मी आत्महत्या करीत आहे.! कोणाला दोषी धरु नये, स्टेटस ठेवून मुलगी पसार.! पोलिसांमुळे घटना टळली.!
सार्वभौम (अकोले)-
ब्राम्हणवाडा परिसरातील एक कॉलेज तरुणी एका तरुणासोबत इन्स्टाग्रामवर चॅट करत होती. मुलगी वाम मार्गाला जाऊ नये म्हणून तिच्या पालकांनी तिला समज दिली. पण, तिच्या नाकाच्या शेंड्यावर राग आला आणि तिने घर सोडले. मी औषध घेऊन आत्महत्या करीत आहे. मात्र, माझ्या पश्चात कोणाला दोषी धरू नये. असे मोबाईल स्टेटस तिने ठेवले होते. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे सगळ्यांना घाम फुटला आणि पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. त्यावर अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक विजय करे यांनी तत्काळ यंत्रणा कामाला लावली आणि या प्रकरणातील अनेक ट्विटस ऍण्ड टर्न पार करुन मुलगी सिन्नर एमआयडीसी हाद्दीतून ताब्यात घेतली. मात्र, मुलीने आई वडिलांकडे जाण्यास नकार दिला आणि तडजोडी अंती तिला मामाच्या ताब्यात दिले. हा तपास एखाद्या चित्रपटासारखा असून वेळीच पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. त्यामुळे, येणारे अनेक अनर्थ टळले. त्यामुळे, अकोले पोलिसांचे तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
त्याचे झाले असे. की, अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील एक तरुणी तेथे कॉलेजला जात होती. हाती मोबाईल असल्यामुळे इन्स्टाग्रामवर तिचे रिकामे चाळे सुरू झाले. कधी कोणाला हाय करायचे तर कधी कोणाशी चॅट करायची. त्यामुळे, तिचे भेट राजुरच्या एका तरुणाशी झाली. चारदोन दिवस हाय-बाय केलं आणि त्याच तडाख्यात आईने मोबाईल पकडला. हे काय उद्योग आहे? अशी विचारणा केली आणि चांगले दोन तडाखे लावले. पण, हा अपमान मुलीस सहन झाला नाही. कॉलेजला जाते म्हणून तिने घर सोडले आणि थेट मैत्रीणिच्या घरी गेली. तेथे मैत्रीणिच्या आईचा मोबाईल हिने घेतला.
दरम्यान, या तरुणीने मैत्रीणिच्या आईच्या मोबाईलवर इन्स्टाग्राम ओपन केले आणि राजुरच्या तरुणाशी पुन्हा चॅटींग सुरू केली. ही चर्चा झाल्यानंतर या तरुणीला त्यांच्या ओळखीचा बाभुळवंडी येथील एक पाहुणा भेटला. त्याला ही तरुणी म्हणाली. की, मला जॉब करायचा आहे त्यामुळे मला तुम्ही जॉब शोधून द्या. जेव्हा ही तरुणी मैत्रीणिच्या घरुन निघाली तेव्हा हिने त्यांना सांगितले. की, हे माझे काका आहेत. त्यामुळे, कोणतीही चौकशी न करता कॉलेज तरुणी तेथून चालती झाली. हे दोघे बस स्थानकाकडे निघाले तेव्हा एका सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्यामुळे, हा व्यक्ती कोण? हीच चर्चा फार रंगली आणि याच व्यक्तीने मुलीचे अपहरण केले असे समजून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र, मुलीचे स्टेटस आत्महत्या करण्याचे होते. त्यामुळे, तिचा जीव वाचणे हेच पोलिसांपुढील महत्वाचे आव्हान होते.
मुलीच्या मोबाईलहून जे काही चॅटींग झाले होते. तो कोणाचे होते हे आई वडिलांना माहित होते. त्यामुळे, हाच व्यक्ती मुलीचे अपहरण किंवा लग्नासाठी तिला नेवू शकतो यावर अनेकांच्या भुमिका ठाम होत्या. त्यामुळे, करे यांनी हा राजुरचा मजनू ताब्यात घेतला. तोवर याने सर्व चॅटिंग डिलीट केल्या होत्या. त्यामुळे, याच्यावरील संशय अधिक बळावला. मुलगी कोठे आहे? त्याला विचारणा केली. मात्र, त्याच्याकडून एकच उत्तर येत होते. चॅटींग होती, सेंटींग होती. पण, एकदाही आमची मिटींग झाली नव्हती. त्यामुळे, ती कोठे आहे हे माहित नाही. जेव्हा सीसीटीव्हीत असणार्या व्यक्तीसोबत मुलगी जाताना दिसते. तो व्यक्ती ओळखीचा आहे का? विचारले तर नाही सोडून उत्तर नव्हते. चापटून चोपटून विचारले तरी मुलीचा शोध लागत नव्हता.
