिटाई केली असता बापलेक एकत्र आले आणि त्यानंतर दत्तू काशिद पोलिसांना म्हणाला. की, तुम्ही त्याला पोलीस ठाण्यात नेवू नका. हे आमच्या घरातील भांडणे आहेत आम्ही ती मिटवून घेऊ, तुम्ही येथून चालते व्हा.!
दरम्याने तेथे होणारी आरडाओरड आणि तमाशा शांत करण्यासाठी पोलिसांनी तेजस यास गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दत्तू म्हणाला. की, तुम्ही त्याला नेवू नका अन्यथा मी तुम्हाला दाखवून देईल अशी धमकी दिली. त्यावेळी आरोपी तेजस याने त्याच्या हातात असणारी भाजी कापण्याची सुरी पोलीस कर्मचारी ओेंकार शेंगाळ यांच्या डोक्यात मारली. तर, राजेंद्र घोलप यांच्या उजव्या हाताच्या बोटावर देखील मारली. तसेच आरोपी दत्तू याने देखील जवळच असणारी काठी उचलली आणि पोलिसांना धक्काबुक्की करुन मारहाण केली असे टोपले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर यांनी दत्तू काशिद यास अटक केली असून बाप लेकांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ढुमणे करीत आहेत.
पोलिसांचा धाक संपलाय का?
संगमनेर शहर असो किंवा तालुका, आजकाल येथे राजरोस पोलिसांवर हात उचलण्याच्या घटना घडत आहेत. कधी भर चौकात पोलिसांना पळू-पळू मारले जाते तर कधी जेलमध्ये असणारे आरोपी पोलिसांवर ताव घेतात. कधी भर पोलीस ठाण्यात राडा होतो तर कधी चौकशी अणि वाद मिटविण्यासाठी गेलेले पोलीस मार खावून येतात. त्यामुळे, अंगावर वर्दी असल्याची दहशत (गुन्हेगारांवर) निर्माण करण्यात पोलीस कोठेतरी कमी पडताना दिसत आहेत. मात्र, कधी वाळु तस्कारांच्या मागे तर कधी मावा गुटखा सुस्थळी पोहचविण्यास मदत करताना पोलीस वादाच्या भोवर्यात सापडत आहे. त्यामुळे, एकीकडे संगमनेरात वाढत चालेले अवैध धंदे, वाढत चाललेली गुन्हेगारी, लाच घेताना जाळ्यात अडकणारे पोलीस अधिकारी या गोष्टी संगमनेरच्या वाटचालीस फार घातक ठरणार आहेत. यावर अधिकारी आणि नेत्यांनी देखील विचार करणे गरजेचे आहे. आजकाल लोक आपल्या तालुक्याचे बिहार व्हायला नको असे म्हणतात. पण, येणार्या काळात आपल्या तालुक्याचे संगमनेर व्हायला नको अशी म्हण रुजू पडू नये म्हणजे झालं.!