कारखान्याच्या सभेते विरोधकांच्या तोंडात साखर.! बी.जे.देशमुख कारखान्याच्या बाजुने.! व्यासपीठाहून अनेकांची उणीधुणी.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

     अगस्ति सहकारी साखर कारखान्याची २९ वी सर्वसाधारण सभा काल संपन्न झाली. अनेक प्रश्‍नांची रिघ असताना देखील विरोधक, कर्मचारी आणि शेतकरी यांनी ब्र शब्द देखील काढला नाही. का? तर केवळ आता तरी राजकारण बाजुला ठेऊन कारखाना चालावा, तो कायमचा टिकावा यासाठी सर्वांनी नरमाईची भुमिका घेतली. तर, सभाध्यक्ष सिताराम पा. गायकर यांच्या रोजच्या धडपडीवर अनेकांनी साक्ष नोंदविली. त्यामुळे, जग इकडचे तिकडे होईल. मात्र, गायकर साहेब कारखाना बंद पडू देणार नाहीत. इतका विश्‍वास शेतकर्‍यांनी व्यक्त केला. तर, ही भाग्यलक्ष्मी टिकली पाहिजे यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करु, एकमेकांना सहकार्य करु अशी भुमिका निवृत्त प्रशासक बी. जे. देशमुख यांनी व्यक्त केली. ज्या पद्धतीने कारखान्याच्या इतिहासात सभांना वादंगांचा कलंक असतो. त्याचा लवलेश देखील कालच्या सभेत जाणवला नाही. याचे समाधान चेअरमन गायकर पा. यांनी व्यक्त केले.

 ते संचालक म्हणजे राजकीय बुजगावणे.!

अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रकाश नवले यांनी अतिशय नम्रपणे त्यांची भुमिका मांडली. कारखान्यात साखरेचा उतारा, निघणारे बगॅज, अहवालात असणारी संदिग्धता, कारखान्यात होणारा नफा आणि तोटा याची मांडणी करताना त्यांनी कोणाला आरोपाच्या पिंजर्‍यात उभे केले नाही. तर, काय नको आणि काय हवे याची अभ्यासपुर्ण मांडणी केली. त्यांच्या मांडणीत विरोधक आणि कोणत्याही द्वेशाचा अविर्भाव नव्हता. त्यामुळे, त्यांच्या सुचनांची कारखान्याने शंभर टक्के दखल घेतली पाहिजे. तर, तज्ञ संचालक म्हणून केवळ राजकीय रिक्त जागेवर बुजगावणे उभे करण्यापेक्षा प्रकाश नवले यांच्यासारखे व्यक्ती घेऊन त्यांचा कारखान्याच्या उन्नतीसाठी उपयोग करुन घेतला पाहिजे असे मत काही शेतकर्‍यांनी व्यक्त केले.

एकमेका सहाय्य करु..!!

खरंतर गेली तीन वर्षे बी.जे.देशमुख आणि त्यांची टिम कारखाना आणि सिताराम पा. गायकर यांच्या विषयी सातत्याने गरळ ओकत होते. कारखाना बंद पडणार आहे, तो कडेलोटावर आहे. तो व्हेन्टीलेटरवर आहे. तो चालुच शकत नाही. असे अनेक शब्दप्रयोग करुन खरोखर कारखान्याची दुनियाभर बदनामी केली. होय.! याला बदनामीच म्हणतात. कारण, कारखाना चालु होता, चालु आहे आणि येणार्‍या काळात देखील चालेल, तो कडेलोटावर नाही अन तो व्हेन्टीलेटरवर देखील नाही. मुळात अडचणी कोणत्या कारखान्यात नाहीत? प्रश्‍न कोणत्या कारखान्यापुढे नाहीत? राजकारण कोणत्या कारखान्यात नाही? पण, त्याला देखील एक सिमा असते. ती सिमा येथील राजकारणी आणि विरोधकांनी ओलांडल्याचे पहायला मिळाले होते. मात्र, जसा कारखाना सुरळीत चालु झाला. त्यानंतर तरी अनेकांना सामाजिक व राजकीय शहाणपण आल्याचे समाधान अनेकांनी व्यक्त केले. खरंतर बी.जे.देशमुख यांनी अगस्ति कारखाना टिकावा, तो बंद पडू नये म्हणून आपण एकात्र काम करु, एकमेकांना सहकार्य करु अशी भुमिका घेतली. त्यांच्या भाषणात पुर्वीची खदखद होती. मात्र, त्याहुन जास्त सहकार्य आणि समायोजनाची भाषा होती. त्याबाबत अनेकांनी त्यांचे कौतुक केले.

यांनी तर कारखाना गिळाला.!

अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या सभेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे ज्या अधिकार्‍यांवर आरोप झाले, ज्यांच्याकडे अपसंपदा दिसून आल्या, ज्यांनी शेतकर्‍यांच्या टाळुवरील लोणी चाटून मलिदे खाल्ले. त्याच्यावर आरोप होताच त्यांनी राजिनामे दिले आणि ते मंजुर करुन त्यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही? ते दोषी असतील तर त्यांना बडतर्फ करुन गुन्हे का दाखल केले नाही? त्यांच्या मालमत्तेवर जप्ती का आणली नाही? त्यांच्याकडे असणार्‍या अपसंपदेवर येथील शेतकर्‍यांचा अधिकार आहे. त्या अशाच कशा गिळंकृत करु द्यायच्या? या प्रकरणात कोणीकोणी अर्थपुर्ण तडजोडी केल्या, कोण-कोण धनबलाढ्य झाले याची चौकशी करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली. म्हणजे कारखान्यात कोट्यावधींचे घोटाळे करायचे आणि नंतर राजिनामे देऊन नामेनिराळे रहायचे असेच चालु राहिले तर येणारी अनेक दशके कारखाना कर्जाच्या खाईतून बाहेर पडणार नाही. त्यामुळे, व्यवस्थापनाने यावर कठोर भुमिका घेण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली.

अशोक भांगरेंचा राजकीय वारसा शुन्य.!

आदरणीय अशोकराव भांगरे कारखान्यात व्हा-चेअरमन झाले आणि त्यांच्या नंतर सुनिता भांगरे यांना संधी मिळाला. भांगरे साहेब तेव्हा म्हणाले होते. येणार्‍या काळात २ लाख मेट्रीक टन ऊस उत्पादन मी आदिवासी भागात घेऊन दाखविणार आहे. त्यानुसार त्यांनी स्वत: तीन एकर उसाची लागवड केली. दुर्दैवाने त्यांना दिर्घायुष्य लाभले नाही. त्यांच्या नंतर अमित भांगरे आणि सुनिता भांगरे यांनी त्यांची स्वप्नपुर्ती करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. मात्र, झालं काय? व्यासपिठ मिळाले की भलीभली भाषणे ठोकायची, कृती मात्र शुन्य. आदरणीय भांगरे साहेब गेल्यानंतर आदिवासी भागात एक टिपरु देखील लागले नाही. गेल्या १२ ते १५ वर्षापासून आदिवासी भागातून फक्त १३ हजार मेट्रीक टन ऊस कारखान्याला येतो. त्या व्यतिरिक्त अपवाद वगळता कोणाच्याही लागवडीची नोंद झालेली नाही. जो राजकीय वारसा अशोकराव यांनी कुटुंबाला दिला. तो विकासात्मक वारसा खरोखर आपण जोपासत आहोत का? याचे आत्मचिंतन अमित भांगरे यांनी करणे गरजेचे आहे. बापाने जे व्हिजन ठेवले होते. तेच व्हिजन लेकाने पुर्ण केले तरी पुरे. अशोकरावांच्या पायाला भिंगरी होती, त्यानुसार सुनिताताई भांगरे यांनी तो सुख दुखाचा वसा आणि वारसा घेतला आहे. मात्र, विकासात्मक कोणतेही काम दिसत नसल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

व्यासपीठाहून अनेकांची उणीधुणी.!!

खरंतर अकोले तालुक्याला एक बोचरी परंपरा पडली आहे. नाव कोणाचे घ्यायचे नाही. पण, तोंडसुख मात्र भरपूर घ्यायचे. कधी आपल्या होती माईक पडेल आणि कधी मी धाडधाडधाड बोलेल, त्या बोलण्याला शेंडा अन बुडूख असो वा नसो. पण, बोलणे त्यांना अनिर्वाय वाटते. तर, काहींनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या वास्तव देखील होत्या. मात्र, मांडण्याची पद्धत आणि शैली निव्वळ व्यक्तीद्वेशाची वाटली. राजेंद्र कुमकर यांनी जे मत मांडले यात जरा देखील खोट नाही. होय.! ते सत्यच आहे. पण, कोण मांडीला मांडी लावून बसते आणि कोण चर्चा बाहेर फोडते, कोण माहिती पुरवते हे अप्रत्यक्ष सांगण्यापेक्षा थेट सांगण्याची हिंमत त्यांनी दाखविली नाही. तर, नवले यांनी देखील आपले मत व्यक्त केले. संचालकांचे ऊस बाहेर जातात हे सांगताना त्यांनी कोणाचे नाव घेण्याची हिंमत केली नाही. शेतकरी खालुन त्यांना विचारत होते. मात्र, त्यांनी सांगण्याचे धाडस केले नाही. इतकेच काय.! बी.जे.देशमुख यांनी देखील आ.डॉ. किरण लहामटे यांच्यावर निशाणा साधला. विशेष म्हणजे भाषण करुन झाल्यावर त्यांना आमदार आठवले आणि त्यांनी व्यासपिठावर उभे राहुन २५ वर्षे कोण राहिल हे जनता ठरवेल अशी खोचक टिपण्णी केली. एकीकडे व्यासपीठाहून अनेकांची उणीधुणी जरी काढली असली. तरी, अगदी शांतता आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा संपन्न झाली.