मा.झेडपी सदस्य बाजीराव दराडे याचा राजूर पोलीस ठाण्यात फुल राडा, दोन गटात झुंज नऊ जणांवर गुन्हे दाखल.!

     

सार्वभौम (राजूर) :-

                   पोलीस ठाण्यात माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी का आला? असे म्हणत एका व्यक्तीला राजुरच्या भर पोलीस ठाण्यात जिल्हा परिषदेचा माजी सदस्य तथा शिंदे गटाचा जिल्हा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे याने बेदम मारहाण केली. दराडे याच्यासह अन्य नऊ जणांनी पोलीस ठाणे अगदी डोक्यावर घेतले होते. ही घटना सोमवार दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाजीराव शंकर दराडे, संजय शंकर दराडे (रा. समशेरपूर, ता. अकोले), अनिल चंद्रभान वाकचौरे (रा. पिंपळगाव निपाणी, ता. अकोले), किशोर जगन्नाथ गायकवाड (रा. कळवण, नाशिक), संजय बन्सी दराडे, विठ्ठल बन्सी दराडे, सुमित सुनिल आव्हाड (रा. समशेरपूर, ता. अकोले), आकाश भागवत पवार आणि आकाश वाकचौरे अशा नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, अनेक गुन्हे दाखल असणार्‍या व्यक्तींना कायद्याचा धाक-दरारा आहे की नाही? की राजूर पोलीस ठाणे म्हणजे चंद्रपूर-गडचिरोली अशा नक्षलवादी भागात आहे का? जेथे भर पोलीस ठाण्यात दादागिरी आणि भाईगिरी होते. त्यामुळे, या गुन्ह्यात पोलीस फिर्यादी झाले, पण मग कलम ३५३, ३३२ सारखे कलम का लावले नाही? शेवटी पोलिसांना काम करु दिले नाही, हुज्जत घालुन राडा केला. मग कारवाई करताना कसूर का? असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, आकाश भागवत पवार हा राजूर पोलीस ठाण्यात बाजीराव दराडे आणि त्याच्या पंटरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आला होता. तो पोलीस ठाण्यात त्याची तक्रार सांगत होता. तोच अगदी गुंडागर्दी करीत तेथे काही लोक पोलीस ठाण्यात घुसले. खुद्द ठाणे अंमलदाराच्या कक्षेत त्यांनी पवार यास शिविगाळ दमदाटी सुरू केली. तेव्हा ऍट्रॅसिटी आणि अन्य गुन्ह्यात आरोपी असणारा बाजीराव दराडे हा तेथे आला. त्याने पवार यास दादागिरी केली. तो म्हणाला. की, तु आमच्या विरोधात तक्रार का देत आहेस? असे म्हणत शिविगाळ करीत तो पवारच्या अंगावर धावून गेला. त्याने गुन्हा दाखल करु नये यासाठी हे सर्व लोक बाहेरच्या लोकांवर तावतुगारी करीत होते. तर, यांना दराडे गटाने मारहाण केली.

दरम्यान, हा सर्व प्रकार खुद्द राजूर पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षेत सुरू होता. तेथे काही पोलीस देखील उपस्थित होते. दोन गट एकमेकांना भिडल्यामुळे राजूर पोलीस ठाण्याला अगदी कॉलेज कट्टा किंवा फ्रि स्टाईने हाणामारी करणारी फिल्मी शुटिंग असे रुप आले होते. यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित असणारे पोलीस कर्मचारी नेहे, फटांगरे आणि सांगळे यांनी बाजीराव दराडे आणि त्याच्या गड्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना देखील यात वाद सोडविताना चांगलीच धक्काबुक्की झाल्याचे बोलले जात आहे. दोन गटाची झुंज ती ही पोलीस ठाण्यात.! त्यामुळे राजूर शहरात आणि अकोले तालुक्यात चवीची चर्चा रंगली होती. की, भर पोलीस ठाण्यात अशा पद्धतीने गुंडगर्दी होत असेल. तर, पोलिस ठाण्यावर लोकांचा विश्‍वास राहिल का? जर स्वत:ला भाई, दादा, शेठ म्हणून घेणारे पोलीस ठाण्यात एकमेकांना झोंबत असतील. तर, सामान्य मानसांनी न्याय मागायला जायचे तरी कोणाकडे? त्यामुळे, या प्रकरणात केवळ साधी कारवाई नको.! तर, गंभीर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे.

एसपी साहेब.! तर दहशत माजेल.!

पोलीस अधिक्षक राकेश ओला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाचे नियोजन म्हणून गेल्या आठ दिवसांपासून राजुर हाद्दीत येत आहेत. ते ज्या हाद्दीत तळ ठोकून आहेत. त्याच ठिकाणी जर भर पोलीस ठाण्यात तक्रारदारावर हल्ला होत असेल. त्याची मुख्य बाजु ऐेकूण घेतली जात नसेल. तर त्या पोलीस ठाण्यचा उपयोग तरी काय? भर पोलीस ठाण्यात हल्ला होतो आणि त्यात वरिष्ठांना कळविल्यानंतर सर्वसाधारण कलमे नोंदून जसे काही घडले नाही. असा अविर्भाव दाखविला जातो. तर, उद्या कोणीही येईल आणि पोलीस ठाण्यात राडा घालुन जाईल. विशेष म्हणजे ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडून असे झाले. तर, वर्दी आणि पोलीस ठाणे म्हणजे त्यांच्यासाठी खेळणे नाही तर काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे, पोलीस ठाण्यात हल्ला करणार्‍यावर कलम ३५३, ३३२ नुसार कारवाई करावी आणि संबंधित तक्रारदारावर जो हल्ला झाला. त्याला त्याची फिर्याद दाखल करु द्यावी अशी मागणी तक्रारदार यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

क्रमश: