संगमनेरात पिस्तुल व जिवंत काडतुसांसह तिघे अटक, एक पसार, फिल्मी स्टाईलने हॉटेलमध्ये धरपकड.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील पठार भागावर मांडवे बु परिसरात दहशत माजविण्यासाठी पिस्तुल खरेदी करणार्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. ही करवाई दि. २३ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संतोष काशिनाथ कुटे (रा.मांडवे बु), शिवाजी बाबुराव कुदनर (रा. शिंदोडी) व संतोष शेवराज बर्डे (रा. शिंदोडी, ता. संगमनेर) यांना अटक करण्यात आली आहे. जेव्हा याच्याकडे चौकशी केली असता हा पिस्तुल त्यांनी रणजित बापु धुळगंड (रा. मांडवे, ता. संगमनेर) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, शुक्रवार दि. २४ सप्टेंबर रोजी घारगाव पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे पोलीस ठाण्यात काम करत होते. तेव्हा त्यांना एका व्यक्तीकडून माहिती मिळाली. की, साकुर ते टाकळी ढोकेश्वर रोडवर मांडवे बु परिसरात एका हॉटेलमध्ये तीन व्यक्ती बसलेल्या आहेत. त्यांच्यातील एका व्यक्तीच्या कंबरेला पिस्तुल आहे. तेव्हा खेडकर यांनी तत्काळ एक टिम तयार केली आणि त्यांना मांडवे परिसराकडे पाचारन केले. ज्या प्रमाणे माहिती मिळाली होती, त्याप्रमाणे त्या हॉटेलमध्ये तीन तरुण बसलेले पोलिसांच्या टिमला दिसले.
दरम्यान, जे पथक तिघांना पकडण्यासाठी गेले होते. त्यातील काही पोलीस साध्या वेशात असल्यामुळे आरोपींना शंका आली नाही. जेवणाचे निमित्त करुन आरोपी ज्या टेबलावर बसलेले होते, त्याच्या आजुबाजुला पोलिसांनी व्यवस्थित सापळा रचला. आरोपींना शंका देखील येणार नाही अशी व्यूहरचना आखून सावध रितीने पोलिसांनी पिस्तुल कोणाकडे आहे याची खात्री केली. यांच्यातील चर्चा आणि हालचालींवर बारिक नजर ठेवून तिघे आरोपी हे बेसावध असताना पोलिसांनी त्यांच्यावर अचानक झडप घातली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तिघे आरोपी गांगरुन गेले. त्यांनी पुढे काही करण्याच्या आधिच पोलिसांची त्यांचे हात पकडून त्यांच्या हलचाली काबुत केल्या.
दरम्यान, तिघांनी पोलिसांशी झटापट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न कुचकामी ठरला. पोलिसांनी तिघांची अंगझडती घेतली असता त्यातील आरोपी संतोष कुटे याच्या कंबरेला गावठी कट्टा मिळून आला. तर, शिवाजी कुदनर याच्या खिशात तीन जिवंत काडतुस मिळुन आले. तर, संतोष बर्डे हा त्यांच्या सोबत होता. तिघांना ताब्यात घेतले असता त्यांना विचारणा केली. की, हा पिस्तुल तुम्ही कोठून आणला आणि कशासाठी आणला आहे. तेव्हा त्यांच्याकडून फारशी सकारात्मक माहिती मिळाली नाही. मात्र, जेव्हा पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखविला तेव्हा तिघे पोपटासारखे बोलु लागले. हा पिस्तुल त्यांनी मांडवे येथील रणजित धुळवंड याच्याकडून विकत घेतल्याची सांगितले. त्यानुसार चौघांना यात आरोपी करण्यात आले आहे. तर या अटक केलेल्या व्यक्तींना आज न्यायालयात हजर करण्यात आले आहे. या यशस्वी सापळ्यात पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, पोलीस नाईक दत्तु चौधरी आदिं.ही दमदार कामगिरी केली.
दरम्यान, नगर जिल्हा आणि पुणे ग्रामीण येथे गावठी कट्टयांचा पुरवठा हा मध्यप्रदेश येथून होत असल्याची अनेकदा निष्पन्न झाले आहे. तर, नगर ते संगमनेर किंवा नाशिक ते आता पुणे असा गुन्हेगारांचा मार्ग फिक्स झाला आहे. मोठमोठे कंटेनर किंवा अन्य मालवाहतुक गाड्यांच्या माध्यमातून कट्ट्यांचा पुरवठा होत असल्याचे बोलले जात आहे. पुर्वी नेवासा, शेवगाव, श्रीगोंदा, पाथर्डी, जामखेड, नगर तालुका आणि शहर येथे कायम गावठी कट्ट्यांचा बोलबाला होता. त्यांच्यावर कारवाया देखील तितक्याच होत होत्या. मात्र, कालांतराने आता फारसे कट्टे पकडले जात नाहीत. एव्हाना तरुण पोलीस अधिकारी साईड ब्रॅन्चला आणि वशिल्याचे पोलीस ठाण्यात आल्याने त्यांचे मन कारवाईत फारसे रमत नाही. अनेकांना निवृत्तीचे वेध लागल्याने मलिद्याकडे लक्ष जास्त असते. त्यामुळे, अवैध धंद्यांचे प्याव अधिक फुटले आहे. अर्थात ही बरबटेली व्यवस्था बदलणे अशक्य आहे. कारण, सगळ्याच गोष्टी ‘‘अर्थपुर्ण’’ तडजोडींशिवाय शक्य होत नाही. त्यामुळे, द्यावे लागते तर घ्यावे लागते हा फंड प्रशासकीय व्यवस्थेत दृढ होत चालला आहे.