दरम्यान, हा मजनू खोटं बोलतोय असे वारंवार वाटत होते. त्यामुळे, या तरुणीने ज्या मैत्रीणिच्या आईचा मोबाईल वापरला होता. तिच्याकडे पोलिसांनी आपला मोर्चा वळविला. या दोघांमध्ये चॅटिंग झाली कशी? आणि ती या महिलेस माहित कशी पडली नाही? त्यांच्या घरी येऊन एक व्यक्ती मुलीस घेऊन जातो. त्याच्याकडे साधी विचारपूस देखील का केली जात नाही? असे अनेक प्रश्न पोलिसांना होते. पण, मैत्रीणिच्या आईला मुलगी माहित नाही आणि हा मजनू म्हणतो माझा काहीच संबंध नाही. मग मुलगी गेली कोठे आणि नेली कोणी? आता बाकी या तापासाने वर्दीला चॅलेंन्ज दिले होते. मात्र, मुलगी जोवर भेटत नाही. तोवर करे साहेबांसह त्यांची टिम देखील स्वस्थ बसणार नव्हती. संबंधित सीसीटीव्हीचे फुटेज त्यांनी अनेकांना दाखविले. त्यानंतर लक्षात आले. की, हा व्यक्ती बाभुळवंडी येथील असून तो ब्राम्हणवाडा येथील एका पाहुण्यांकडे आला होता. त्यानंतर त्याला देखील पोलिसांनी मोठ्या कसोशीने ताब्यात घेतले.
मुलगी कोठे आहे? पहिलाच प्रश्न विचारला आणि पोलिसांना पाहून त्याची बोलती बंद झाली. माहित नाही वैगरे उत्तरे अपेक्षित होते त्यामुळे, आरती करुन प्रसाद दिल्याशिवाय पर्याय नव्हता. त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखविले आणि तो बोलता झाला. तिला जॉब पाहिजे होता. त्यामुळे, तिला सिन्नर एमआयडीसी सोडले आहे. अर्थात ज्या ठिकाणी सोडले त्या ठिकाणी मुलगी नसले तर काकाच्या अंगावर कातडी राहिली नसती हे त्याला देखील माहित होते. त्यामुळे, मी फक्त तिला सिन्नर एमआयडीसी सोडले यापेक्षा तो पुढे बोलत नव्हता. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास देखील केला. मात्र, हाती काहीच आले नाही. पुन्हा या व्यक्तीकडून माहिती घेतली असता त्याने सांगितले. की, एका वृद्ध महिला आहे. तिच्याकडे या मुलीस ठेवले आहे. पोलिसांनी सिन्नर एमआयडीसीतील महिलेची झोपडी गाठली आणि त्यात ठिकाणी ही तरुणी मिळून आली. त्यानंतर जे काही घडले त्या ना तो मजनू दोषी होता ना मैत्रीणिची आई, ना ते काका दोषी होते ना पालक, दोष होता तो फक्त बदलत चालेल्या काळाचा...!!
दरम्यान, चॅटिंग हे शुल्लक कारण होते, ते ही मुलीच्या भविष्यासाठीच होते. पण, ज्या आई वडिलांनी तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलं, प्रत्येक हट्ट पुरवून तुम्हाला लहानचे मोठे केले, बोलायला, चालायला आणि उभं रहायला शिकविणारे आई-वडिल मुलींना एखाद्या फालतू मुलासाठी परके वाटतात हे समाजातील फार मोठे दुर्दैव आहे. त्यामुळे, पालकांनी मुलांशी बोललं पाहिजे, त्यांच्याशी मैत्री केली पाहिजे. त्यांच्या शिक्षकांशी बोललं पाहिजे, त्यांचे मित्र-मैत्रीण कोण? त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या काळात विद्यार्थ्यांना मोबाईल नावाचा फालतू लाड देणे टाळले पाहिजे. फारच मुले मानसिक दृष्ट्या अस्थिर वाटत असेल तर त्यांचे समुपदेशन केले पाहिजे. पण, मुलांच्या एका चुकीमुळे आई-वडिल, नातेवाईक, पोलीस आणि संपर्कात असणार्या किती जणांना या त्रासाला सामोरे जावे लागते हे यातून लक्षात येते. एक अल्पवयीन मुलगी घर सोडून जाते, अज्ञात ठिकाणी राहते, मनात आत्महत्या करण्याचे विचार करते हे किती भयानक आहे. त्यामुळे, खरोखर पोलिसांचे आभार मानले पाहिजे. की, त्यांच्यामुळे, आमचे लेकरु सुखरुप घरी आले अशी प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिली.