मातब्बर राजकारणी लोखंडेंच्या दिमतील.! खरोखर काम केले तर विजय निच्छित.! विखे, मुरकुटे, लंघे, कोल्हे, कांबळे, पिचड, लहामटेंवर मदार.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

शिर्डी मतदार संघात सदाशिव लोखंडे यांना तिसर्‍यांदा उमेदवारी मिळाली आहे. राज्यात भाजपाने शिंदे व दादा गट फोडल्याने कट्टर विरोधक आता मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे, लोकसभा निवडणुकीत काही उमेदवारांच्या मागे प्रचंड मोठी ताकद दिसू लागली आहे. मात्र, यातील किती आजी-माजी आमदार प्रामाणिकपणे काम करतात हे देखील फार महत्वाचे आहे. आज सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी शिर्डी-राहाता येथून विखे पाटील, नेवाशातून माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघेे, कोपरगावमधून आ. आशितोष काळे, व माजी. आ. काळे, श्रीरामपूर येथून स्वत: सदाशिव लोखंडे, मा. आ. भाऊसाहेब कांबळे, संगमनेरात फारसा दखलपात्र चेहरा नाही. मात्र, अमोल खताळ आणि हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्ते, अकोल्यातून माजी मंत्री मधुकर पिचड व मा. आ. वैभव पिचड यांच्यासह आमदार डॉ. किरण लहामटे अशा दिग्गज नेत्यांनी सदाशिव लोखंडे यांची प्रचार गाडी फुल भरली आहे. जर, यांनी प्रामाणिक काम केले लोखंडे निवडून येतील. अन्यथा विधानसभेला लक्ष द्या, लोकसभेला तुम्ही तुमचे पहा हा जागतीक नारा लोखंडे यांच्यासाठी घातक ठरु शकतो.

नेवासा विधानसभा व लोकसभा..

नेवासा तालुक्यात एकुण २ लाख ७४ हजार ८५९ मतदार लोकसभेला आहेत. येथे गेली अनेक दशके नेवाशात गडाख कुटुंबियांनी आपले निर्पेक्ष राजकारण केले. मात्र, त्यानंतर जनतेने २०१४ साली बाळासाहेब मुरकुटे हे वारकरी व अध्यात्मिक चेहरा म्हणून पर्याय शोधला होता. तो फक्त पाच वर्षे त्यानंतर पुन्हा गडाख साम्राज्य सुरू झाले. त्यानंतर विठ्ठळराव लंघे यांना देखील भाजपाने उत्तर जिल्हाध्यक्ष म्हणून नेमला आहे. त्यामुळे, नेवाशातून लोखंडे यांच्यासाठी मतांची गोळाबेरीज करण्यासाठी दोघे प्रयत्नशिल आहेत. मात्र, गडाख यांची नेवाशावर एक हाती सत्ता आहे. त्यामुळे, तेथे शिवसेनेसाठी चांगले वातावरण असू शकते. मात्र, वंचित या ठिकाणी फार मागे दिसून येणार आहे. तुलनात्मक येथे वाकचौरे आणि लोखंडे यांच्यात टक्कर होईल अशा प्रकारचे वातावरण आज आहे. त्यात याच मतदारसंघात अशोकराव गायकवाड देखील आहेत, जे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे, तेथे वंचिला मतदान होऊ देणार नाही. त्यांनी प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्यावर गेल्या चार दिवसांपुर्वीच सडकून टिका केली होती. त्यांना नेवाशात मानणारा दलित समाज फार मोठ्या प्रमाणावर आहे.

कोपरगाव विधानसभा व लोकसभा...

