मी आणि माझी बंद पडलेली शाळा.! थडक्लास राजकारणाचे ३० ते ३५ बळी.! गाव आले धावून.!!

   

- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
      खरंतर उंचखडक बु गाव म्हटल की एकतर श्री सदगुरू यशवंत बाबांचे नाव आणि दुसरे म्हणजे येथील घाणेरडे राजकारण या दोन गोष्टी अगदी फेमस आहेत. पण, यात आमच्या गावची जिल्हा परिषद शाळा बंद पडली आणि तब्बल ३० ते ४० विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. अर्थात या बाळ गोपाळांनी काय कोणाचे वाईट केले? पण, अवघ्या सहा वर्षाची चिमुकली मुले लुटूलुटू पायपीट करीत तीन मैल अंतर काटून औरंगपूर शाळेत जाऊ लागले. दुर्दैव असे की, शिक्षकांनी कोणताही गुणवत्ता दिली नाही त्यामुळे राजकारण हे निमित्ताला कारण झाले आणि उंचखडक बु गावच्या शाळेला टाळे टोकले. सहज गावच्या गृपवर मेसेज वाचला की शाळा बंद पडली आणि प्रचंड अस्वस्थता जाणवली. त्याच क्षणाला गाव गाठविले आणि पटसंख्या व मुख्य कारणे जाणून घेतली. चार ते पाच दिवस गावातील तरुण आणि खुद्द शिक्षण अधिकार्‍यांना घेऊन पायपीट केली आणि आज शाळेत ३५ पेक्षा जास्त विद्यार्थी असून शाळा उत्तम रितीने चालु झाली आहे...!!
शिक्षण व्यवस्थेवर काय बोलावे आणि काय नाही, कधीकधी मन सुन्न होऊन जाते. काही शिक्षक शाळा उभी करण्यासाठी आणि विद्यार्थी घडविण्यासाठी जिवाचे रान करतात आणि काही भात खाऊन छान झोपतात. अर्थात एकेकाळी ५० पेक्षा जास्त पट असणारी शाळा बंद व्हावी ही फार मोठी शोकांतीका आहे. पण, या घाणेरड्या व्यवस्थेवर आणि अकार्यक्षम शिक्षकांवर बोलुन तरी काय फायदा? पण, लाखो आणि कोट्यावधी रुपये खर्च करुन देखील आदिवासी आणि गोरगरिबांची मुले ७ वी ते ८ वी कक्षेत जाऊन देखील ते लिहु आणि वाचू शकत नाही. पटावर असून उपयोग तरी काय? हे केवळ तिजोर्‍या खाली करुन घरे भरण्याचा धंदा आहे असे वाटू लागले आहे. असो...!!
माझ्याच उंचखडक बु गावचं पहा ना.! १३ मुले आणि दोन शिक्षक ते ही २०२३ चे वर्षे सुरु झाले आणि एक देखील मुलगा शाळेत राहिला नाही. शिक्षक म्हणतात आम्ही शिकविले आणि गुणवत्ता देखील दिली? मग आम्ही विचारलं मग शाळेत मुले कुठय? त्याचे उत्तर त्यांना देखील काही शोधून सापडत नाही. खरंतर, आमचे गावचे प्रकाश देशमुख यांनी व्हाटसऍप गृपवर मेसेज टाकला आणि माझ्यासारख्या माजी विद्यार्थ्याला खडबडून जाग आली. यापुर्वी तेथे राजकीय हेवेदावे सुरू होते. पण, शाळा बंद होईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. त्यामुळे, हस्तक्षेपाचा प्रश्‍न नव्हता. त्या दिवशी मेसेज वाचला आणि गावाकडे चालता झालो. गावात जाऊन शाळेच्या समस्या जाणून घेतल्या आणि थेट पालकांशी संवाद साधण्याचे ठरविले. पहिल्या दिवशी मी सागर शिंदे, आबासाहेब मंडलिक, प्रशांत देशमुख, श्यामराव देशमुख, संजय गावंडे, राजेेंद्र शिंदे, भाऊ देशमुख, दत्तात्रय मंडलिक, उद्धव देशमुख यांनी आढावा घेतला असता लक्षात आले. की, दोन्ही शिक्षकांच्या बाबत प्रचंड नाराजी दिसून आली. तर, दुसरीकडे राजकारणाचा देखील वास येत होता. आता राजकीय प्रवृत्तीला आपण काहीच करु शकत नाही. पण, शासकीय व्यवस्था नक्का हालवू शकतो याची मला खात्री होती. त्या दिवशी गावात फिरुन ६० पालकांच्या सह्या घेऊन रात्री ९ वाजता एक निवेदन तयार केले.
