नोकरीचे अमिष दाखवून २२ लाख लुटले.! विरोधी पक्षनेत्याच्या मुलाचा कारणामा.! संगमनेरात तिघांवर गुन्हा दाखल.!

सार्वभौम (संगमनेर) :-

नोकरीचे अमिष दाखवून तब्बल २२ लाख १० हजार रुपयांची फसवणुक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत क्लर्कचा जॉब मिळविण्यासाठी संगमनेर तालुक्याती डोळासणे, घुलेवाडी, मंगळापूर आणि शहरातील इंदिरानगर अशा चौघांनी ही रक्कम एका महिलेसह तिघांना दिली. मात्र, पैसे देऊन देखील बनावट जॉईनिंग कार्ड देण्यात आले. ही घटना २० ऑगस्ट २०२२ रोजी दरम्यान घडली. यात किर्ती सतिशकुमार भालेराव (घाटकोपर, मुंबई), शिवदर्शन नेताजी चव्हाण व विश्‍वजित विकास चव्हाण (रा. ओरचड, तेलको रोड, पिंपरी चिंचवड, पुणे) या तिघांना आरोपी करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, वर्षभरापुर्वी प्राची रमेश काकड (रा. डोळासणे, ता. संगमनेर) हिची ओळख आरोपी किर्ती भालेराव हिच्याशी झाली होती. तेव्हा किर्ती म्हणाली. की, मला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पर्मनन्ट क्लर्कचा जॉब मिळाला असून ४५ हजार पगार आहे. माझ्या मामांचा मित्र आरोपी शिवदर्शन चव्हाण यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ओळख आहे. पाच लाख देऊन तेथे नोकरी मिळते. तुला देखील नोकरी मिळू शकते. तेव्हा प्राची म्हणाली. की, इतके पैसे आमच्याकडे नाही. मात्र, घरच्यांशी बोलुन सांगते. यांनी इकडून-तिकडून पैसे जमा केले. त्यानंतर ठरले की, अडिच लाख रुपये पहिल्यांदा द्यायचे आणि नंतर अडिच लाख द्यायचे. त्यानुसार काकड हिने एक लाख रुपये किर्तीच्या मोबाईलवर सेंड केले.

दरम्यान, प्राची सोबत अनेकांना नोकरीची अभिलाशा लागली. स्वत:ला स्पर्धेत न उतरविता आयत्या नोकर्‍या मिळविण्याचा प्रयत्न प्रत्येकाला ५ लाख रुपयांना भोवला आहे. यात प्राची काकडे (५ लाख ४० हजार), ज्योती संजय सातपुते (५ लाख ४० हजार), शिवाणी प्रतिक पवार (५ लाख ४० हजार) व सुनिल यशवंत हांडे (५ लाख ६० हजार) असा २२ लाख १० हजार रुपयांना गंडा घातला आहे. जेव्हा या प्रत्येकाने काही रक्कम ही ऑनलाईन पद्धतीने सेंड केली. तेव्हा, यांना पुण्याला बोलविण्यात आले होते. त्यानुवार दि. ४ सप्टेंबर २०२२ रोजी हे सर्व पिंपरी चिंचवड काळेवाडी चौक हॉटेल कुणाल येथे गेले होते. तेथे  आरोपी शिवदर्शन नेताजी चव्हाण व विश्‍वजित विकास चव्हाण हे आले होते. त्यातील शिवदर्शन याने सांगितले. की, माझे वडिल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विरोधीपक्षनेते होते. त्यामुळे माझी तेथे चांगली ओळख आहे. त्यामुळे तुम्ही पैसे द्या, जॉबची काळजी करु नका. त्यामुळे, उपस्थित असणार्‍या नोकरीप्रेमी व्यक्तींनी आरोपींना मोठ्या विश्‍वासाने पैसे दिले.

दरम्यान, स्पर्धेत स्वत:ला सिद्ध न करता पैसे भरुन नोकरी मिळू पाहणार्‍यांनी सर्व पैसे दिलेल्यानंतर आरोपी यांच्याकडे वारंवार जॉईनिंग लेटरची मागणी केली. मात्र, या विश्‍वासघाती बहाद्दरांनी सगळ्यांचे पैसे आल्याशिवाय जॉइनिंग लेटर मिळणार नाही असे सांगितले. त्यानंतर सर्वांचे पैसे दिल्यानंतर जॉइनिंग लेटर कधी देणार हा तगादा सुरू झाला. मात्र, उत्तर असणार तरी काय होते? आता प्रस्ताव तयार झाला आहे, आता फक्त सही बाकी आहे, आता साहेबांच्या टेबलावर फाईल आहे, नेमकीच साहेबांची बदली झाली आहे, आता निवडणुका चालु आहेत अशी नाना कारणे देऊन आरोपींनी हुशार मुलांची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरम्यानच्या काळात जॉइनिंग लेटरची फारच मागणी होऊ लागली. तेव्हा या तोतया व्यक्तींनी थेट बनावट सही शिक्क्यांचे जॉइनिंग लेटर तयार करुन यांना व्हाट्सऍप केले. मात्र, हे सर्व फेक लेटर असल्याचे सहज लक्षात येत होते.

दरम्यान, आपली फसवणुक झाली आहे. हे लक्षात येताच चौघौनी पैशाची मागणी सुरू केली. तेव्हा आरोपी म्हणाले. की, नोकरी देणार आहे. त्यामुळे, काळजी करु नका. तेव्हा यांच्या फालतु गोष्टींवर आता विश्‍वास राहिला नव्हता. या मुलांनी पैशाची मागणी केली तेव्हा यांच्याकडून वारंवार टाळाटाळ होत होती. देतो, पाहु, पाळुन चाललोय का? आज पैसे देतो, उद्या देऊन टाकतो. त्यानंतर फोन बंद करुन ठेवणे, कधी फोन न उचलणे असे चाळे यांचे सुरु झाले. त्यानंतर, यांनी आपली फसवणुक केली हे लक्षात येताच चौघांनी पोलीस ठाणे गाठले आणि तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर, असल्या नोकरीच्या अमिषाला कोणी बळी पडू नका. नोकरीसाठी संघर्ष करा, कष्टाने यश संपादन करा, आई वडिलांच्या पैशाचा अशा प्रकारे अपवेय करु नका. कोणाला पैसे देऊ नका आणि कोणाकडून अशा गोष्टींसाठी पैसे घेऊ नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.