कोपरगाव तालुक्यात एकुण २ लाख ७९ हजार ६०९ मतदार लोकसभेला आहेत. येथे काळे आणि कोल्हे यांच्यातील राजकीय रस्सीखेच ही ऐतिहासिक आहे. मात्र, २०१४ मध्ये स्नेहलता कोल्हे या भाजपाकडून आमदार झाल्या होत्या. त्यानंतर २०१९ मध्ये आशितोष काळे यांनी राष्ट्रवादी तिकीटावर बाजी मारुन ते आमदार झाले. मात्र, राज्यात फाडणविस आणि अजित पवार राजकीय दृष्ट्या एकरुप झाल्यामुळे काळे व कोल्हे यांच्यात अधिक संभ्रम निर्माण झाला. आता कोपरगाव जागा पुन्हा राष्ट्रावादीच्या पारड्यात जाणार म्हटल्यानंतर कोल्हेची गोची झाली. त्याचाच एक भाग म्हणून की काय.! गणेश कारखान्यात विवेक कोल्हे कॉंग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्यासोबत दिसले. तो कारखाना यांनी विखेंच्या ताब्यातून घेतला सुद्धा. मात्र, लोखंडेंच्या प्रचाराचे काय? हा मोठा प्रश्‍न होता. त्यावर आज दि. ६ मे २०२४ रोजी मा.आ. स्नेहलता कोल्हे ह्या लोखंडे यांचा प्रचार करताना दिसल्या. तर, काळे यांनी प्रचार असा काही तसा काही सुरच ठेवलेला आहे. मात्र, लोकसभा ही दोघांसाठी महत्वाची नसली. तर, विधानसभेसाठी दोघांमध्ये पुन्हा जंग पहायला मिळणार आहे. या प्रक्रियेत विवेक कोल्हे यांनी मात्र, विवेकी भुमिका घेतल्याचे दिसते आहे. अर्थात येथे काळे आणि कोल्हे लोखंडे यांच्यासाठी मैदानात दिसत आहे. मात्र, वंचित साठी देखील लोक अग्रही असून तेथे प्रचार यंत्रणा कमी पडत असल्याचे स्थानिक पत्रकार व विश्‍लेषकांचे मत आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ...

शिर्डी- राहाता तालुक्यात एकुण२ लाख ८० हजार २५७ मतदार लोकसभेला आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात लोखंडे यांच्यासाठी चांगली परिस्थिती राहू शकते. येथे एकनाथ गोंदकर हे कॉंग्रेसचे नेते असून राहता तालुक्यातील वाकडी गटावर विवेक कोल्हे यांचे प्राबल्य आहे. तरी देखील विखे पाटलांना ठरविल्यास लोखंडे यांच्यासाठी कोणत्याही क्षणाला ते वातावरण फिरवू शकतात. सध्या कोल्हे आणि विखे यांच्यात फारसे साख्य नाही. त्याचा तोटा जरी होऊ शकला तरी संगमनेर तालुक्यातील जोर्वे आणि तळेगाव हे विखे पा. वातावरण फिरवतील अशा स्थिती आहे. येथे संस्थात्मक व कारखानदारी असा मोठा मतांचा एकगठ्ठा आहे. त्यामुळे, सदाशिव लोखंडे हे फारसे फिरण्यापेक्षा नेत्यांच्या मर्जीतून लोकांपर्यंत सुविधा देण्याचे काम करत आले आहे. त्यामुळे, आता हे नेते त्यांना तारतात  का? हे पाहणे फार महत्वाचे आहे. 

