चेअरमन होण्यास नेत्यांची बोट हायजॅक.! डॉ. सुजय विखेंची टोलेबाजी, ते म्हणाले मी पुन्हा येईल.! डॉ. लहामटेंना ऑफर.!
सह्याद्री सार्वभौम :-
जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रंगत आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकीकडे विखे-थोरात यांची बिनविरोध संकल्पना शिजत असताना अकोले तालुक्यातून सर्वाधिक अर्ज भरले गेले आहेत. त्यामुळे, विखे पाटलांची डोकेदुखी वाढली असून त्याच पार्श्वभुमीवर डॉ. सुजय विखे हे अकोले तालुक्यात आले होते. निमित्त जरी बाळासाहेब आरोटे यांच्या हदया कलेक्शन क्लॅाथ सेंटरच्या उद्घाटनाचे असले तरी, दौरा मात्र गोळाबेरजेचा ठरला. यात महत्वाचे म्हणजे विखे कुटुंबाचा स्नेह असला तरी पाणी असेल किंवा डिपीडीसीचा निधी अशा विविध प्रश्नांहून आ. डॉ. किरण लहामटे यांनी विखेंना कायम शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ते विखेंना चेअरमन होण्यासाठी अडचण ठरु शकतात म्हणून डॉ. विखेंनी डॉ. लहामटेंना बरोबर वेळीच मैत्रीची गोळी पाजली. आम्ही जुने मित्र आहोत, आमचे वैर नाही, राजकारणात टिका टिपण्णी चालुच असते असे म्हणत डॉ. सुजय विखेंनी डॉ. लहामटेंना न्युटलर भुमिका घेण्याची पहिली साद घातली. माझ्या एका शब्दाला तुम्ही मान द्या, तुमच्या दहा शब्दांना मी मान देईल अशी ऑफर देखील विखे यांनी ठेवली. मात्र, डॉ. लहामटे यांनी आधिच स्पष्ट केले होते. की, मैत्री मैत्रीच्या ठिकाणी आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी..त्यामुळे, डॉ. लहामटे हे डॉ. सुजय विखेंच्या बोटीत बसतात की नाही? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
जिल्हा बँकेची निवडणुक बिनविरोध होण्यासाठी मा. महसुलमंत्री बाळासाहेब थोेरात आणि मा.खा.डॉ. सुजय विखे पा. यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र पहिल्याच टप्प्यात ना. राम शिंदे यांनी पायपिट सुरु केली आणि विखे-थोरात यांना शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची धग दिर्घकाळ टिकाली नाही. त्यांच्या पाठोपाठ निलेश लंके यांनी मात्र शिंदे सेना आणि शरद पवार गट यांसह काही सहकारी पक्ष एकत्र करुन काल (दि.११) शिर्डीत बैठक घेऊन ते आज शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. ते नव्याने पॅनल स्थापन करीत असून शिंदे गट देखील त्यांच्यासोबत असल्याचे बोलले जात आहे. आता यात त्यांना किती यश येईल हे सांगणे कठीण आहे. मात्र, विरोधी पक्ष तयार करण्यात त्यांना यश येऊ शकते. अशा परिस्थितीत मारुती मेंगाळ यांनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यांनी जिल्हा बँकेत शिंदे सेनेला जागा मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे, अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक तालुक्यात निवडणुक बिनविरोध होईल. मात्र, अकोले तालुक्यातील चित्र बंडाचे दिसत आहे. त्यामुळे, डॉ. सुजय विखे यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसते आहे.
याच पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे यांनी अकोल्यात सर्व नेत्यांना एक होण्याची साद घातली आहे. अर्थात असे झाले तरच विखे यांना जिल्हा बँकेत चेअरमन होण्यासाठी मदत होणार आहे. अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा आहे, त्यामुळे येथे प्रत्येकाला एक स्वतंत्र मत आहे, प्रत्येकाला स्वत:चे अस्थित्व टिकवायचे असते त्यामुळे अकोेले तालुक्यात कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त झाले आहेत. म्हणुन जिल्हा बँकेत सर्वात जास्त अर्ज याच तालुक्यातून भरले गेले आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांशी अर्ज हे अनेक राजकीय लोकांचे हस्तक आहेत. जसे "पाणी आडवा पाणी जिरवा" तसे "याची आडवा त्याची जिरवा" अशा प्रकारचे बरेच अर्ज असतात. तर काही व्यक्तींना प्रामाणीकपणे नेतृत्व करण्याची इच्छा असते. त्यामुळे, अर्ज माघारी होईपर्यंत विखे-थोरात यांची प्रचंड डोकेदुखी होणार आहे.
