अकोले नगरपंचायतीत लुटायचं टेंडर.! दोघांनी आख्खं मार्केट लुटलं.! ज्यांचे हात बरबटले त्यांचे बाप्पा वाटोळे करेल.!

  

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

आज मोठ्या आनंदाने श्री. गणरायचे आगमन झाले आहे. शेतकरी, व्यापारी, मजुर आणि गणेशप्रेमींनी अकोले बाजारपेठ फुलून गेली आहे. मात्र, या बाजारपेठेत नगरपंचायतीने खाजगी लुटारु सोडले होते की काय? जे पुर्वीचे सुलतान आणि पठाणांसारखी सक्तीची वसुली करताना दिसून आले. अक्षरश: ४० रुपयांची पावती द्यायची आणि दोन हजार, अकराशे, पाचशे, दोनशे अशी रक्कम व्यवसायिकांकडून सक्तीने वसुल करायची. नकार दिला तर दुकान उखडून फेकण्याची भाषा आणि विरोध केला तर पोलिसांना बोलावून जेलमध्ये टाकण्याची भाषा पहायला मिळाला. मग हा सामान्य मानसांना लुटणारा माज आला कोठून? एकतर यांचे हाप्ते अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यापर्यंत पोहचत असावेत म्हणून तर वसुलीचे नव्हे तर लुटारुंचे टेडर येथून बाहेर पडले अशा प्रतिक्रिया सामान्य मानसांकडून येऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांच्या समोर हा प्रकार घडला. मात्र, त्यांनी देखील हा हायप्रोफाईल खंडणीस मुकसंमती दिली आणि काना डोळा करुन ते चालते झाले. कारण, त्यांना जनतेच्या हितापेक्षा गणपती बसविण्याची आणि त्यापुढे ठेका धरण्याची जास्त घाई झाल्याचे पहायला मिळाले.

देवाच्या बाजारात देखील लोक व्हाईट कॉलर सारखी लुटमारी करतात असे ऐकुण तुम्हाला विश्‍वास बसणार नाही. मात्र, होय.! हे खरे आहे. एखाद्याचे पाकीट मारले तर कमल ३७९ नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, पाकीटात रक्कम असते फक्त हजार दोन हजार. मात्र, शासकीय पद्धतीने ठेकेदारीच्या स्वरुपात शेतकरी, व्यापारी, ग्राहक आणि सामान्य मानसांचे पाकीट राजरोस मारले जाते. ही चोरी नसते. तो दरोडा आणि खंडणी असते. पाकीट मारल्यावर तरी एकच चोरटा त्यात भागिदार असतो, मात्र ठेकेदार लुटीत अनेक अधिकारी व पदाधिकारी यांचे हात रंगलेले असतात. आज अकोले बाजारपेठेत तेच चित्र पहायला मिळाले.! साध्या एका फुल विकणार्‍या शेतकर्‍याच्या चिमुकल्या मुलाकडून दोनशे आणि पाचशे, स्टॉल वाल्यांकडून दोन हजार आणि हजार पाचशे रुपये मागून वसुली करण्यात आली. याला अभय कोणाचे आहे? फक्त एका ठेकेदाराचे? मुळीच नाही. यात ज्यांचे ज्यांचे हात बरबटले आहे. त्यांचे-त्यांचे बाप्पा वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही.

नियम काय संगतो..?

वसुलीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी नगरपंचायत एक कायदेशीर निविदा काढत असते. त्यानुसार ज्यांना हे वसुलीचे टेंडर भरायचे आहे. त्यांनी टेंडर भरायचे असते. जो कोणी हे टेंडर भरेल त्याला ७ बाय ७ यानुसार २० रुपये कर असा व्यापार्‍यास आकारणे बंधनकारक असते. जर जागा १४ बाय १४ असेल तर ८० रुपये याप्रमाणे जागेनुसार कर रक्कम वाढत जाते. जर, यापेक्षा जास्त आकारणी केली. तर, एकतर संबंधित व्यक्तीकडून ठेका काढून घेतला जातो, त्याच्यावर कलम ३८४ नुसार गुन्हा दाखल केला जातो. तर, जी रक्कम बळजबरीने शेतकरी-व्यापारी याच्याकडून वसुल केली आहे त्यांना ती परत करणे बंधनकारक असते. हे सर्व मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. येथे कुंपनच शेत खात असेल तर झाकली मुठ सव्वा लाखाची...! चौकशी सोडून काहीच निष्पन्न होत नाही.

