अभिनंदन.! अगस्ति कॉलेजच्या टि.वाय बीएची ४० च्या ४० विद्यार्थी नापास.! व्यावस्थापनाचा भोंगळ कारभार.! विद्यार्थी आक्रमक.!

  

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

     अकोले कॉलेज मधून सर्वात धक्कादायक बातमी समोर आली आहे. टि.वाय बीएच्या शेवटच्या वर्षात शिकणारे सर्व ४० च्या ४० विद्यार्थी शिक्षक व प्रशासनाच्या चुकीमुळे नापास झाले आहेत. त्यांच्या जॉग्रफीच्या शिक्षकांनी मोठा पराक्रम केल्याचे समोर आले आहे. वर्गातील ४० विद्यार्थ्यांना थेअरीमध्ये चांगले गुण असून सर्वांना ए प्लस, ओ, बी प्लस असे ग्रेड आहेत. मुलांच्या सात विषयांपैकी एकही विषयात कोणी फेल असल्याचे दिसत नाही. मात्र, कॉलेज प्रशासनाने त्यांना क्रेडिट मार्क दिले नाही. एव्हाना ते पुणे विद्यापिठाकडे जमाच केला नाही. त्यामुळे कॉलेजच्या एका घोडचुकीने ४० विद्यार्थ्यांना शेवटच्या सेमिस्टरला नापास होण्याची वेळ आली असे मत पालकांनी व्यक्त केले आहे. हे फार मोठे शैक्षणिक नुकसान असून आता या मुलांनी करायचे काय? यासाठी कॉलेजचे काही लोक पुणे विद्यापीठाच्या खेटा मारत आहे. आता चुक झाली, आम्ही दंड भरु, मुलांना पास करुन घ्या अशी विनंती करत असल्याचे बोलले जात आहेत. त्यामुळे, आता ४० विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय? कॉलेज त्यांना कसे पास करणार? त्यांचे क्रेडीट मार्क कसे देणार? निकालपत्र कसे बदलुन देणार? यास जबाबदार कोण? दोषी व्यक्तींवर काय करवाई करणार? याबाबत कॉलेजने माध्यमांना आणि तालुक्यातील पालकांना उत्तर देणे गरजेचे आहेे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरु असून किमान तुमच्या राजकारणापाई विद्यार्थ्यांच्या जीवाशी तरी खेळु नका अशी विनंती पालकांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, सन २०२२-२३ च्या सालात टि.वाय बीएच्या वर्गात ४० विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतले होते. त्यांना इतिहास, राज्यशास्त्र, भुगोल, आपत्ती व्यवस्थापन, संशोधन अभ्यास पद्धती, भारताचा भुगोल आणि इंग्रजी हे विषय आहेत. त्यात विविध ऍक्टीव्हिटीमधून मुलांना शंभर पैकी काही गुण देण्याचा अधिकार हा कॉलेजला आहे. बाकी विषयांच्या शिक्षकांनी त्यांचे क्रिडीट मार्क विद्यापीठाला दिले. मात्र, जॉग्रफी विषयाचे मार्क्स ते दिलेच नाही. त्यामुळे, ४० च्या ४० विद्यार्थी नापास झाल्याचे रिझल्ट आज ऑनलाईन दिसत असून तो विद्यार्थ्यांनी काढून घेतला आहे. प्रचंड अभ्यास करुन देखील फेल रिझल्ट आल्याने अनेकांचे डोके चक्रवून गेले. मात्र, ज्याला फोन करावा तो नापास असे पाहिल्यानंतर लक्षात आले. की, हा कॉलेजचा किंवा विद्यापीठाचा भोंगळ कारभार असून जेथे शिकायला आलो तेथेच आयुष्य उध्वस्त होऊन बसले अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांच्या आल्या आहेत.

दरम्यान, ज्यांना वाटत होते की आपण हुशार असून नापास झालो कसे? त्यांनी आपला रिझल्ट व्यवस्थित पाहिला आणि चौकशी सुरू केली. त्यानंतर मुलांच्या लक्षात आले. की, लेखी परिक्षेत चांगले गुण आहे. अन्य विषय पास आहेत, ग्रेड मार्क देखील चांगले आहे. कोणत्याही विषयाच्या समोर एफ (फेल) लिहीलेले नाही. मग शेवटी पास असा उल्लेख आवश्यक असताना तेथे फेल येते कसे? हा प्रश्‍न काही एकाचाच नव्हता. तर टि.वाय बीएच्या वर्गात शिकणार्‍या ४० विद्यार्थ्यांचा होता. विद्यार्थी आपल्या हुशार शिक्षकांकडे गेले. त्यांच्यापुढे आपली कैफीयत मांडली. त्यानंतर लक्षात आले. की, जॉग्रफी विषयाचे "क्रेडीट मार्क" विद्यापिठाला जमाच झाले नाही. त्यामुळे, त्यांनी सगळ्या मुलांचा फेल रिझल्ट देऊन टाकला. मग आता प्रश्‍न पडतो. की, या विषयाचे शिक्षक काय करत होते. त्याहुन पुढे गेले तर एचओडी यांनी काय केले? पर्यवेक्षक, उपप्रचार्य आणि प्रचार्य अगदी कॉलेजच्या अध्यक्षांपर्यंत यांना मुलांच्या शिक्षणाची काळजी नाही का? की केवळ कॉलेज म्हणजे राजकीय आड्डा बनवून ठेवला आहे? असा संतप्त सवाल पालकांनी केला आहेे.

