वंचितच्या उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांच्यावर जिवघेणा हल्ला.! गाडीवर दगडफेक करुन आरोपी पसार, निच पातळीची मानसिकता.!
सार्वभौम (अकोले) :-
वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षाताई रूपवते यांच्यावर अकोले तालुक्यातील चितळवेढे परिसरात रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुपवते ह्या राजूर परिसरात प्रचार करुन अकोल्याकडे येत होत्या. चितडवेढे गावाच्या पुढे आल्यानंतर त्यांच्या गाडीवर अचानक दगडफेक झाली. त्यांचे दैव बलोत्तर होते म्हणून त्यांना काही होऊ शकले नाही. मात्र, त्यांच्या गाडीची फार मोठी नुकसान झाली आहे. ही घटना घडल्यानंतर राजूर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित परिसरात नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडफेक करणारे त्यांच्या हाती लागले नाही. ही घटना राजकीय वैमनस्यातून किंवा आणखी काही कारणास्तव याबाबत सर्वजन अनभिज्ञ आहेत. मात्र, अशा प्रकारे हल्ला होणे ही निषेध व्यक्त करणारी बाब आहे. याचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी सायंकाळी उत्कर्षाताई रुपवते ह्या राजूर भागात गेल्या होत्या. दि. ७ मे रोजी त्यांना कोपरगाव येथे प्रचारार्थ जायचे होते. त्यामुळे, त्या राजूरहून निघाल्या होत्या. राजूर घाटात काम चालु असल्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून ड्रायव्हरने चितळवेढे गावातून गाडी घातली. मात्र थोडे पुढे आल्यानंतर त्यांच्या गाडीवर अचानक दगडफेक झाली. दगडे देखील मोठी होती त्यामुळे त्यांची एम.एच ०५ सीव्ही ९१९९ या गाडीची काच फुटली. त्यातून जी पावडर उडाली त्यामुळे रुपवते व वाहन चालकाच्या डोळ्यात गेली. त्यामुळे हल्ला कोणी केला हे लक्षात आले नाही.
दरम्यान, रुपवते यांच्यासह सोबत अन्य एक गाडी देखील होती. त्यांनी खाली उतरुन पाहिले तर कोणीच दिसले नाही. अंधार्या रात्री झालेल्या या हल्ल्यामुळे रुपवते आणि त्यांचे सोबत असणारे सर्वच घाबरुन गेले होते. त्यानंतर ताईंनी राजूर पोलीस ठाण्यात सदर घटनेची माहिती दिली. काही क्षणात राजूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गाडीवर झालेला हल्ला पाहून तपासाला सुरूवात केली. मात्र, रात्रीच्या वेळी त्यांना कोणीच दिसले नाही. त्यानंतर उत्कर्षाताई रुपवते आणि त्यांच्या सोबत असणार्या सर्वांनी राजूर पोलीस ठाणे गाठले आणि अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, ही घटना समजताच अकोले तालुक्यातील काही कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी उत्कर्षाताई रुपवते यांना धिर दिला. तर, या घटनेमागे कोणाचा हात आहे का? याला राजकीय रंग आहे का? आरोपी कोण आहेत? त्यांचा उद्देश काय आहे? ते काणाचे हस्तक आहे? याची सखोल चौकशी करुन आरोपींना तत्काळ बेड्या ठोकण्याची मागणी करण्यात आली. अर्थात ही घटना फार निंदनिय आहे. जर या घटनेला राजकीय रंग असेल तर राजकारण किती निच पातळीला चालले आहे याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. या घटनेचा पोलिसांनी सखोल शोध लावावा अन्यथा याचे दुरगामी परिणाम समाजिक घटनांवर होतील. म्हणून पोलिसांनी तत्काळ या घटनेला गांभिर्याने घेऊन आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यात उत्कर्षाताई रुपवते यांना कोणतीही इजा झाली नसून त्या सुखरुप आहेत. त्यामुळे, कार्यकर्त्यांनी शांतता राखण्याचे आवहान त्यांनी केले आहे.
मी थांबणार नाही...
हा हल्ला कोणी व का केली हे माहित नाही. मात्र, ज्या पद्धतीने माझ्यावर हे संकट ओढवले आहे. त्याने मी अधिक कणखर बनले आहे. या तालुक्यात असे देखील होऊ शकते याचे वाईट वाटते. मी माझा संघर्ष जरा देखील सोडणार नाही. जर कोणाला वाटत असेल की मी असे हल्ले केले म्हणून थांबून घेईल, तर मुळीच नाही. संबंध समाजाचे, गोर गरिब जनतेचे, थोरामोठ्यांचे आणि महापुरुषांचे आशिर्वाद घेऊन मी लढत आहे. मला खात्री आहे या घटनेमागे नेमकी कोणाचा हात आहे याचा तपास पोलीस लावतील. मात्र, येत्या १३ तारखेपर्यंत माझ्या वाटेत कितीही मोठे संकट आले तरी मी थांबणार नाही.
उत्कर्षा रुपवते (वंचितची उमेदवार)
हा हल्ला राजकीय वैमनस्यातून...
खरंतर रुपवते कुटुंबाचा आजवर कोणाशी वाद नाही. त्यांनी कधी हाणामार्या केल्याचा इतिहास नाही. त्यामुळे, कोणावर संशय घ्यावा असे काहीच कारण नाही. हा हल्ला केवळ उत्कर्षा रुपवते यांचा विजय दिसू लागल्याने झाल्याचा आम्हाला संशय आहे. प्रस्तापितांच्या पायाखालची वाळु सरकल्यामुळे हा प्रकार होऊ शकतो. मात्र, त्यांच्या असल्या कृत्यामुळे आम्ही थांबणार नाही. विजय जवळ आहे आणि तो आम्ही मिळविणार आहे. आमचे लक्ष विचलित करण्याचा हा कट असू शकतो. त्यामुळे, कोणत्याही कार्यकर्त्याने कायदा व सुव्यसस्था निर्माण होईल, आचारसंहितेचा भंग होईल असे कृत्य करु नये. मात्र, हा हल्ला उत्कर्षा रुपवते यांच्यावर झालेला नसून तो फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचारांवर झालेला हल्ला आहे. त्यात विशेष म्हणजे पुरोगामी आणि अद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या तालुक्यात हा हल्ला होतो हे वाईट आहे.
- शांताराम संगारे - प्रचारक वंचित आघाडी