पिचड साहेबांनी पदं दिली मग काय उपकार नाही केला, मग पाकिस्थानातून कार्यकर्ते आणले असते का.? भाजपा भावनिक राजकारण करतय,

- सागर शिंदे     

सार्वभौम (अकोले) : -

                तालुक्यातील संस्थावर आम्हाला नेमले म्हणजे काही उपकार केले नाही. आम्हाला नाही नेमायचे तर काय पाकिस्थानातून मानसे आणणार होते का ? खरोखर पिचड साहेबांनी एकही संस्था उभी केली नाही. ना त्या उभ्या करण्यास बळ दिले. उन्नती सेवा मंडळ  देखील भांगरे साहेबांनी उभे केले आहे.  त्यामुळे, हे वास्तव नाकारुन कसे चालेल? भाजपा फक्त भावनेचा खेळ करते. त्यांना त्या पलिकडे काही जमत नाही. खरंतर, अगस्ति कारखान्यात आम्ही स्व. अशोकराव भांगरे साहेब यांच्यानंतर सुनिताताई भांगरे यांना संचालक केले आणि व्हा. चेअरमन देखील केले. हे काही कोणाच्या सांगण्याहून नाही. मात्र, भांगरे साहेब गेल्यानंतर अगस्ति ऐज्युकेशन संस्थेत का नाही यांनी भांगरे कुटुंबाचे कोणी घेतले नाही? ज्या मानसांचे काडीचे योगदान तेथे नाही त्यांना मात्र तेथे घेतले आहे. केवळ भावनेचा खेळ हा भाजपा करीत आहे. भाजपाने या तालुक्याला काही दिले नाही. पवार साहेब, थोरात साहेब, उद्धव ठाकरे साहेब यांच्यामुळे झाले आहे. बाकी कोणाचे योगदान नाही असे म्हणत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे यांनी पिचड साहेबांसह भाजपावर टिका केली. ते शेंडी येथील सभेत बोलत होते.

              खरेदी विक्री संघ आणि मार्केट कमिटीच्या प्रचारार्थ बोलताना राज्याचे माजी मंत्री मधुकर पिचड साहेब म्हणाले होते. की, या तालुक्यातील संस्था मी उभ्या केल्या आहेत. मात्र, त्यावर उत्तर देताना त्यांचे पुर्वाश्रमीचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे यांनी पिचडांच्या वक्तव्याचे पोस्टमार्टम केले आहे. ते म्हणाले, ४० वर्षे सत्तास्थानी असताना देखील पिचड साहेबांनी साधी एकही संस्था उभी केली नाही. उलट ज्या संस्था माजी आमदार यशवंतराव भांगरे, माजी मंत्री दादासाहेब रुपवते, भाऊसाहेब हांडे यांच्यासह अनेकांनी उभ्या केल्या. त्यावर स्वत:चे ताबे घेऊन त्या मोडकळीस आणल्या. तालुक्यातील बहुजन समाजाला कधी नेतृत्व करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे, ते सांगतील तसेच करायचे. म्हणून तर आज सर्वच संस्था मोडकळीस आल्या आहेत. या उलट उदा. घ्या. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे. फक्त ४ वर्षे कारखान्यात अन ३ वर्षे दुधसंघात ते स्वत: चेअरमन राहिले. त्यानंतर त्यांनी अगदी सामान्य व्यक्तीला तेथे चेअरमन म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यामुळे, येथील कारखाना, दुधसंघ, अगस्ति ऐज्युकेशन संस्था, खरेदी विक्री संघ आणि उद्या होऊ घातलेली मार्केट कमिटी देखील स्थापन करण्यात त्यांचे कोणतेही योगदान नाही. मात्र, ४० वर्षे सत्तेत असल्यामुळे, लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नेतृत्व केले आणि केवळ राजकीय बोळवळ करण्याची ठिकाणी करुन ठेवली. अशा प्रकारचा थेट आणि वास्तववादी आरोप पांडे यांनी केला.

अगस्ति कारखाना कोणी उभा केला?

अगस्ति सहकारी साखर कारखाना स्थापन करण्याच्या हलचाली ह्या स्व. यशवंतराव भांगरे जेव्हा १९७२ साली आमदार होते. तेव्हापासून सुरू झाल्या होत्या. मात्र, त्याला मुर्तरूप हे १९८८ साली आले. त्यावेळी मुख्य प्रवर्तक म्हणून भाऊसाहेब हांडे यांच्या नावे पहिला प्रस्ताव पुणे संचालक यांच्याकडे दाखल झाला होता. त्याला सन १९८९-९० साली मंजुरी मिळाली. तेव्हा सिताराम पा. गायकर, मिनानाथ पांडे आणि यादवराव वाकचौरे यांच्यासह काही लोक पुण्याला गेला. तेव्हा धुमाळ नावाच्या अधिकार्‍याच्या स्वाक्षरीने ते मंजुर झालेले पत्र अकोल्यात दाखल झाले. त्यानंतर दादासाहेब रुपवते यांचे यात फार मोठे योगदान होते. तर, सोबत भाऊसाहेब हांडे यांनी देखील प्रामुख्याने फार कष्ट घेतले होते. त्यामुळे, सन १९९१ साली पहिले शासन नियुक्त प्रवर्तक मंडळ तयार झाले होते. त्यात चेअरमन म्हणून दादासाहेब रुपवते आणि व्हा.चेअरमन म्हणून भाऊसाहेब हांडे यांची नियुक्ती झाली होती. या दरम्यानच्या काळात पिचड साहेब, सुगंधराव देशमुख, किसन आरोटे, मिनानाथ पांडे, सिताराम पा. गायकर, तुकाराम मालुंजकर, रावसाहेब शेटे, सुधाकर देशमुख, सयाजीराव देशमुख, कचरूपाटील शेटे, किसन सदगिर, रभाजी आंबरे ही लोक प्रवर्तक मंडळात होती. त्यामुळे, यात दादासाहेब रुपवते यांनी कारखाना स्थापन केला. अशा प्रकारची माहिती अभ्यासक सांगतात.

दुधसंघ कसा स्थापन झाला.!

अकोले तालुक्यात तेव्हा यशवंतराव भांगरे साहेब हे आमदार होते. तर, पिचड साहेब हे पं. समितीचे सभापती होते. त्यावेळी १९७५ सालच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात दुधसंघ होण्यासाठी काही हलचाली सुरू होत्या. तेव्हा याच काळात पहिली बैठक गेस्ट हाऊस अकोले येथे बसली होती. त्याचे अध्यक्ष यशवंतराव भांगरे होते. तेव्हा पिचड साहेब, रावसाहेब शेटे, किसनराव आरोटे, भाऊसाहेब हांडे, सोपान गुंजाळ, सखाराम कोकणे, रामराव गोडसे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. तेव्हा भांगरे यांनी प्रस्ताव तयार केला आणि तो भाऊसाहेब हांडे यांनी तो नगरला नेवून सादर केला. त्यानंतर दि. ९ जानेवारी १९७६ साली दुधसंघ रजिस्टर झाला. त्याचे नाव रावसाहेब शेटे यांनी दिले होते. तर, त्यास नारायण देशमुख यांनी अनुमोदन दिले होते. त्यानंतर १५ जुन १९७६ साली पहिल्यांदा संकलन सुरू झाले. तेव्हा पहिले चेअरमन स्व. यशवंतराव भांगरे आणि व्हा. चेअरमन म्हणून किसन नाना आरोटे यांची नियुक्ती झाली होती. तेव्हा अकोले व संगमनेर असे आपले कार्यक्षेत्र होते. त्यात पी.जी. गोडसे, विठ्ठल चासकर, मनोहर तळेकर असे तीनच कर्मचारी आणि सोनवणे तात्या पहिले एमडी होते. त्यामुळे, दुधसंघ देखील यशवंतराव भांगरे यांनी स्थापन केल्याचे आजही पुरावे उपलब्ध आहेेत.

अगस्ति एज्युकेशन सोसायटी...!!

