अकोल्यातील जातीयवादी नेत्यांचं डोकं फिरलय काय? तरुणांना गुंड, मवाली आणि माथेफीरु बनवताय.! तर, अकोल्याचा युपी बिहार होईल.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
गेल्या कित्तके वर्षांपासून देशात जातीय आणि धार्मिक द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे. त्याचे लोन अगदी संगमनेरपर्यंत येऊन पोहचले आहे. सुदैवाने अकोले तालुका हा पुरोगामी विचारांचा असून तेथे अपवाद वगळता जातीय आणि धार्मिक दंगली अद्याप तरी उफाळुन आलेल्या नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अगदी अल्पवयीन आणि कॉलेजमध्ये शिकणार्या मुलांना हाताशी धरुन काही जातीयवादी संघटना स्थापन करणे, त्या मुलांना मारामार्या, दादागिरी आणि आपणच आपल्या जाती-धर्माचे रक्षक आहोत, असे धडे जाणून बुजून दिले जाऊ लागले आहेत. त्यामुळे, ओठांवर मिशी फुटलेली नाही असे तरुण शाळा कॉलेजांमध्ये छात्या फुगविताना दिसत आहेत. गळ्यात, हातात, अंगात आणि कपाळावर धर्माचे टिळे लावून एकमेकांकडे द्वेषाने पाहताना दिसत आहेत. हे प्रकार थांबले पाहिजे म्हणून पोलीस निरीक्षक विजय करे यांनी काल तीन तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले. पण, काही जातीयवादी नेते आणि पुढारी मुलांच्या बाजुने आले आणि मुलांना मारहाण केली असा सुर त्यांनी काढला. तर, दुसरीकडे मुलांच्या पालकांनी सांगितले. की, आमची काहीच तक्रार नसून आम्ही मुले शिकविण्यासाठी पाठवितो. त्यांना असे जातीयवादी किडे करण्यासाठी नव्हेे. त्यामुळे, जे झाले ते योग्यच झाले. मग या अकोले तालुक्यात गुण्या गोविंदाने नांदनारा सामाजिक सलोखा बिघडवून या नेत्यांना अकोल्याचे युपी - बिहार करायचे आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
त्या दिवशी तेथे काय घडले होते.!
काल (दि.९) अकोले कॉलेजवर व्हिडिओ काढण्याहून दोन गटात वाद झाला होता. त्यांच्यात हाणामारी सुरू असताना कोणीतरी अकोले पोलीस ठाण्यात फोन करुन माहिती दिली. त्यानंतर पोलिसांची गाडी तेथे गेली आणि तेथे एकच पळापळ झाली. आता दोन गट एकमेकांना भिडलेले होते त्यामुळे, पोलीस तेथे जाऊन त्यांना "शॉल आणि श्रीफळ" थोडीच देणार होते.? पोलिसांनी गर्दी पांगविली आणि सर्व काही शांत झाले होते. या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र, काही व्यक्तींनी पोलीस कर्मचार्यांना वेठीस धरण्यास सुरुवात केली. हा माझ्या गटाचा, तो माझ्या संघटनेचा, तुम्ही त्यांना मारहाण केलीच कशी.? असे नाना प्रश्न उभे राहिले. आता यात पालकांची कोणताही तक्रार नाही. मुलांनी शाळा-कॉलेज करावे आणि नोकरी, व्यवसाय करुन स्वत:च्या पायावर उभे रहावे अशी प्रमाणिक प्रतिक्रिया पालकांची होती. मात्र, ज्यांना वाटते मुलांनी जातीचे, धर्माचे झेंडे हाती घ्यावेत, आमचा उदो उदो करावा. त्यांनी मात्र मुलांना भरी घेतले आणि पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे, सोशल मीडियातून अशा गलिच्छ राजकारणाचा निषेध केला जात आहे.
पालकांनो सावधान.!
आपण काबाड कष्ट करतो आणि शिक्षणासाठी मुलांच्या हातावर पैसा टेकवून मोकळे होतो. मात्र, तुमचा मुलगा काय करतोय? एखाद्या हॉटेलात मुलींवर पैसा उडवितो आहे. एखाद्या टपरीवर सिगारेट, तंबाखू, गुटखा खातो आहे, ग्राऊंडवर बसून शिट्ट्या मारतोय आणि एखाद्या फालतू नेत्याच्या संघटनेत जाऊन झेंडे फडकवून स्वत:चे आयुष्य बरबाद करतोय. त्यामुळे, पालकांनो सावधान.! आज वाया गेलेला मुलगा तुम्हाला पुन्हा कधीच मिळणार नाही. मुलांकडे लक्ष द्या, त्यांच्याशी मैत्री करा, त्यांना भविष्याचा विचार करायला लावा, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करा, चांगल्या मित्रांच्या संगती आणि पुस्तकांची आवड निर्माण करुन द्या. तो असाच जातीयवादी पक्ष आणि संघटनेंचा पदाधिकारी झाला. तर, येणार्या काळात तो नक्की गळफास घेऊन स्वत:चे जिवण संपवून टाकेल आणि त्याला जबाबदार तुम्ही रहाला. अशा अनेक घटना अकोल्यात उदाहरण म्हणून ताज्या आहेत. त्यामुळे, आज वेळ गेलेली नाही. सावध व्हा आणि मुलांना वाचवा.!!
भाऊ, वेळेला कोणी येत नाही..!!