श्रीरामपूर मतदारसंघ व लोकसभा

श्रीरामपूर तालुक्यात एकूण ३ लाख २ हजार १३३ मतदार आहेत. येथे दलित मतांचा फार मोठा आकडा आहे. त्यावर बर्‍यापैकी लोकसभेचे राजकारण प्लस मायनस होऊ शकते. श्रीरामपूरमध्ये वंचितला बर्‍यापैकी प्रतिसाद असून कॉंग्रेसचे करण ससाणे, आमदार लहु कानडे यांच्यावर बर्‍यापैकी मतदार अवलंबून आहेत. विशेष म्हणजे दलित मतांसोबत मुस्लिम मते देखील निर्णायक असून ते किती प्रमाणात वंचित, वाकचौरे आणि लोखंडे यांना चालवितात हे पहाणे देखील महत्वाचे ठरेल. सदाशिव लोखंडे हे श्रीरामपूर येथे कामय मुक्कामी असून त्याचा बर्‍यापैकी फायदा त्यांना होऊ शकतो. तसेच कॉंग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी देखील कॉंग्रेसला रामराम केला असून त्यांची मदत देखील लोखंडे यांना होणार आहे. विशेष म्हणजे येथे हिंदुत्ववादी संघटना मोठ्या प्रमाणावर असून त्यांनी लोखंडे यांना समर्थन दिले आहे. हे असे असले तरी श्रीरामपुरात दलित आणि मुस्लिम मते हे निर्णायक भुमिका निभावणार आहेत.

संगमनेर मतदारसंघ आणि लोकसभा

संगमनेर तालुक्यात २ लाख ७९ हजार ७९१ हजार मतदार आहेत. येथे बाळासाहेब थोरात यांचे संस्था आणि विधानसभेला कायम वर्चस्व राहिले आहे. मात्र, एकेकाळी लोकसभेच्या वेळी त्यांच्याच उमेदवाराला संगमनेरातून ७ हजारांनी कमी लिड होते. त्यामुळे, येथे शिवसेना, भाजपा, हिंदुत्ववादी संघटना यांचा नेहमी वरचष्मा राहिला आहे. तसेच संगमनेरात आजकाल शिंदे व विखे पाटील यांचे गट देखील सक्रिय झाला असून त्या निमित्ताने लोखंडे यांना जमेची बाजू असणार आहे. तसेच जोर्वे, तळेगाव येथून विखे तर, पठार भागावर डॉ. लहामटे व पिचड यांची सरशी आहे. त्यामुळे, हे लोक किती नेटाने या विभागांमध्ये लक्ष घालतात हे फार महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे संगमनेरात कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते वंचितला सपोर्ट करताना दिसत आहेत. त्याचा तोटा हा भाऊसाहेब वाकचौरे यांना होणार असून हा बंडखोर मतांचा आकडा अकोले संगमनेरातून फार मोठा असणार आहे. संगमनेरातून डॉ. सुधिर तांबे, आ. सत्यजित तांबे हे देखील अंतर्गत काय भुमिका घेतात त्यानुसार संगमनेर तालुक्याचे मतदान होणार आहे. येथे वंचित फार मोठा फटका देणार हे बाकी निच्छित.!

अकोले मतदारसंघ व लोकसभा..

अकोले तालुक्यात २ लाख ६० हजार ६८६ मतदार आहेत. येथे माजी मंत्री मधुकर पिचड, मा. आ. वैभव पिचड, सहकार महर्षी सिताराम पा. गायकर आणि डॉ. किरण यांच्याकडे मतांची फार मोठी बँक आहे. सध्या अकोल्याचे राजकारण याच तीन व्यक्तींच्या भोवती फिरत असून त्यांच्या भुमिका फार महत्वाच्या असणार आहे. सदाशिव लोखंडे यांच्यासाठी अकोले तालुका हा तारणकर्ता ठरु शकतो. शहरातून पिचड, मुळा भागातून गायकर, आदिवासी पट्ट्यातून लहामटे व आढळा पट्ट्यातून बाजिराव दराडे यांनी जरी नेटाने प्रचार केला किंवा प्रॉपर बुथ संभाळले तरी अकोल्यातून लोखंडेंना लिड असू शकते. मात्र, येथे जितकी मते वाकचौरे यांना असतील तितकी दोन्ही उमेदवारांची मते वंचित खाणार आहे. आता फक्त नेते किती प्रमाणिक काम करतात, मतदार किती नेत्यांचे एकतात आणि अंतीमत: किती अर्थपुर्ण यंत्रणा हलते यावर सर्व तालुक्यातील राजकारण फिरणार आहे.