हे क्रेडीट मार्क देतात कसे?

पाठ्यपुस्तकांच्या व्यतिरिक्त अन्य ऍक्टीव्हिटी यासाठी शंभर मार्क्स असतात. त्यात संशोधन करणे, खेळ, प्रयोग आणि त्याच बरोबर इस्त्रो सारख्या संस्थेचे काही ऑनलाईन लेक्चर असतात. ते अटेन्ड केल्यानंतर त्यांची काही माहिती मेलवर येते. त्याच बरोबर एक प्रमाणपत्र देखील येत असते, ते कॉलेजमध्ये जमा करायचे असते. त्यानुसार शिक्षक मार्क्स देतात आणि ते विद्यापिठाकडे दिले जातात. मात्र, प्राध्यापक महोदयांनी त्या गुणांची तळी भरली. त्यामुळे, विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. आता हे प्रमाणपत्र पुन्हा कॉलेजने मागितले आहे. पण, ते काही विद्यार्थ्यांकडे असेल का? तो तेव्हाचा मोबाईल आणि त्यावर आलेले मेल किंवा प्रमाणपत्र मुलांकडे असेल का? नसेल तर ते मुलं नापास समजायची का? असे अनेक प्रश्‍न विद्यार्थ्यांच्या मनात गोंधळ करुन गेले आहेत. हे सर्व भोंगळ कारभाराचे श्रेय्य पालकांनी कॉलेज प्रशासनाला दिले पाहिजे. 

कॉलेज गिळंकृत केले आहे.! 

खरंतर, शिक्षण म्हणजे तेथे तज्ञ व्यक्ती असले की त्यांना शिक्षणाचे महत्व असते आणि कारभार देखील चांगला चालतो. मात्र, अकोले कॉलेजवर चिम्याचा पाहुणा गोम्या आणि गोम्याचा पाहुणा टोम्या. त्यामुळे, हे कॉलेज आहे की पाहुण्या रावळ्यांचे बाजारतळ हेच कळत नाही. ज्याला कारखान्यात जागा नाही तो कॉलेजवर विश्‍वस्त करायचा, ज्याला दुधसंघात तिकीट नाही त्याला कॉलेजवर घ्यायचं त्यामुळे शिक्षण व्यवस्थेचा पार बाजार मांडून ठेवला आहे. इतकेच काय.! ज्यांची पात्रता नाही तेच लोक आता प्राध्यापक म्हणून दिसू लागले आहे. म्हणजे, बड्या घरचे भले हुशार आणि मिरीटवाले झाले हद्दपार. खरंतर कॉलेजच्या रोस्टरपासून ते अगदी नापास झालेल्या विद्यार्थ्यांपर्यंत येथे अनेक गोष्टींच्या चौकशा होणे गरजेचे आहे. मात्र, एकेकाळी समुद्र गिळंकृत करणार्‍या अगस्ति महाराजांच्या नावे सुरू झालेल्या कॉलेजला आता राजकीय व्यक्तींनी गिळंकृत केले अशा प्रतिक्रीया सामान्य व्यक्तींकडून येऊ लागल्या आहेत. त्यामुळे, गुणवंत विद्यार्थी नापास होत असून प्राध्यापक, विद्यापीठ आणि प्रशासनाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे जीवण उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. असे मत पालकांनी व्यक्त केले आहे. आता या प्रकरणात अकोले तालुक्याचे आमदार आणि गेल्या वर्षी विश्वस्त पदाहुन कॉलेजचे दार धरुन बसणाऱ्या नेत्यांनी लक्ष घालावे अशी देखील मागणी होत आहे.

मुलांना पास करुन आणू...!!

मला काल याबाबत कल्पना मिळाली आहे. त्यानुसार मी चौकशी केली आहे. आम्ही मार्क्स पाठविले होते. मात्र, ते विद्यापीठाने दिले नाही. ही त्यांची चुक असल्याचे लक्षात येते. आम्ही आमच्याकडील पुरावे जमा करुन त्यांना देऊन आणि ४० विद्यार्थी नापास झाले आहेत ते पास करुन घेऊ. मुले नापास झाली आहेत हे खरे आहे. मात्र, त्यात आमची चुक असेल तर आम्हाला दंड भरुन ती चुक दुरूस्त करावी लागलेल मात्र विद्यापीठाची असेल तर त्यांना ४० विद्यार्थ्यांना पास करुन द्यावे लागेल.

- डॉ. भास्करराव शेळके (अगस्ति कॉलेज प्राचार्य)

क्रमश: भाग १