दुसर्‍या दिवशी सकाळीच उठून वाडी वस्ती, वाटेकरी आणि गावकरी यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना विनंती केली. आम्ही तालुक्यातील टॉपर शिक्षक गावात आणतो. पण, शाळा बंद पडेल असे काही करु नका. काल गावची गाडी बंद झाली आज शाळा बंद होत आहे. ज्या पालकांचा आमच्यावर विश्‍वास होता, त्यांनी शब्द पडू दिला नाही. ज्यांच्या डोक्यात राजकीय खुटखुटी होती. त्यांनी तोंड वाकडे करण्यापलिकडे काहीच केले नाही. सगळ्या सह्या घेऊन राजेंद्र शिंदे, दत्तात्रय मंडलिक, भाऊसाहेब देशमुख, संजय गावंडे, प्रकाश देशमुख, महेश खरात आम्ही थेट शिक्षण अधिकारी जालिंदर खताळ साहेब याचे दालन गाठले. तोवर आमदार डॉ. किरण लहामटे साहेब यांच्याशी देखील चर्चा केली होती. त्यांनी तेेथे प्रचंड सहकार्य केले. पण, आज करु आणि उद्या करु असे कोणतेही अश्‍वासन न घेता आम्ही खताळ साहेबांच्या दालनात उभे राहुन आमच्या काही भुमिकांवर आम्ही ठाम राहिलो. अर्थात खरच शाळा बंद झाली याचे दु:ख खताळ साहेबांना देखील बोचत होते. प्रचंड भावनिक आणि आत्मियता असणार व्यक्ती तसे या व्यवस्थेपुढे हतबल वाटले. मात्र, त्यांनी कोणताही वेळकाढूपणा केला नाही. आमच्या मागणीनुसार त्यांनी कार्यक्षम शिक्षक रवि रुपवते सर यांची तत्काळ नियुक्ती उंचखडक बु येथे केली. तर याहुन महत्वाचे म्हणजे साहेबांनी त्या दिवशी सायंकाळी उंचखडक बु गावात येणे पसंत केले.
त्या सायंकाळी आम्ही गावात येऊन थांबलो होतो. गावकरी देखील बर्‍यापैकी होते. शाळेत मिटींग झाली आणि आमचा सर्व ताफा वडशेताकडे निघाला. वाटेकरी, गावकरी आणि जो दिसेल त्याला भेटत स्वत: शिक्षण अधिकारी खताळ साहेबांनी प्रत्येकाशी चर्चा केली. त्या दिवशी नव्याने हजर झालेले केंद्रप्रमुख नरसाळे साहेब देखील होते. रात्री ८ वाजून गेले तरी आम्ही नदीच्या कडेकडेने विद्यार्थी शोधत फिरत होतो. गावातील सागर शिंदे, सागर देशमुख, बबनराव देशमुख, श्यामराव देशमुख, प्रकाश देशमुख, संजय गावंडे, राजेेंद्र शिंदे, भाऊसाहेब देशमुख, दत्तात्रय मंडलिक, तुषार देशमुख, उद्धव देशमुख, महेश जेजुरकर, प्रतिक मंडलिक, विकास खरात, दिपक देशमुख यांच्यासह अनेकांनी उंचखडक बु गावातील एक नवा इतिहास अनुभविला. यातील विशेष म्हणजे रवि रुपवते सरांची पोष्टींग देखील तेथे झालेली नव्हती. तरी देखील उंचखडक बु गावात येऊन वाडीवस्तीवरील लोकांना गुणवत्तेबाबत विश्‍वास दिला. तो दिवस शुक्रवार होता. 
