शिवछत्रपती पुरस्कार विजेता खंत ठेऊन अनंतात विलिन झाला.! देशाला खुप काही दिले पण देश त्याला साधे लिव्हर देऊ शकले नाही.!

- सागर शिंदे 

सार्वभौम (अकोले) :-

     मरावे परी किर्तीरुपी उरावे असे म्हणतात. मात्र, मरण्याला देखील एक वयाची अट असावी असे आजकाल वाटु लागले आहे. असे म्हणतात की, जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला.! मग, देवाच्या लेखी चांगले जगणे म्हणजे मृत्यु असेल. तर मग आयुष्याला अर्थ तरी काय? होय.! जसा आमचा मित्र शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित अक्षय देशमुख हा शेकडो पदकं मिळवून देखील अवघ्या २७ व्या वर्षी देवाला प्रिय होतो तेव्हापासून संघर्ष, यश, पदकं, दानधर्म आणि शासन-प्रशासन यांच्यावरील विश्‍वास सुद्धा उडून जातो. मोठमोठे मेडल, राज्यशासनाचे पुरस्कार पण जेव्हा अक्षय अखेरच्या घटका मोजत असतो तेव्हा ना कोणी किडणी देते ना शासन एक रुपयांची मदत करते. तेव्हा नकळत प्रश्‍न पडतो, मी देशासाठी पण वेळ आल्यावर माझ्यासाठी कोण? आज २७ वर्षाचा तरुण तिरंग्यासाठी झुंजत राहिला. कधी थायलंड, कधी बँकॉक तर कधी हंगेरी अशा ठिकाणी जाऊन अटकेपार तिरंगा फडकविला. पण, जेव्हा अक्षयला अखेरचा श्‍वास घेताना मदत हवी होती. तेव्हा ती मिळाली नाही आणि त्याने जगाचा निरोप घेतला...!!!

मधुकर रंगनाथ देशमुख अगदी शांत, संयमी मुद्रेचे व्यक्तीमत्व. उंचखडक बु गावात मोलमजुरी करुन त्यांनी शिक्षण घेतले. आयुष्यात काहीतरी करुन दाखविण्याची जिद्द होती. त्यामुळे, मोठ्या कष्टाने ते शिक्षक झाले. तो काळ म्हणजे अगदी आर्थिक आणिबाणीचा होता. मात्र, तरी देखील त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. पुढे स्पोर्ट टिचर म्हणून त्यांची एक नवी ओळख निर्माण झाली. मधुकररावांना त्यांच्या जिवणात जे करता आले नाही. त्याचे दिवास्वप्न यांनी मुलात पाहिले. अगदी लहाणपणापासून अक्षय खेळकर होता. त्याला फुटबॉल. कॅरम, बास्केटबॉल अशा काही खेळांमध्ये रुची होती. त्याला त्याच्या वडिलांचे सांगणे होते. तु ज्या क्षेत्रात जाशील तेथील तुला सर्वेच्च व्हायचे आहे. त्यानंतर अक्षयने तलवारबाजीत आपले करिअर करायचे ठरविले. नाशिक तालुक्यातून त्याने जी यशस्वी घोडदौड सुरू केली, ती अगदी देशाच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन अनेक यशाची शिखरे त्याने पादाक्रांत केली.

अक्षय म्हणजे एक धगधगता ज्वालामुखी होता, एकदा त्याने ठरविले की जे स्वप्न पुर्ण करायचे ते पुर्ण झाल्याशिवाय त्याला चेन पडत नव्हती. अल्पवयाचा अक्षय पण प्रचंड बुद्धमत्ता आणि संघर्ष करण्याची ताकद त्याच्या अंगी होती. देश पातळीवर खेळण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी त्याने दिवसरात्र मेहनत घेतली आणि देशासाठी त्याने सुवर्णपदक पटकविले. अशी अनेक पदकं त्याच्या नावे आहेत. कधी महाराष्ट्रतील २० ते २५ जिल्हे तर कधी थायलंड, कधी बँकॉक तर कधी हंगेरी अशा ठिकाणी अक्षयने तिरंगा फडकविला आहे. या सर्व यशाची दखल घेऊन १७ फेब्रुवार २०१९ साली क्रिडा क्षेत्रातील सर्वेच्च समजला जाणारा सन्मान शिवछत्रपती पुरस्कार अक्षयला प्रदान करण्यात आला. त्याच वेळी शासनाने जाहिर केले होते. की, अक्षय हा तरुण असून त्याला त्याचे कार्य कौतुकास्पद आहे, त्यामुळे त्याला लवकरच शासकीय नोकरीत घेण्यात येईल. मात्र, झाले काय? अक्षयला मरेपर्यंत शासनाने नोकरी दिली नाही. इतक्या दगडाच्या काळजाची आणि गेंड्याच्या कातडीची ही व्यवस्था आहे.

