वंचित म्हणजे उत्कषा रुपवते यांना उशिरा सुचलेले शहाणपण की वेडेपण.! हा नव्हे.! तो निर्णय घेतला असता तर त्या खासदार असत्या.!

     

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे ही फार मोठी कसरत असते. फसला तो संपला असा प्रकार बहुदा राजकीय परिघावर पहायला मिळतो. म्हणून कोठे चालायचे आणि कोठे थांबायचे हे राजकीय निर्णय किंवा डावपेच दादासाहेब रुपवते यांच्यानंतर ना बाबुजींना आले ना उत्कर्षा रुपवते यांना. कारण, जेव्हा ठाकरे गटातून सदाशिव लोखंडे हे बाहेर पडले, त्या क्षणी उत्कर्षा रुपवते यांनी कॉंग्रेसचे कौतूक बंद करुन (उबाठा) शिवसेनेत प्रवेश करायला पाहिजे होता. शिवसैनिक होऊन अंतर्गत तिकीटासाठी बाळासाहेब थोरात यांची मदत घ्यायला हवी होती. मात्र, कॉंग्रेसला जागा सुटेल आणि मग मी तेथे लढेल हे राजकीय शहाणपण त्यांना कोणी दिले कोणास ठाऊक. खरंतर तीन वेळा लाखोंच्या मतांनी निवडून येणारी ठाकरेंची जागा ते कॉंग्रेसला सोडतील कसे? हे म्हणजे कॉंग्रेसने बारामतीची जागा मागितल्यासारखे झाले असते. या दरम्यान, जुलै महिन्यात लोखंडे शिंदे गटात गेले आणि ऑगस्ट महिन्यात वाकचौरे पुन्हा ठाकरे गटात सामिल झाले. म्हणजे सौ चुहे खा कर बिल्ली काशी जा सकती हैं.! मात्र, रुपवते एक नितळ, निर्मळ, प्रांजळ व सुशिक्षित चेहरा काशीला जाऊ शकला नाही. हे राजकीय शहाणपण देणारे त्यांच्याकडे कोणी नव्हते का? एव्हाना कॉंग्रेस सोडून खासदारकी लढविण्याची इच्छा होतीच तर हा निर्णय तेव्हा का घेतला नाही? जर आज वाकचौरे यांच्या आधी रुपवते मातोश्रीवर असल्या तर ३ लाखांपेक्षा जास्त मतांनी त्या निवडून आल्या असत्या. आता मात्र, वंचितमध्ये जाऊन ही त्यांची राजकीय आत्महत्या आहे का? की खर्‍या अर्थाने राजकीय सुरूवात हे येणारा काळच ठरु शकतो.

वेळ निघुन गेल्यानंतर कॉंग्रेसचा हात सोडून ताई वंचित झाल्या. आज दोन उमेदवारांना पर्याय म्हणून त्यांना अनेकांनी पसंती दिली आहे. मात्र, केवळ बौद्ध उमेदवार म्हणून त्यांची यंत्रणा ज्या पद्धतीने काम करते आहे त्यावर त्यांची नाव संसदेत पोहचेल असे वाटत नाही. अन तसेही बौद्ध म्हणून प्रेमानंद रुपवते यांना देखील २००९ मध्ये किती मते पडली? तर फक्त २१ हजार त्यामुळे, त्यांना वेगळ्या पद्धतीने आणि स्थानिक बड्या नेत्यांना हाताशी धरुन प्रचार यंत्रणा फिरवावी लागणार आहे. कारण, येथे संस्था आणि कारखानदारी यावर मतांची गोळाबेरीज होते. मात्र, ताईंना येथे वंचितच अडसर ठरु पहात आहे. कारण, रुपवते यांनी विखे पाटील यांची भेट घेऊन मदत मागितली. तर, त्यांचे राज्याचे नेते किसन चव्हाण हे विखेंच्या विरुद्ध दक्षिणेत दंड थोपटत आहे. त्यामुळे, विखेंचे जे कार्यकर्ते शिर्डी मतदार संघात आहेत त्यांनी रुपवते यांच्याकडे सभा झाल्यानंतर पाठ फिरविल्याचे दिसते आहे. त्यामुळे, त्यांना ही निवडूक फक्त भावनेवर नव्हे.! तर युक्तीने सुद्धा लढवावी लागणार आहे. अन्यथा एकतर संसद किंवा पुन्हा मुंबई असा प्रवास त्यांना करावा लागणार आहेे.