त्या दिवशी श्री गणेशाचे विसर्जन नुकतेच झाले होते. कदाचित साडेआकरा वाजले असावेत. मुले महात्मा फुले चौकात निवांत बसले होते. पोलिसांनी पाहिले आणि निव्वळ घरी जा म्हणून हटकवत पोलीस निघुन गेले. त्यानंतर तेथे दोन गटामध्ये वाद झाले आणि त्याच्यात मारामार्या देखील झाल्या. तेव्हा केवळ एच.एम एनसी दाखल झाली. मात्र, दोघांना जामिन देण्यासाठी प्रचंड यातायात करावी लागली. खरंतर दोघे अगदी गरिब घराण्यातले. एकाला जामिन मिळाला तर दुसरा दुपार उलटली तरी जामीन शोधत होते. साधं रेशनकार्ड आणि आधारकार्ड घेऊन सोबत कोणी यायला तयार नव्हते. अखेर तीन वाजता त्यांना नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत जामीन द्यावा लागला. त्यानंतर दोघांच्या लक्षात आले. वाद पेटवायला सारा गाव होता. मात्र, मिटवायला कुटुंब आणि मित्रांना यातायात करावी लागली. त्यामुळे, हा माझा नेता आणि तो माझा पक्ष यावर कोणी अवलंबून राहु नये. आज दोघे तरुण एकमेकांचे मित्र आहे. मात्र, हे शहाणपण येण्यासाठी किती उपद्व्याप करावे लागला आहे. उद्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यामुळे, हे चित्र घडविण्याचा प्रयत्न झाला तरी कोणी त्याचा बळी ठरु नये. हिच मापक अपेक्षा.
पोलिसांना त्यांचे काम करुद्या,अन्यथा..!!
संगमनेर शहरात कॉलेज परिसरात मुलींच्या छेडछाड झाल्याने दंगली पेटल्याची उदा. आहेत. बस स्थानकावर देखील कित्तेक राडे झाले आहेत. तुलनेत अकोल्यात हे प्रमाण फार कमी आहे. त्यावर अंकुश रहावा म्हणून पोलीस निरीक्षक विजय करे यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन कारवाई केली आहे. जर, त्यांनी मुलांवर केवळ वचक दाखविण्याचा प्रयत्न केला. तर, बिघडलं कोठे? मात्र, काही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पोलिसांवर आरोप प्रत्यारोप करु लागले आहेत. या नेत्यांनी असाच नालायक पणाचा कळस गाठला तर उद्या भर रस्त्यावर मुलांची छेडछाड होईल, अकोल्यात देखील जातीय आणि धर्माच्या नावाखाली दंगली पेटतील. मुले शिक्षण सोडून हातात झेंडे घेऊन दहशत माजवतील, मोठमोठे आवाज काढणार्या गाड्या आणि कट मारत फिरणारे रोडरोमिओ पहायला मिळतील. ही वेळ जेव्हा तुमच्या मुलींवर येईल तेव्हा पुन्हा आंदोलन होईल. पोलीस नेमकी करतात तरी काय? त्यामुळे, पोलिसांना पोलिसांचे काम आत्ताच करुद्या. अन्यथा चांगल्या कामात आडकाठी घातली तर "नाठाळाच्या माथी, मारु काठी" ही भुमिका देखील अकोलेकर बजावतात हे नाठाळ नेत्यांनी विसरु नये.!!
तर अकोल्यातही असे हल्लोखोर होतील.!
शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी तरुणांचे तथा विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद होऊ नये यासाठी शाळेच्या बाहेर असणारी गोवा, गुटखा, मावा आणि तंबाखू विकणारी टपरी बंद केली. मात्र, जे विकृत तरुण शिकले नाही. ज्यांनी उभी हयात दादा, भाई, डॉन आणि रोडरोमियों म्हणून घालविली. ते एखाद्या शिक्षणतज्ञाची तळमळ काय जाणणार आहे? अवघ्या १० हजार रुपयांसाठी हे तरुण एखाद्याला ठार मारण्याची सुपारी घेतात. यापेक्षा घातक काय असू शकते? म्हणून संस्कार नावाचा प्रकार फार महत्वाचा असतो. जर, या तरुणांना असाच जातीय आणि धार्मिक वारसा मिळत गेला. तर, येणार्या काळात अकोल्यात देखील कुलकर्णी यांच्यावर हल्ले करणारे तरुण निर्माण झाले तर वावघे वाटण्याचे काहीच कारण नाही. हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील दोघांना परवा अटक केली होती. त्यातील ज्ञानेश्वर जगधने (रा. सर्जेपुरा) व कैलास माळी (रा. घासगल्ली कोठला, अ.नगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. आता चौघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. जेव्हा कुलकर्णी यांनी मत व्यक्त केले होते. की, अकोल्यात मी अनेक मोर्चे, आंदोलने आणि दारु दुकाने बंद केली. मात्र, मला कोणी शब्दभर विरोधात बोलले नाही ना हल्ला करण्याचा विचार केला. ही खर्या अर्थाने अकोल्याची संस्कृती आहे. दुर्दैवाने आजकाल तरुणांना लिखानाचे नव्हे तर मारहाणीसाठी शस्त्र पुरविली जात आहे. हे थांबविण्यासाठी विचारवंतांनी एकात्र बसून हा रुढ होऊ पाहणारा पायंडा मोडीत काढला पाहिजे.