दारु विक्रिचा व्हिडिओ व्हायरल का केला असे म्हणत तरुणास गचांडले, शाळेच्या जवळच दारुचा आड्डा, म्हणे आम्ही हाप्ते देतो, रेकॉडिंग व्हायरल.!

    

सार्वभौम (अकोले) :-

     तुझ्याकडे माझा दारु विक्रिचा व्हिडिओ आहे. तो तु व्हायरल का केला असे म्हणत एका व्यक्तीने तरुणाची भर चौकात गचांडी पकडून शिविगाळ दमदाटी केली. माझे व्हिडिओ व्हायरल करशील तर तुला महागात पडेल असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे शुक्रवार दि. २० रोजी  रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी ऋषीकेश रावसाहेब कानवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निशांत शांताराम पवार (रा. लिंगदेव. ता. अकोले) याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, लिंगदेव येथील एक रेकॉडिंग व्हायरल होत असून त्यात म्हणले आहे. की, आम्ही हाप्ते देतो आमचे कोणी काहीच वाकडे करु शकत नाही. त्यामुळे, दारु विक्रेत्यांची मुजोरी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, सोशल मीडियावर एक चैतन्यपुर परिसरातील एक गृप त्यात ऋषीकेश कानवडे हा देखील असून तेथे अवैध धंद्यांबाबत चर्चा चालु होती. मात्र, यात कानवडे याचा काही एक रोल नव्हता. मात्र, तरी देखील आरोपी निशांत पवार याने त्यास शुक्रवार दि. २० रोजी  रात्री १० वाजण्याच्या सुमारास आडविले आणि त्याला म्हणाला. की, तुझ्याकडे माझे दारु विक्री करतानाचे व्हिडिओ आहे. तो तु व्हायरल का केला? तेव्हा कानवडे हा त्यास म्हणाला. की, माझ्याकडे कोणताही दारू विक्रीचा फोटो नाही आणि मी काही व्हायरल देखील केले नाही. त्यामुळे, तु माझ्या नादाला लागू नको. मात्र, तरी देखील पवार याने कानवडेची गच्ची पकडून त्यास शिविगाळ दमदाटी करुन धमकी दिली. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे लिंगदेव गावात चार ठिकाणी दारु विक्रीचा व्यवसाय चालतो. हा सर्व बेकायदेशीर असून तेथे बनावट दारु विकली जाते. यात एक लाजिरवाणी बाब म्हणजे गेल्या महिन्यात शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्यावर अवैध धंद्यावाल्यांनी हल्ला केला होता. तेव्हाच शासनाने कायद्यावर बोट ठेवले होते. शाळेच आवारात शंभर यार्ड परिसरात कोणी दारू, मटका, जुगार, आफु, गांजा आणि तत्सम आम्ली पदार्थ विकायचे नाही. असे असताना देखील लिंगदेवच्या अगदी शाळेजवळ बिन्धास्तपणे दारु विक्रीचा व्यवसाय अगदी जोमात सुरु आहेे. भर दिवसा एकीकडे मुले पाढे पाठ करतात तर दुसरीकडे बेवडे झोकांड्या घेत बाहेर पडतात. यात कौतुकाची बाब म्हणजे गावाने शाळेसाठी लोकवर्गणी जमा करुन छान शाळा उभी केली आहे. मात्र, तिला बेवड्यांचे ग्रहन लागले आहे.

खरंतर अकोले तालुक्यात राजूर, समशेरपूर, देवठाण, विरगाव फाटा, कोतुळ, लिंगदेव अशा अनेक ठिकाणी मद्यविक्री व्यवसाय जोमात सुरू आहे. अनेकांना माहित नाही. मात्र, यावर छापे टाकणे, कारवाई करणे, प्रतिबंध करणे हे काम राज्य उत्पादन शुल्क या विभागाचे काम आहे. मात्र, संगमनेर येथील राज्य उत्पादन शाखेचे अधिकारी नेमकी काय करतात? असा प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे. डॉ. किरण लहामटे यांनी दारु आणि अवैध धंद्यांबाबत अधिकार्‍यांना सक्त ताकीद दिली आहे. मात्र, ज्या काही कारवाया होतात. त्या फक्त पोलीस निरीक्षक विजय करे यांच्याकडूनच होताना दिसतात. त्यामुळे, खरा अधिकार आणि जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची असून देखील ते निव्वळ मलिदे खाण्यात व्यक्त आहेत का? असा प्रश्‍न नागरिक विचारु लागले आहेत. तर, एका रेकॉडींग व्हायरल होत असून त्यात म्हटले आहे. आम्ही हाप्ते देतो त्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही. मग हे हाप्ते म्हणजे काय आणि ते कोणाला जातात? असे देखील प्रश्‍न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.