खरंतर संगमनेरात बाळासाहेब थोरात यांची एकहाती सत्ता आहे. मात्र, तरी देखील कॉंग्रेसच्या उमेदवाराला संगमनेरात ७ हजार मते लिडने कमी पडले होते. आता रुपवते यांना कॉंग्रेसने अंतर्गत मदत केली. तर, बाळासाहेब थोरात फक्त विधानसभेपुरते बादशाह असे म्हटले तर काहीच वावघे ठरणार नाही. त्यामुळे, त्यांना यंदा ताकद दाखवावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य पाहिले तर ते नाशिक पदविधर मतदारसंघाच्या निवडणुकीप्रमाणे हाताची घडी तोडावर बोट अशा पद्धतीचे नाही. त्याहून असे लक्षात येते. की, ते वंचितला समर्थन देतील असे वाटत नाही. म्हणून रुपवते यांनी तेथे अधिक ताकद लावणे गरजेचे आहे. नेवासा, कोपरगाव, शिर्डी, राहाता, अकोले, संगमनेर येथे नेत्यांच्या मागे असणारा मतदार हा मोठा असून त्यांच्या बुथ नियोजनाने जे लिड मिळणार आहे. ते तोडण्यात रुपवते यांना यश येईल की नाही याची देखील फार मोठी शंका आहे. अर्थात मिळालेला वेळ आणि केलेले काम हे उल्लेखनिय असले तरी पराभवानंतर पुन्हा उभे राहणे म्हणजे राजकीय आत्महत्या केल्यासारखे आहे. म्हणून अधिक समग्र व नेटाने काम करणे अपेक्षित आहे. अर्थात पायाने चालण्यापेक्षा बुद्धीने जास्त अंतर काटने त्यांच्यासाठी गरजेचे आहे.

खरंतर रुपवते यांची राजकीय स्थिती फार गंमतशिर आहे. कारण, जेव्हा निवडणुक लागली तेव्हा लोकांना ना लोखंडे मान्य होते ना भाऊसाहेब वाकचौरे. अन  उत्कर्षा रुपवते रिंगणात आल्या तर त्यांचा पक्ष लोकांना मान्य नव्हता. म्हणजे दोन उमेदवार मान्य नाही अन एक मान्य आहे तर त्यांचा पक्ष लोकांना मान्य नाही. अशा कचाट्यात रुपवते यांची उमेदवारी काही लोकांनी स्विकारली तर काहींनी त्यांना रामराम केला. त्यामुळे, कोणताही बडा नेता नाही, राजकीय वरहस्त नाही, आर्थिक पाठबळ नाही अशात खासदारकी लढवायची ते ही धनबलाढ्य व राजकीय मुरब्बी उमेदवारांच्या समोर. हे फार कठीण आहे. तरी देखील त्यांनी मैदान गाजविण्याचा प्रयत्न केला आहे. अंतीमत: हे वातावरण आणि त्यांच्या सोबत असणारे कार्यकर्ते किती दिवस तग धरतील देव जाणे.! कारण, शिर्डी मतदार संघाचा इतिहास आहे. अंतीमत: अनेकदा वातावरण वेगळे आणि वास्तव वेगळे दिसले आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे २०१९ साली सदाशिव लोखंडे यांचा विजय होय. कर्जत तालुक्यात १५ वर्षे आमदार आणि शिर्डीत १० वर्षे खासदार होणार्‍या व्यक्तीकडे नक्कीच निवडणुकीचे व्हिजन असेल. तर, भाऊसाहेब लोखंडे यांच्याकडे बुद्धीचातुर्य यात रुपवते यांचा ठाव कसा लागेल हे येणारी चार तारीख ठरविणार आहे.

