पोलीस मागे लागल्याने पिकअप गेली विहिरीत! एकाचा मृत्यू ? चौघे वाचले.! पिकअप हेडलाईट नव्हती.!
सार्वभौम (संगमनेर)-
बेकायदेशीर वाळु वाहतूक करणार्या पिकअपच्या मागे पोलीस लागल्याने गाडी खोल विहिरीत पडली. त्यामुळे, वाहन चालकाचा बुडून मृत्यु झाल्याची चर्चा असून तिघे मजूर बचावले आहेत. ही घटना शनिवार दि.२५ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटेच्या सुमारास धांदरफळ बु परिसरात घडली. यात गोरख नाथा खेमनर (रा.डीग्रस, ता. संगमनेर) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. आता या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू आहे. हा पोलीस कोण होता, त्याच्याकडे कोणती गाडी होती, त्यात कोण-कोण होते, जो तरुण मृत्यु झाला त्यास जबाबदार कोण? याची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. तर, यापुर्वी देखील पोलीस मागे लागले म्हणून तिन वाळु वाहतूक करणार्यांचा मृत्यू झाला होता.
याबाबत सुत्रांनी दिलेली सविस्तर माहिती अशी. की, आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पोलीस तालुक्याच्या हाद्दीत गस्त घालत होते. या दरम्यान धांदरफळ परिसरात अवैध वाळु वाहतूक चालु असल्याची माहिती एका कर्मचार्यास मिळाली होती. त्यानंतर त्यांनी मंगळापूर ते धांदरफळ या रस्त्याने आपली गस्त सुरू केली. या दरम्यान, वाळुवाल्यांनी मंगळापूर परिसरात प्रवरा नदीतून काढलेल्या वाळुला त्यांनी धांदरफळ येथे पोहच केले होते. याच वेळी त्यांनी पोलीस कर्मचार्यांची चाहुल लागली आणि त्यांनी पिकअप भरधाव वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मागे नेमकी कोणाची गाडी होती हे स्पष्ट झाले नाही. मात्र, पोलीस होते असे मत संबंधित व्यक्तींनी बोलुन दाखविल्याची चर्चा संगमनेरात रंगली होती.
जेव्हा धांदरफळ परिसरात ही पिकअप गोर्डे वस्तीजवळ आली. तेव्हा तेथे एस टर्न असा रस्ता आहे. मागे पोलिसांची गाडी आहे असे मनात गृहीत असल्यामुळे जरी नेहमीचा आणि ओळखीचा रस्ता असला. तरी देखील वाहन चालकास भितीपोटी गाडी कंट्रोल झाली नाही. त्यामुळे गाडी थेट गिन्नीगवत पार करुन थेट समोरच्या खोल विहरीत जाऊन कोसळली. ही विहीर फार खोल आहे. गाडीचे तोंड खाली असल्यामुळे वाहन चालकास बाहेर पडणे सोपे झाले नसावे. मात्र, मागे जे चौघे बसलेले होते. त्यांनी तत्काळ उड्या मारल्या आणि ते कठड्याला धरुन ते बचावले. असे बोलले गेले. की, तेथे एक शेतकरी काम करीत होता. तेव्हा त्यांनी काही प्रश्न विचारले. मात्र, या विहिरीत आणखी एक व्यक्ती पिकअपसह बुडाला आहे असे म्हणून चौघांनी तेथून पळ काढला अशी चर्चा होती.
दरम्यान, पहाटे पाच वाजता स्थानिक लोकांनी पोलीस प्रशासनास संपर्क केला. तेव्हा पोलीस गाडी ही खांडगाव परिसरात होती. ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. आम्ही कोणाच्या मागे लागलो नव्हतो असे देखील त्यांनी तेथे स्पष्ट केले. मग या तरुणांच्या मागे लागलेली गाडी कोणती होती? जर गाडी मागे लागली नव्हती. तर, जे तरुण विहरी बाहेर होते. त्यांनी पळ का काढला? त्यांनी मित्रास बाहेर काढण्याचा प्रयत्न का केला नाही? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. याची चौकशी पोलीस करतीलच. मात्र, ती चौकशी म्हणजे झाकली मुठ सव्वा लाखाची याच म्हणीप्रमाणे..! होऊ नये अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती.
दरम्यान, सकाळी महसुल आणि पोलीस यांनी पुन्हा घटनास्थळी भेट दिली. विहिरीत गेलेली पीकअप काढण्याचा प्रयत्न केला. क्रेन देखील नेले पण ते खोलवर पोहचले नाही. गोताखोर देखील नेले पण विहिरीत ऑईलचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांना खोलवर जाणे शक्य झाले नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विहिरीच्या बाजुला एक तलाव आहे. त्यामुळे, पाणी उपसा करुन देखील विहिर खाली होत नाही. त्यामुळे, १२ तास उलटले. तरी ना पिकअप वर काढता आली होती. ना मृतदेह हाती आला होता. या सर्व प्रकारामुळे, पोलीस, महसुल आणि वाळु चोरी यांची डोकेदुखी वाढली होती. दरम्यान, हा तरुण मयत आहे की तो गाडी सोडून पळाला यावर साशंकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, एकीकडे ना.विखे पाटील राज्याला दिशादर्शक असे वाळु धोरण करत आहे. सर्वसामान्य माणसाला खिशाला झळ बसणार नाही. अवैध उत्खनन होणार नाही. याची काळजी घेत आहे. आणि त्यांचाच एक कार्यकर्ता अवैध वाळु वाहून या धोरणाला हरताळ फासत आहे. महसूलमंत्री ना. विखे पाटील यांचे विश्वासु असलेले मालुंजेचे माजी सरपंच संदिप घुगे हे पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहे. ना. विखे पाटील यांनी नेहमी वाळु वरून संगमनेरच्या लोकप्रतिनिधींवर टिका केली. मात्र, आता ना. विखे पाटील यांचेच विश्वासू असलेले मालुंजेचे माजी सरपंच संदिप घुगे यांनी शेडगाव मधुन जेसीबीच्या सहाय्याने 100 ते 150 डंपर वाळु बेकायदेशीर उत्खनन केली आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केला आहे. यावरून तहसीलदार धीरज मांजरे यांनी नोटीस देखील काढली आहे. खरंतर, जेव्हा जेव्हा ना. विखे पाटील संगमनेरात आले तेव्हा वाळु विषय छेडला आहे. येथे वाळु माफियाराज चालतो. वाळुवाल्याना पाठीशी घालणारे नेते आहेत. त्यामुळे, येथे वाळूतून अर्थकारण चालते. आता मात्र, त्यांचे खंदे समर्थक असलेले संदिप घुगे यांनी गावातील गावगुंडाच्या मदतीने वेळोवेळी दिवाळीची सुट्टी पाहुन मोठ्या प्रमाणात अवैधवाळुचे उत्खनन केले आहे. येथे नदीतून वाळूचा खडा ही बाहेर येणार नाही असे नियोजन करणारे ना. विखे पाटील यांचेच कार्यकर्ते जेसीबी डंपरच्या सहाय्याने वाळु वाहत असतील तर हे दुर्दैव आहे. त्यामुळे, घुगे यांच्या सारख्या कार्यकर्त्यांमुळे ना. विखे पाटील हे टीकेचे धनी ठरतात. ना. विखे साहेबांना कल्पना ही नसेल असे नको ते उद्योग पाठीमागे कार्यकर्ते करतात. त्यामुळे, ना. विखे पाटलांनी आशा कार्यकर्त्यांची वेळीच कानउघडणी करायला हवी.