छी.! दांडियाच्या कार्यक्रमात महिलेचा हात पकडून घाणेरडे कृत्य, हॉटेल चालकाचे अश्‍लिल चाळे, गुन्हा दाखल.!



अकोले (सार्वभौम) :- 

देवीच्या उत्सवात संगीत खुर्ची आणि दांडीया खेळण्यासाठी गेलेल्या महिलेची एका हॉटेल चालकाने छेडछाड केली. तिला शिविगाळ, दमदाटी करीत अक्षरश: घाणेरड्या भाषेत बोलुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ही घटना अकोले तालुक्यातील विरगाव येथे बुधवार दि. १८ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी राहुल वसंत वाकचौरे (रा. विरगाव, ता. अकोले) याच्यावर पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत फिर्यादीत म्हटले आहे. की, बुधवारी रात्री काम आटोपल्यानंतर पीडित महिला आणि तिचा मुलगा विरगाव गावात संगीत खुर्ची आणि दांडीया खेळण्यासाठी गेले होते. तेथे संगीत खुर्ची हा खेळ आटोपल्यानंतर टपर्‍या खेळणे सुरू झाले. महिलांचे खेळ सुरू असताना आरोपी राहुल वाकचौरे हा तेथे आला आणि पीडित महिलेचा त्याने हात पकडला. महिलेने त्यास विरोध केला असता तो तिला म्हणाला. की, तुझी काय लायकी आहे मला माहित आहे असे म्हणून अतिशय गलिच्छ भाषेत त्याने महिलेशी चाळे करण्यास सुरुवात केली. तुला मी सोडणार नाही, तुझा कोठे ना कोठे काटा काढतो असे म्हणून त्याने धमकी दिली. देवीच्या कार्यक्रमात एकच गर्दी झाल्यामुळे त्याने तेथून काढता पाय घेतला.

दरम्यान, महिला ही एकटी आहे त्यामुळे राहुल वाकचौरे हा नेहमी तिची काही ना काही कुरातप काढत असतो. गेल्या काही दिवसांपासून त्याच्याकडून पीडित महिलेस प्रचंड त्रास होत आहे. मात्र, आपल्या मागे कोणी उभे राहणारे नाही, कोणाचे भक्कम पाठबळ नाही त्यामुळे याचे घालुन पाडून बोलणे आणि अश्‍लिल वागणे याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न पीडित महिलेने केला होता. मात्र, त्याचे अति होत चालले होते. आज गुरूवार दि. १९ ऑक्टोबर रोजी महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले. राहुल वाकचौरे याच्याकडून होणारा त्रास पोलिसांना कथन केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सर्व प्रकार लक्षात घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर  वाकचौरे याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरंतर, नऊ दिवस देवी बसलेली असते. प्रत्येक महिलेत तिचे अस्तित्व असते असे म्हटले जाते. त्यामुळे, नवरात्रीत एखाद्या महिलेची छेडछाड होणे ही फार दुर्दैवी बाब आहे. विशेष म्हणजे विरगाव हे एक वैचारिक गाव आहे. गावाच्या नावातच वीर असा शब्द आहे. त्यामुळे, ज्याने हे कृत्य केले. त्याने आत्मचिंतन केले पाहिजे असे मत गावकर्‍यांनी व्यक्त केले आहे. या घटनेतील दुर्दैव म्हणजे हा प्रकार खुद्द देवीच्या कार्यक्रमात होणे म्हणजे विकृत पणाचे लक्षण असल्याची मत अनेकांनी व्यक्त केले. मात्र, महिलांना देखील हातबल न होता त्यांनी त्यांच्यातील दुर्गा, कालिका, महाकाली यांचे रुप धारण केले पाहिजे आणि अशा छेडछाड करणार्‍यांना धडा शिकविला पाहिजे.