तु माझ्याशी सोडून कोणाशी बोलायचे नाही, अन्यथा ठार मारुन टाकेल, एकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणीची छेडछाड.!
सार्वभौम (संगमनेर) :-
इयत्ता ११ वी च्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची तिच्या जवळच्याच व्यक्तीने छेडछाड केली. तु मला फार आवडते, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्याशिवाय कोणाशी बोलू नको असे म्हणून पीडित तरुणीला वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवार दि. 11 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजण्याचा सु़मारास संगमनेर शहरातील सुकेवाडी परिसरात घडली. यातील आरोपी हा पीडितेच्या जवळचा पाहुणा असून त्याचे हे असले नखरे गेल्या कित्तेक दिवसापासून सुरु होेते. जवळचा म्हणून त्याची समज देखील काढली होती. मात्र, त्याचे हे घाणेरडे चाळे थांबले नाही. बुधवारी याने पीडितेला आडवून थेट तिची ओढणी ओढली. त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार एका व्यक्तीवर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, सुकेवाडी परिसरातून एक तरुणी तथा अल्पवयीन विद्यार्थिनी रोज एका कॉलेजात 11 वी च्या वर्गात शिक्षण घेण्यासाठी येते. तिच्या पाठोपाठ एक लग्न झालेला, त्यास मुले असलेला व्यक्ती हा नेहमी मागेमागे येतो. कायम रोडने आडवे होणे, या मुलीचा रस्ता आडविणे, तु मला आवडते, तु माझ्यासोबत बोल, माझ्यावर प्रेम कर, माझ्याशिवाय कोणाशी बोलू नको असे नाना प्रकारची बंधने आणि पाठलाग करुन तो या विद्यार्थिनीला त्रास देत होता. तो जरा लांबून पाहुणा आणि गावातील व्यक्ती असल्यामुळे पीडित मुलीने याबाबत वाच्चता करणे टाळले. आज ना उद्या याला शहाणपण येईल असे त्या अल्पवयीन मुलीस वाटत होते. मात्र याचे असले चाळे याने कधीच बंद केले नाही. त्यामुळे मुलगी प्रचंड वैतागली होती. आज उद्या हे थांबेल असे म्हणता म्हणता त्याचा त्रास अधिकाधिक वाढत होता. पीडित मुलीने देखील त्याची समज घालण्याचा प्रयत्न केला होेता. मात्र, विजयचे प्रेम अती झाले होते.
दरम्यान, एकीकडे पीडित मुलीस होणारा त्रास आणि दुसरीकडे घरच्यांना सांगितले किंवा समजले तर कॉलेज बंद होण्याची भिती. त्यामुळे, हे सर्व निमुटपणे सहन करण्यापलिकडे पर्याय नव्हता. मात्र, गेल्या काही दिवसांपुर्वी पीडितेच्या संयमाचा बांध फुटला होता. त्यामुळे, याच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल तिने पालकांना कल्पना दिली होती. त्यानंतर, चारदोन पाहुणे कंपनी गोळा करुन त्याला समज देखील दिली होती. एकतर मुलगी अवघ्या 17 वर्षाची आणि याचे लग्न होऊन मुल देखील आहेत. एकीकडे पाहुणा म्हणून ज्याने लेकराचे संरक्षण याने करावे असे असताना तोच तिच्यावर काना डोळा ठेवत असेल. तर, नात्यांना काही बंधने आहेत की नाही, नात्यांची काही जबाबदारी आहेच की नाही, आपले आणि परके याची काही समझ आहे की नाही, असे जर झाले तर मुलींना लोक शिकवतील का, नात्यांवर विश्वास राहिल का? असे अनेक प्रश्न उपस्थित करुन विजयला समजून सांगण्यात आले होते. त्यानंतर त्याने शब्द दिला होता. येणाऱ्या काळात माझ्याकडून अशा काही चुका होणार नाही. मात्र, त्याला जास्त दिवस काही रहावले नाही.
बुधवारी सकाळी 11 वाजता पीडित मुलगी सुकेवाडी येथून कॉलेजला जायला निघाली होती. घरापासून अवघे दिड ते दोन किलोमिटर अंतर सायकलने अंतर काटले होेते. तोच हा त्याच्या दुचाकीवरुन आला. पीडित मुलीच्या जवळ गाडी नेत म्हणाला. की, जरावेळ थांब.! मला तुझ्याशी थोडसं बोलायचं आहे. मात्र, मुलगी थांबली नाही. तो म्हणाला माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला बोलायचे आहे. तेव्हा मुलीने नकार दिला असता याने तिची ओढणी ओढली आणि तिला बळजबरीने थांबविण्याचा प्रयत्न केला. तु मला फार आवडतेस, तू माझ्याशिवाय दुसरे कोणासोबत बोलायचे नाही असे म्हणत आरोपीने मुलीची छेडछाड काढली आणि तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावेळी पीडित मुलगी म्हणाली. मी कोणाबरोबर बोलत नाही, तेव्हा विजय तिला शिविगाळ करु वागला. तु मला शिकवतेस का? माझ्याशी खोटं बोलते का ? असे म्हणून त्याने तिला धमक्या देणे सुरु केले. तु माझ्या सोडून कोणाशी बोलली तर तुला जीवंत सोडणार नाही असे म्हणून तो निघून गेला. त्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला आणि त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीनुसार एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
होय.! इथे अस्वस्थ वाटतय.!
खरंतर गेल्या काही दिवसांपुर्वी संगमनेरात कॉलेज परिसरात दोन गटात राडा झाला आणि पोलीस Action मुडवर आले. अल्पवयीन मुलांच्या गाड्या आडविणे, पालकांवर कारवाई करणे, पोलीस पथक रस्त्यावर उतरविणे. त्यामुळे, कोठेतरी विद्यार्थ्यांमध्ये रुढ होऊ पाहणारी दादागिरी, भाईगिरी आणि रोडरोमिओंचा संख्या कमी झाली होती. त्याच काळात छेडछाडीेचे प्रमाण देखील कमी झाले होते. पण, पोलिसांनी देखील नव्या नवरीसारखे चार दिवस कारवाईचे नाटक केले आणि नंतर त्यांना देखील विसर पडला. सुदैवाने संगमनेर शहरात शिक्षणाच्या चांगल्या सुविधा आहेत, दळणवळण आणि स्टेबल होण्यासारखे शहर आहे. मात्र, दुर्दैवाने येथील गुन्हेगारी फार वाढत चालली आहे. विद्यार्थी, महिला, घरे, रोज होणाऱ्या चोऱ्या यांमुळे हे शहर देखील असुरक्षित या दृष्टीकोणाकडे वाटचाल करत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे शिक्षणासाठी बाहेरुन येणारी मुले स्वत:ला असुरक्षित फिल करत आहेत. येथे पोलिसाचे दामिनि पथक कार्यरत नाही, पोलीस गस्त नाही, पोलीस विद्यार्थी संवाद नाही, निर्भया मार्गदर्शन शिबिरे नाहीत, कायदेशिर सल्ला देणारी पोलीस व्याख्याने नाहीत, वाहतूक नियमन नाही अशा अनेक गोष्टींच्या आभावामुळे सुरक्षिततेची भावना निर्माण होत नाही.