मी पुन्हा येईल.!
डॉ. सुजय विखे यांनी आपल्या भाषणात सांगितले. की, मला मतं मागण्यासाठी पुन्हा अकोले तालुक्यात यावे लागणार आहे. त्यामुळे, नेमकी आता जिल्हा बँकेची मते मागण्यासाठी यावे लागेल की येत्या काही काळात शिर्डी लोकसभा मतदारसंघ खुला होण्याची शक्यता आहे. किंवा त्याचे विभाजन होण्याची तरी शक्यता आहे. त्यामुळे, डॉ. सुजय विखे हे त्यांचा सेफ मतदारसंघ म्हणून शिर्डी मतदार संघाचा विचार करतील असे अनेकांचे मत आहे. अर्थात जिल्हा बँकेत त्यांना मत मागायला येण्याची गरज पडणार नाही. मात्र, भविष्यात खासदारकी खुली झाली तर त्यांना अकोले तालुक्यात मते मागण्यासाठी यावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना आत्ताच व्युव्हरचना करावी लागणार आहे. हे त्याच दृष्टीने पाऊल टाकल्याचे दिसते आहे.
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी
डॉ. सुजय विखे यांनी खर्या अर्थाने डॉ. किरण लहामटे यांच्याकडे मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांना जिल्हा बँकेत चेअरमन व्हायचे आहे हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यासाठी डॉ. लहामटे यांची भुमिका देखील महत्वाची ठरणार आहे. डॉ. लहामटे यांनी विखे कुटुंबाशी पाण्याच्या प्रश्नावर सदैव टिका केली आहे. कदाचित इतके परखड कोणी बोलणार नाही तितका शाब्दीक संघर्ष त्यांनी विखे कुटुंबाशी केला आहे. त्याचे प्रतिउत्तर म्हणून विखेंनी देखील अनेकदा टोलेबाजी केल्याचे पहायला मिळाले आहे. आता मात्र डॉ. लहामटेंजवळ घोडे आडल्यामुळे दोघांमधील मैत्री उफाळुन आल्याचे पहायला मिळाले. आम्ही जुने मित्र, आमचे राजकीय वैर नाही वैगरे-वैगरे म्हणत दिल, दोस्ती, दुनियादारी दाखविली. आमचा एक शब्द ऐका आम्ही तुमचे दहा शब्द ऐकू असे म्हणत डॉ. लहामटेंना ऑफर दिली. मात्र, डॉ. लहामटे यांचे एकच वाक्य लाख मोलाचे होते. ते म्हणजे "मैत्री मैत्रीच्या ठिकाणी आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी" त्यामुळे, निवडणुकीतली रंगत अधिक वाढते की कमी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन्ही भाऊंची जवळकीता..!
डॉ. सुुजय विखे पा. यांनी अकोले तालुक्यात जरा वेगळी खेळी सुरु केली आहे. त्यात जिल्हा परिषदेचे मा. बांधकाम सभापती कैलास वाकचौरे यांना जास्त जवळ केले असून त्यांच्यावर फार मोठ्या जबाबदार्या दिल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे कालपर्यंत अनेक मोठी नावे उमेदवारीच्या चर्चेत होती. आता मात्र मा.आ. वैभव पिचड आणि कैलास वाकचौरे यांची नावे पुढे येऊ लागली आहे. सिताराम पा. गायकर यांच्याबाबत फार मोठी खेळी होताना दिसत असून गायकर साहेब ऐनवेळी नेमकी काय भुमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उमेदवार कोमात आणि जोमात...!
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनुसुचित जाती-जमाती आणि सोसायटी मतदारसंघ हे अकोले तालुक्यासाठी फार महत्वाचे आहेत. यात आ. डॉ. किरण लहामटे, मा. आ. वैभव पिचड, जिल्हा बँकेचे माजी संचालक अमित भांगरे, मारुती मेंगाळ यांची भुमिका महत्वाची असणार आहे. तर, सोसायटी मतदार संघात जिल्हा बँकेचे मा. चेअरमन सिताराम पा. गायकर, कैलास वाकचौरे, मधुभाऊ नवले, विकासराव शेटे पा. शरद चौधरी, संजिवणी शिंदे यांच्या भुमिका महत्वाच्या असणार आहे. शेटे आणि चौधरी हे पुर्वापार गायकर साहेब यांचे पाहुणे आणि कार्यकर्ते राहिलेले आहेत. तर, कैलास भाऊ हे गायकर साहेबांचे अत्यंत विश्वासू आहेत. त्यामुळे, त्यांच्यात लढत होईल की कोणा-कोणाला थांबावे लागले? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