दुसर्‍या दिवशी शनिवार असल्याने दुसर्‍या दिवशी रविवार होता. त्यामुळे अनेकांनी सोमवारचा मुहुर्त ठरविल्याने शनिवारी आम्ही अगदी सकाळी जाऊन देखील कोणी शाळेला दांडी मारली तर कोणी येण्यास नकार दिला आणि मुले दुसर्‍याच शाळेत निघुन गेली. आपण जे काही करतोय हे आनंदी असले तरी प्रचंड वेदना देणारे होते. लोकांनी तळमळ का समजत नाही? याचे उत्तर काही मिळत नव्हते. सोमवारी तरी मुले यातील अशी आशा होती. पण, जे काही केले त्यावर पाणी फिरणार तर नाही ना? असे वाटत होते. त्यामुळे, रविवारी रात्री अक्षरश: एक सेकंदभर देखील झोप आली नाही. रविवारी सागर (छोटू) देशमुख याची महत्वाची मदत घेतली. राजेंद्र शिंदे, श्यामराव देशमुख, संजय गावंडे, भाऊसाहेब देशमुख यांनी मात्र एक सेकंदभर माझी साथ सोडली नाही. आम्ही पुन्हा पालकांना सामोरे गेलो. सोमवारी सकाळी मात्र सुर्य आकाशाच्या गर्भात असता आम्ही एकमेकांना फोन करुन बंद पडलेल्या शाळेत भेटलो. मुलांना थेट गाडीवर टाकायचे आणि शाळेत आणायचे हाच फंड पुन्हा वापरला. त्या दिवशी मात्र मनाला प्रचंड समाधान लाभले होते.
आठवडाभरापुर्वी बंद पडलेल्या शाळेत सोमवारी ३६ मुले दाखल झाली होती. त्यामुळे गावातून त्यांची दिंडी काढण्यात आली. तो खर्‍या अर्थाने विद्यार्थी प्रवेश सोहळा होता. उंचखडक बु गावच्या गल्ली-गल्लीत काहींनी सडा शिंपडला होता तर ठिकठिकाणी रांगोळ्या काढल्या होत्या. ढोलाच्या ताशाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या नादात मुले आनंदुन गेली होती. उपस्थित गावकरी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत होते. पालकांना देखील आम्ही सन्मानित केले होते त्यामुळे, त्यांना देखील एक प्रकारचे समाधान वाटत होते. शाळेच्या इतिहासात कधी नव्हे पण पहिल्यांदा गावच्या मोठ्या चौकात विद्यार्थ्यांचा कार्यक्रम पार पडत होता. मुलांना लाडू, चॉकलेट, बिस्कीटचे पुढे, जेवण त्यामुळे मुलांना देखील शाळा हवी हवी वाटत होती. विशेष म्हणजे हरिओम भेळ सेंटरचे मालक अजिंक्य उर्फ बबलु शेटे यांनी प्रत्येक मुलांना वह्यांचे सेट आणि पेन दिले. त्या दिवशी मला आणि माझ्या सहकार्‍यांना प्रचंड आनंद झाला होता. काल शाळेत एक देखील मुलगा नव्हता आणि आज शाळेत मुलांना बसण्यासाठी बाकडे नव्हते. ही बाबत जेव्हा शिक्षण अधिकारी खताळ साहेबांना सांगितली. तेव्हा त्यांना देखील प्रचंड आनंद झाला. विशेषत: बाहेर शाळेत टाकून ज्या पालकांनी फी भरुन ना भरुन पुन्हा आपले पाल्य मराठी शाळेत टाकले त्या तुषार देशमुख, दिलीप देशमुख, उद्धव देशमुख, नितीन देशमुख, विलास गावंडे, सागर त्र्यंबक देशमुख, सरपंच सुलोचना शिंदे, सिताराम खरात, विकास खरात, साईनाथ यांच्यासह अन्य पालकांचे आभार.
आज शाळेचा आवश्यक तो पट पुर्ण झाला आहे. पण, यात एक गोष्ट लक्षात आली. की, गावात ४९ अशी मुले आहेत. जी सिनिअर केजी आणि ज्युनिअर केजी यात बसू शकतात. जर या मुलांना आजच शिक्षण दिले. तर, येणारी पिढी चांगली गुणवत्तेची राहिल. त्यामुळेे, येणार्‍या काळात असे प्रयत्न आता सुरू केले आहेत. पण, यापलिकडे जे विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन गेले आहेत किंवा जे लोक गावाबाहेर मोठ्या हुद्द्यावर असून ते मदत करु शकतात त्यांनी ही शाळा उभी करण्यासाठी मदत करणे अपेक्षित आहे. कोणाला सक्ती नाही पण त्यांनी फुल ना फुलाची पाकळी देऊन मदत करावी असे आवाहन आम्ही करत आहोत. 
(या लेखात ज्यांची कोणाची नावे चुकून राहिली आहेत किंवा कोणाची मने दुखावली असेल तर त्यांची दिलगिरी व्यक्त करतो- आपला मित्र सागर शिंदे)