सन १९७२ साली महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून गेला होतो. तेव्हा स्व. यशवंतराव भांगरे हे पुन्हा आमदार झाले होते. अकोले तालुक्यातील मुले हे संगमनेरला जात असल्याने त्यांचे फार हाल होत होते. तर कोणी मध्यावरच शिक्षण सोडून देत होते. हे भाऊसाहेब हांडे, लालचंद शहा, कॉ. बुवासाहेब नवले, प्र.भा. हांडे, डॉ. बी.जी बंगाळ अशा काही व्यक्तींनी पुढाकार घेतला. तेव्हा यशवंतराव भांगरे यांच्यासह सर्व मुंबईत दादासाहेब रुपवते यांच्याकडे गेले. तेव्हा भांगरे आणि रुपवते दोघे आमदार होते. तर, रुपवते हे मंत्री असल्यामुळे त्यांची चलती होती. तेव्हा भर दुष्काळाच्या काळात राज्यात फक्त तीन महाविद्यालयांना मान्यता मिळाली होती. त्यात अकोल्याचे नाव होते. त्यामुळे, उपरोक्त व्यक्तींचा अकोले एज्युकेशन संस्था उभी करण्यात फार मोठा वाटा आहे. नंतरच्या काळात दादासाहेब रुपवते यांचे नाव कॉलेजला देण्यासाठी विजय वाकचौरे, शांताराम संगारे यांच्यासह अनेकांनी फार मोठी चळवळ उभी केली. दुर्दैवाने आज त्याच शिक्षण संस्थेत काय राजकारण चालु आहे. हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. 

मार्केट कमीटी कशी उभी राहिली.!

सन १९८० साली स्व. भांगरे साहेबांनी पराभूत करुन पिचड साहेब आमदार झाले. तर, १९८८ साली त्यांच्या बाजुचा दुसरा कॉंग्रेसचा गट खा. बाळासाहेब विखे यांना अगदी जवळ करीत होता. तालुक्याचा विकास झाला पाहिजे म्हणून सुगंधराव देशमुख, लक्ष्मणराव शिंदे, भाऊसाहेब नाईकवाडी हे खा. बाळासाहेब विखे यांच्याकडे गेले होते. अकोले बाजार समिती ही संगमनेरची उपबाजार समिती होती. तिला विभक्त करुन अकोले बाजार समिती नव्याने स्थापन करण्यात यावी असा प्रस्ताव खा. विखे यांच्याकडे मांडण्यात आला होता. मात्र, खुद्द पिचड साहेब यांना येथे स्वतंत्र  बाजार समिती व्हावी अशी इच्छा नसल्याने त्यांनी प्रचंड विरोध केला. मात्र, खा. विखे यांनी प्रस्ताव करुन तो तत्कालीन पालकमंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्याकडून तो पारीत करुन घेतला. तेव्हाचे डीडीआर तांबे यांनी तो मंजूर केला आणि पिचड साहेबांच्या विरोधात जाऊन काही व्यक्तींनी रेडे येथे जागा शोधून मार्केट कमिटीची स्थापना केली. त्या पहिल्या प्रवर्तक मंडळात लक्ष्मणराव शिंदे हे सभापती तर सुगंधराव देशमुख हे उपसभापती झाले होते. मार्केट कमिटीला पिचड साहेबांनी प्रचंड विरोध केला. त्यानंतर जे काही मंडळ होते त्यांतील काही व्यक्तींनी राजिनामे देखील दिले होते. हा राजकीय गदारोळ अनेकांना माहित आहे. त्यामुळे, भांगरे आमदार असताना अनेक संस्था उभ्या राहिल्या मात्र, पिचड साहेब आमदार असून देखील त्यांनी कसा विरोध केला हे सांगणारे अनेक ज्येष्ठ मान्यवर तथा अभ्यासक आजही जीवंत आहेत. त्यामुळे, या संस्था कोणी उभ्या केल्या आणि कशा उभ्या राहिल्या आहेत. हे कोणी कितीही दिशाभुल केली. तरी इतिहास हा प्रखर सुर्यासारखा आहे. तो झाकाळू शकत नाही. म्हणून पिचड साहेबांनी येथे एकाही संस्था उभी केली नाही आणि तिला सक्षम करण्यासाठी बळ दिले नाही. उलट शेजारी थोरात साहेबांचा कारखाना, दुधसंघ, मार्केट कमिटी, संस्था, पतसंस्था ह्या किती सबळ आहेत आणि अकोल्यातील संस्थांची किती आबळ आहे. हे आपण पाहतो आहेे असे मत पांडे यांनी सार्वभौमच्या मुलाखतीत व्यक्त केले.