अर्रर्र.! सासर्‍याला मारुन नवर्‍याने बायको पळविली, पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल, पण ती नेली कोठे, तपास सुरू.!

सार्वभौम (संगमनेर) :- 

 पतीपत्नी यांचे एकमेकांशी पटत नसल्याने त्यांच्यात वाद सुरू असून तो न्यायप्रविष्ट आहे. तरीख अटोपली आणि मुलगी ही आपल्या पत्यासोबत घरी जात असताना पतीने तिला रस्त्यात आडविले आणि थेट गाडीत घालून पळवून नेले. यावेळी जावयास सासर्‍याने विरोध केला असता त्यांना मारहाण करुन मुलगी पळवून नेली. ही कौटुंबिक घटना शनिवार दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी संगमनेर तालुक्यातील डेरेवाडी फाट्याजवळ घडली. नवर्‍याने बायकोला बळजबरीने पळवून नेले असे म्हणत सासर्‍याने थेट पोलीस ठाणे गाठले आणि जावयासह सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात शुभम आनंद कोल्हे, आनंदा महादु कोल्हे, ऋतीक कोल्हे (रा. कोल्हेवाडी) याच्यासह काही अज्ञात व्यक्ती आणि महिलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बु परिसरात राहणार्‍या एका तरुणीचा विवाह गेल्या दोन वर्षापुर्वी कोल्हेवाडी येथे राहणार्‍या शुभम सोबत झाला होता. लग्नानंतर थोडे दिवस यांचे सर्व काही अलबेले सुरू होते. मात्र, संसारात अन्य व्यक्तींचा हस्तक्षेप आणि गैरसमज यातून या पतीपत्नी यांच्यात कायम वाद होऊ लागले. याबाबत मुलगी जे काही सासरी घडते, ते माहेरी सांगत होती. त्यामुळे, यांना देखील मुलीची काळजी वाटत होती. मात्र, आज ना उद्या पाहुणे सुधरतील, मुलीला जीव लावतील, तिला समजून घेतील असे वाटत होते. मात्र, दोन वर्षे होत आले तरी यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नव्हती.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपुर्वी मुलगी माहेरी निघुन गेली आणि त्यांनी थेट पती, सासू सासरे, दिर यांच्यासह अन्य काही व्यक्तींवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्याचे ठरविले. त्यानुसार यांनी पुढे कायदेशीर कार्यवाही देखील सुरू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून दोन्ही बाजुच्या व्यक्तींना आज संगमनेर कोर्टात हजर राहण्याचे आदेश आलेले होते. जेव्हापासून तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून मुलगी ही आपल्या वडिलांच्या घरीच होती. त्यामुळे, पतीला भेटणे, बोलणे यापासून पुर्ण संपर्क तुटलेला होता. त्यात आता कोर्टात खेटा मारायच्या म्हटल्यावर प्रश्‍न फारच गंभिर होऊन गेला होता. मात्र, आता या सर्व गोष्टींना सामोरे जाणे हे अनिवार्य होते. त्यामुळे, ठरल्यानुसार मुलीला तिचे वडील गाडीवर घेऊन आले होते. तर, पती व त्याचे कुटुंब मोठ्या गाडीत आले होते.

दरम्यान, त्या दिवशी कोर्टाचे कामकाज आटोपले आणि वडिलांनी मुलीस गाडीवर टाकून थेट घराकडची वाट धरली. दोघांनी धांदरफळ जवळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापुर्वीच डेरेवाडी फाट्याजवळ त्यांना एक चारचाकी गाडी आडवी आली. त्यातून शुभम कोल्हे खाली उतरला त्याने आपल्या पत्नीचा हात पकडला आणि गाडीत चल असे म्हणून तिला विनंतीवजा सुचना केली. मात्र, त्या क्षणी वडिलांनी विरोध करण्यास सुरूवात केली. मात्र, ऋतीक आणि आनंदा यांनी खाली उतरुन मुलीच्या वडिलांना धक्काबुक्की केली. त्यांना मारहाण करुन मुलीस बळजबरीने गाडीत बसविले आणि ते मुलीस घेऊन निघुन गेले. त्यानंतर शुभमच्या सासर्‍यांनी थेट पोलीस ठाणे गाठले आणि आपल्या मुलीचे जावयाने अपहरण केले अशा प्रकारे गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, एकीकडे अनेक संसार मोडताना आपण पाहतो आहे. त्यामुळे एखाद्या जोडप्यास सोडचिठ्ठी घ्यायची असेल. तर, त्यांनी पुन्हा एकत्र यावे म्हणून सहा महिन्यांचा कालावधी दिला जातो. यात जर पती मुलीस नांदविण्यास नेत असेल तर हरकत काय आहे? मात्र, पत्नीत माहेरी नेण्याची ही पद्धत चुकीची आहे. याचे कोणीच समर्थन करु शकत नाही. तरी देखील पती आणि पत्नी यांच्यात आजकाल जो दुरावा आणि मतभेद वाढत चालले आहेत. त्याला कारणीभूत बहुतांशी सासर आणि माहेर या कुटुंबातील अन्य व्यक्ती आहेत. त्यामुळे, सोडचिठ्ठी घेण्याचे प्रमाण वाढत चालले असून त्यातून गुन्हेगारी देखील वाढत चालल्याचे लक्षात येते. याचे एक उदा. म्हणजे संगमनेर खुर्द येथील तरुणाने शिर्डी परिसरातील सर्व कुटुंब खल्लास केले. कारण, होते ते फक्त माहेरच्या लोकांचा संसारात हस्तक्षेप. त्यामुळे अशा घटनांमधून प्रत्येकाने बोध घेतला पाहिजे.