पुढे सन २०१९ मध्ये कोरोनाने भारतात हाहाकार माजविला. त्यात अनेकांनी आपला जीव गमविला. रोज तलवारीशी युद्ध खेळणारा अक्षय देखील कोरोनाशी झुंज देत होता. टॉॅसिलिझुमॅब, रेमडिसिव्हीर आणि प्रचंड उष्ण व महागड्या गोळ्यांनी अनेकांना साईड इफेक्ट होत होते. पण, जीव डॉक्टरांच्या कचाट्यात असल्यामुळे देश हतबल होता तेथे रुग्ण तरी काय करणार होते, त्याचीच शिकार अक्षय ठरला होता. कोविडशी झुंजत असताना जसा तो मैदान गाजवत विजयश्री होत होता तसे त्याने कोरोनावर देखील मात केली होती. मात्र, कालांतराने या गोळ्या व इंजक्शनचा प्रादुर्भाव त्याच्या शरिरावर झाला आणि लिव्हार इन्फेक्शन होऊन त्याला लिव्हार सोरायसिस झाला. काल देशासाठी लढणारा अक्षय आज स्वत:च्या शरिराशी झुंजू लागला होता. या काळात देखील त्याने जगण्याची जिद्द सोडली नव्हती, तलवारीशी नाते तोडले नव्हते, ना आपल्या धेय्यची कास सोडली होती. जोवर मी जिवंत आहे तोवर मी रणांगणात लढतो आहे असा भास त्यास होत होता. पण, जसजसा आजार वाढत गेला तसतसा त्याच्या डोळ्याभोवती अंधार दाटत चालला होता.

गेल्या महिन्यात अक्षयला रुग्णालयात दाखल केले होता. तेव्हापासून मैदानात पातं फिरविणारा योद्धा आता अंथरुणावर खिळला होता. त्याच्या डोळ्यांतून नकळत अश्रुंच्या धारा निखळत होत्या. कारण, वारंवार तो आपल्या जीवणातील संघर्षाची कहाणी आपल्या डोळ्यांसमोल चलचित्रासारखा फिरवत होता. येणार्‍या काही तासांत तो जगाचा निरोप घेणार होता. मात्र, जाताना त्याला प्रचंड वेदना होत होत्या. कारण, ज्या सन्मानानं त्याला शिवछत्रपती पुरस्कार दिला. त्या सन्मानानं तो नोकरीच्या प्रतिक्षेत अखेरपर्यंत राहिला. ज्या देशासाठी तो खेळला त्या देशात त्याला कोणी लिव्हर दान करु शकले नाही. ज्या मातीसाठी त्याने घाम गाळला तेथे एक रुपयांची देखील आर्थिक मदत कोणी दिली नाही. खरंतर अक्षयने जग जिंगले होते. मात्र, या घाणेरड्या व्यवस्थेला त्याची किंमत झाली नाही. मी देशासाठी कोठे कमी पडलो या विचारांचे द्वंद्व तो स्वत:शी खेळत राहिला. पण, ना उपचार मिळाला ना मदत, ना नोकरी मिळाली ना लिव्हार. देशाच्या तिरंग्याला डोळ्यासमोर ठेऊन हताश अंत:करणाने अक्षयने अखेरचा श्‍वास घेतला आणि तो शहिद झाला.!! त्याच्या वेदनांचे काहुर आजही त्याच्या आई वडिलांच्या कानी गुंजत आहे. अक्षय शरिराने गेला पण तो किर्तीरुपी आजही जिवंत आहे....