तक्रार करा, पैसै परत न्या.!

ज्यांनी या ठेकेदारांना जास्त रक्कम दिली आहे. किंवा ठेकेदारांनी वसुल केली आहे. त्याची पावती उद्या ११ वाजता अकोले नगरपंचायत येथे घेऊन जावी. तसेच, ज्यांच्याकडे पावती नाही, किंवा पावती दिलेली नाही. त्यांनी देखील नगरपंचायत येथे जाऊन तक्रार दाखल करावी. ती रक्कम परत केली जाईल. ठेकेदारांना पैसे देऊ नये अशा प्रकारचे अवाहन पहिल्या दिवशी करण्यात आले होते. मात्र, अशा पद्धतीने व्यवसायिक व शेतकरी यांच्याकडून पैसा वसुल करणे चुकीचे आहे. संबंधित ठेकेदारांच्या विरोधात तशा तक्रारी आल्या तर त्यांच्याकडून ठेकेदारी काढून घेतली जाईल. तसेच त्यांच्यावर उचित कारवाई करण्यात येईल.

- बाळासाहेब वडजे (अकोले नगराध्यक्ष)

ठेकेदार म्हणतो आम्ही सरकारी.!

जेव्हा बाजारपेठेत असली लुट सुरू होती. तेव्हा हे लुटारु ठेकेदार यांना काही नागरिक आणि ऍड. वसंतराव मनकर यांनी जाब विचारला. तर, हे लुटारु म्हणत होते. आम्ही सरकारी मानसे आहोत, तुम्ही सरकारी कामात आडथळा आणला तर तुमच्यावर कलम ३५३ नुसार गुन्हा दाखल करु. पोलीस आमच्या संरक्षणासाठी आहेत, जर पैसे दिले नाही. तर, पोलिसांना बोलावून तुम्हाला जेलमध्ये टाकू किंवा तुमचे स्टॅल येथे लावू देणार नाही. आम्ही नगरपंचायतीची मानसे आहोत, आमच्याकडे पैसे घेण्याचा परवाना आहे. अशा पद्धतीने फेक बोलणे हे लोक बोलत होते. मात्र, जेव्हा अनेक व्यापारी व शेतकरी एकत्र आले तेव्हा मात्र यांनी तेथून पळ काढला. आम्ही सरकारी नाही, वसुली सुद्धा करणार नाही असे म्हणत त्यांनी पळकुटी भूमिका घेतली.

ठेकेदाराकडून सुलतानी वसुली.! 

बाजारतळाच्या सुशोभीकरणाचे काम काही ठेकेदारांकडूनच आडविले जात आहे. अशातच व्यापारी, शेतकरी, ग्राहक हे ठेकेदारांना वैतागले असून आता एका मालुंजकर ठेकेदाराने नवा उपद्याप वाढवून ठेवला आहे. आज गणपती बाप्पाच्या स्थापना दिवशी बाजारतळात ठेकेदारांनी सुलतानी वसुली केली आहे. ४० रुपयांच्या पावतीच्या बदल्यात दोन हजार, हजार, पाचशे, दोनशे, पाचशे, शंभर अशा पावत्या बळजबरीने फाडल्या आहेत. त्यास जाब विचारला तर आम्हाला सरकारी कामात आडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होता. पोलिसांची भिती दाखवून विरोध करेल त्यास दमदाटी करत होता. यावर नगरपंचायत यांनी तत्काळ कारवाई केली पाहिजे.

- ऍड. वसंत मनकर (ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी)