पत्नी कायम माहेरी जाते म्हणून तिचे कुटुंबच संपविले! सहा जणांवर वार तिघांची हत्या.! नगरमध्ये पुन्हा ऑनर किलींग.!

सार्वभौम (संगमनेर) :-

कौटुंबिक वादातून जावयाने सासरवाडीच्या सहा जणांना चाकूने भोकसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात पत्नीसह तिघांचा जागीच मृत्युु झाला असून तिघे गंभिर जखमी झाले आहेत. ही घटना शिर्डी परिसरात सावळीविहीर येथे गुरुवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. यात वर्षा सुरेश निकम (वय २४), रोहित चांगदेव गायकवाड (वय २५) आणि हिराबाई धृपद गायकवाड (वय ७०) हे मयत झाले असून योगिता गायकवाड, चांगदेव गायकवाड व सांगिता गायकवाड ही तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर शिर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर, याप्रकरणी आरोपी  रोशन कैलास निकम आणि सुरेश विलास निकम दोघे(रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) या दोघांना पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. हा एक ऑनर किलिंग सारखा प्रकार असून संपुर्ण कुटुंब संपविण्याच्या हेतूने गेलेल्या आरोपींनी घर उघडताच जो दिसेल त्याला भोकसत सहा जणांवर वार केले आहेत. पुढील तपास पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. यापुर्वी नगर जिल्ह्यात सोनई आणि जवखेडा येथे ऑनर किलिंग सारखी प्रकरणे घडलेली आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, सावळीविहीर येथील वर्षा गायकवाड हिचा विवाह संगमनेर खुर्द येथील सुरेश निकम याच्याशी झाला होता. याच्यात थोडे दिवस सर्व अलबेले राहिले. नंतर मात्र दोघांमध्ये कायम किरकोळ कारणामुळे वाद होत गेला. वाद झाला की वर्षा ही माहेरी निघुन जायची. त्यामुळे, निकम याच्या संसारात सासु सासरे, मेहुणी, मेहुणा यांचा हस्तक्षेप वाढत चालला होता. त्यामुळे, कधी समजुन सांगायचे आणि पुन्हा पत्नी घेऊन जायची. हे असेच अनेकदा झाले होते. त्याच प्रमाणे गेल्या काही दिवसांपुर्वी देखील असेच झाले तेव्हा वर्षा हीने संगमनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि सावळीविहीर येथे निघुन गेली होती. त्यामुळे पती प्रचंड नाराज होता.

दरम्यान, तिला आरोपी सुरेश याने फोन करुन बोलावणे केले होते. मात्र, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तिला तिचे माहेरचे लोक देखील पाठीशी घालत होते. त्यामुळे, निकम याचा मनात पत्नीच्या कुटुंबाकडील व्यक्तीविषयी अधिक दृढ होत गेला होता. त्यानंतर बुधवार दि.२० सप्टेंबर २०२३ रोजी त्याने एक धारधार चाकु खरेदी केला. काही झालं तरी आता यांचे सगळे कुटुंब संपवायचे असा निर्धार त्याने केला आणि रोशन निकम यास घेऊन त्याने थेट सावळीविहिर गाठली. रात्री ११:३० ते १२ वाजण्याच्या सुमारास ते सासरवाडीला पोहचले.

दरम्यान, रात्री जेवण करुन गायकवाड कुटुंब झोपी गेले होते. इतक्या रात्री जावई येतील आणि असे काही करतील अशी शंका देखील त्यांच्या मनात नव्हती. १२ वाजण्याच्या सुमारास दार वाजले आणि ज्याने दार उघडले तो कोण आहे हे देखील न पाहता थेट चाकुने हल्ला केला. त्यावेळी एकच आरडाओरड झाली. पत्नी वर्षा हिने पाहिले असता ती पुढे आली तर तिच्यावर देखील त्याने हल्ला केला. त्यानंतर एखाद्या चित्रपटात जसे हत्याकांड दाखविले जाते. तसे वास्तव चित्र येथे उभे राहिले. निकम यांनी एकापाठोपाठ एक असे सहा जणांवर वार केले. यात पत्नी वर्षा निकम, मेहुणा रोहित गायकवाड आणि आजेसासु हिराबाई गायकवाड हे मयत झाले असून मेहुणी योगिता गायकवाड, सासरे चांगदेव गायकवाड व सासू सांगिता गायकवाड ही तिघे गंभीर जखमी झाले. 

दरम्यान, घरात रक्ताचे थारोळे साचले होते. सहा जणांवर हल्ला झाला आणि त्यांच्यावर वार झाले म्हणजे तेथील परिस्थिती काय असेल याची कल्पना न केलेली बरी. जेव्हा हे सर्व कुटुंब जमीनिवर कोसळल्याचे पाहिले तेव्हाच आरोपींनी घर सोडले. हा सर्व प्रकार होत असताना आजुबाजुच्या लोकांनी पाहिले मात्र, आत जाण्याची हिंमत कोणी केली नाही. आरोपी गेल्यानंतर जे लोक जखमी होते त्यांना तत्काळ शिर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची परिस्थिती देखील चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

दरम्यान, ही घटना पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांना समजली असता त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वेगवेगळे पथक तयार करुन त्यांनी स्वत: आरोपीचा मागोवा घेणे सुरु केले. या दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस देखील रवाना झाले होते. गुरूवारी पहाटे पोलीस पथके संगमनेर येथे दाखल झाले. आरोपींच्या घरी जाऊन माहिती घेतली मात्र ते घरी नव्हतेे. घटनेचे कारण याबाबत चौकशी केली असता पत्नी वारंवार माहेरी जाणे आणि माहेरच्या व्यक्तींचा संसारात होणारा नेहमीचा हस्तक्षेप यामुळे हा प्रकार घडला असल्याचे कारण समोर आले. नंतर पोलिसांनी काही टेक्नीकल बाबींनुसार तपास केला आणि मुख्य आरोपी संतोष निकम व रोशन निमक यांना नाशिक येथून ताब्यात घेतले आहे.