मुळात इतकी वर्षे राजकारणात असणार्‍या रुपवते यांच्याकडे शिर्डी लोकसभा म्हणून काही व्हिजन होते की नाही हाच प्रश्‍न पडतो. कारण, कॉंग्रेसने तिकीट दिले नाही म्हणून डॉ. सुजय विखे भाजपात गेले आणि खासदार सुद्धा झाले. कॉंग्रेसने डावलले म्हणून सत्यजित तांबे अपक्ष लढले आणि आमदार देखील झाले. शिवसेना आणि हिंदुत्वावर टिका करणार्‍या सुष्माताई आंधारे यांना सुद्धा समजले. की, आता हीच वेळ आहे आपण राजकीय करिअर करण्याची, त्यांनी सर्व वैचारिक अधिष्ठाण सोडून शिवबंधन बांधले आज त्यांच्याकडे प्रचारासाठी हेलिकॅप्टर आहे. अशी कित्तेक उदाहरणे देता येतील. इतकेच काय.! नगर शहरात राहणारे अशोक गायकवाड यांनी देखील शिर्डी व शिवसेने हे गणित पाहून शिवसेनेत प्रवेश केला. मग अनेक अभ्यासकांना प्रश्‍न पडला. की, हे शहाणपण उत्कर्षाताई रुपवते यांना तेव्हा का आले नाही. जेव्हा सदाशिव लोखंडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि उद्धव ठाकरे यांची शिर्डीची जागा मोकळी करुन दिली. जर कॉंग्रेस सोडायचीच होती आणि शिर्डी लढवायचीच होती तर यांच्याकडे राजकीय व्हिजन नव्हते का? म्हणजे ठाकरेंशी गद्दारी करुन वाकचौरे पुन्हा संधी साधू शकतात  आणि मातोश्री त्यांना माफ करते तर रुपवते यांच्यासाठी नगर जिल्ह्यातील कित्तके शिवसैनिकांनी पुढाकार घेतला असता. कदाचित असे झाले असते तर आज मोंदींच्या बरोबरीने लिड घेऊन रुपवते खासदार असत्या. 

आ.थोरात तथा कॉंग्रेस दोषी नाही.!

एखाद्या जागेवर एखाद्या पक्षाचा तीन वेळा खासदार निवडून आला असेल तर ती जागा दुसर्‍या पक्षाला देणे राजकीय दृष्ट्या संयुक्तीक मुळीच नाही. त्यामुळे, कॉंग्रेसने शिर्डीची जागा मागितली आणि ती शिवसेने दिला नाही. यात कोणतेच गैर नाही. त्यात उत्कर्षा रुपवते यांच्यासाठी जागा सोडावी इतके सामाजिक पाठबळ आणि राजकीय वरदहस्त मुळीच नव्हता. मुळात मुंबईच्या जागेपासून ते महाराष्ट्रातील अन्य काही जागांवरुन महाविकास आघाडीत तू-तू मै-मै सुरू होती. अशात शिवसेनेची हक्काची जागा ते सोडतील अशी सुत्राम शक्यता नव्हती. मात्र, जर आघाडी झाली नसती तर रुपवते यांना कॉंग्रेसने शंभर टक्के उमेदवारी दिली असती. त्यामुळे, कॉंग्रेसकडे हट्ट करण्यापेक्षा त्यांनी पुर्वीच योग्य निर्णय घ्यायला हवा होता. त्यात आज त्या आणि वंचितचे काही कार्यकर्ते कॉंग्रेसला किंवा बाळासाहेब थोरात यांना दोषी धरतात हे मात्र, चुकीचे आहे. कारण, पक्ष आणि कार्यकर्ते यात संधी ही फार तुरळक असते. त्यामुळे, अनेकांनी वेगळ्या चुली मांडल्या आहेत. त्यात सत्यजित तांबे आणि डॉ. सुजय विखे हे त्यातील ज्वलंत उदाहरणे आहेत.