हॉटेल पायल, पुजा आणि कॅन्डल कॅफेवर पोलिसांचे छापे.! तिघांवर कारवाई, कॉलेज विद्यार्थ्यांसाठी अश्‍लिल चाळ्यांसाठी जागा.!


सार्वभौम (अकोले) :- 

 पैसा कमविण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा काही नियम नाही. हॉटेलच्या काऊंडरवर बसून आपली बहिन, मुलगी किंवा नातीच्या वयात असणार्‍या शालेय तरुण-तरुणांना अश्‍लिल चाळे करण्यासाठी जागा निर्माण करणार्‍या काही निर्लज्ज व्यक्ती अकोले शहरात धंदा मांडून बसले आहेत. याबाबत अनेक वेळा माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी थेट काही हॉटेल आणि कॅफे यांच्यावर छापे टाकले आहेत. यात अकोले शहरात अगदी बाजार तळाच्या समोर असणार्‍या पायल हॉटेलवर छापा टाकून तेथे रगेल आणि रंगेल पणाचा बुरखा पोलिसांनी फाडला आहे. तर, अगदी बस स्थानकाच्या समोर इतक्या गर्दीच्या ठिकाणी असणार्‍या पुजा हॉटेलमध्ये कुकूचिकू करण्यासाठी जे काही कप्पे तयार केले होते. ते उध्वस्त करण्याचे आदेश भोये यांनी दिली आहे. तसेच कॉलेजच्या मुला-मुलींना नको ते चाळे करण्यासाठी कॉलेजरोड परिसरात जो कॅन्डल कॅफे तयार केला होता. त्यावर देखील धडक छापा टाकला आहे. यात ऋषीकेश अरुण डावरे (रा. निब्रळ. ता. अकोले) कॅन्डल कॅफे, पायल हॉटेलचे व्यवस्थापक प्रथमेश सुखदेव लबडे व पुजा हॉटेलचे व्यवस्थापक रामदास किसन लोहकरे यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम ३३ (एक्स) (ए) यानुसार कारवाई केली आहे.

खरंतर, अकोले तालुका हा दुर्गम भाग आहे. त्यात येतील अत्याचाराचे प्रमाण सर्वात जास्त आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलींचे अपहरण, बाल लैंगिक समस्या आणि बालविवाह हा प्रश्‍न जिल्ह्यात सर्वात मोठा आहे. याला खतपाणी घालण्याचे काम कोण करीत असेल. तर, अकोले शहर आणि राजूर भागातील काही लॉज, कॅफे आणि हॉटेल. यामुळे, राजरोस अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे पहायला मिळत आहे. अनेकांना माहित नसले पण, शहरात फार मोठा वेश्या व्यावसाय चालतो. अगदी राजकारणी आणि काही व्यापारी यांना देखील त्याची लत लागली आहे. तर, खुद्द काही प्रतिष्ठीत व्यक्ती या देहविक्रि व्यावसाय चालविणार्‍यांकडून हाप्ते घेत असल्याचे दरम्यानच्या काळात समोर आले होते. मात्र, संगमनेर, श्रीरामपूर, नगर तालुका अशा ठिकाणांसारखे अकोल्यात अद्याप खुलेआम असला प्रकार चालत नाही.

अकोले तालुक्याचे दुर्दैव असे. की, पुर्वी कॉलेजच्या नावाखाली मुलं मुली मोठ्या कॉलेजात प्रवेश घ्यायच्या आणि इकडे कोण काय रंग उधळत होते. हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. आता मात्र शाळेतील मुलींचे देखील हॉटेल, कॅफे आणि लॉज येथे लैंगिक शोषण केल्याचे समोर येऊ लागले आहे. पुजा हॉटेलमध्ये काही कप्पे तयार करण्यात आले आहेत. तसेच अन्य ठिकाणी देखील आहेत. पंधरा मिनिट ते एक तास, दोन तास आणि दिवस-दिवस मुलं अशा अडोशाला बसून राहतात. आता एकांत मिळाला म्हणजे ते काय करतात हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, यातून हॉटेल चालक मालामाल झाले आहेत. आपल्या नातीच्या, बहिनीच्या किंवा मुलीच्या वयाची तरुणी हॉटेलमध्ये घेऊन तिला अश्‍लिल चाळे करुन देणे आणि तिच्या जिवावर स्वत:चा उदरनिर्वाह करणे. हे कितपत योग्य आहे? त्यामुळे, जनाची नव्हे तर मनाची तरी लाज यांनी धरली पाहिजे. पैशासाठी एखाद्याची आब्रु लुटीचे केंद्र चालविण्यापेक्षा थाळी घेऊन भिक मागितलेले काय वाईट अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.

खरंतर, अकोले तालुक्यात नेत्यांची, पुढार्‍यांची आणि कार्यकर्त्यांची जरा देखील कमी नाही. सभेला वक्ते जास्त आणि श्रोते कमी असतात. इतका तालुका नेतामय आहे. त्यांनी फार पुरोगामी विचारांच्या बाता ठोकण्यापेक्षा किमान शेतकर्‍यांच्या मुला-मुलांनी अशा प्रकारचे कृत्य करण्यास जागा निर्माण करुन देणार्‍यांचा बाजार ऊठविला पाहिजे. त्यावर आवाज उठविला पाहिजे. कारण, यातुनच मुली पळून जाणे, तिच्यावर अत्याचार होणे, तिचे अपहरण होणे, तिचे अश्‍लिल व्हिडिओ काढणे, तिला ब्लॅकमेल करणे असे प्रकार घडत असतात. त्यामुळे, यावर कोणीतरी आवाज उठविला पाहिजे. विशेेष महत्वाचे म्हणजे आवाज उठवून अर्थपुर्ण तडजोडी न करता असे मीनी लॉज कायमचे बंद करुन मालकांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. दुर्दैवाने तालुक्यात एखाद्या प्रश्‍नावर आवाज उठविला जातो आणि नंतर तडजोडी करुन त्यावर पडदा पडतो. असला पायंडा अधिक वृद्धींगत न होता शेतकरी मायबाप तथा मोलमजुरी करणार्‍या मुलांची संरक्षण व्हावे ही प्रमाणिक इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.   

हॉटेल पायलचा नंगानाच.!

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अगदी बाजार तळाच्या समोर तथा वसंत मार्केटच्या समोर पायल हॉटेल आहे. तेथे जाण्यासाठी भिंगारे गोडाऊनकडून एक रस्ता आहे, एक भिंगारे दुकानापासून आहे, एक पायल हॉटेलमधून थेट मागच्या जिन्याने वर जाण्याची सुविधा आहे. त्यामुळे, जे काही तरुण विद्यार्थी विद्यार्थीनी आहेत. ते थेट तिसर्‍या मजल्यावर जातात. तेथे अक्षरश: मिनी लॉज सारखा प्रकार आहे. म्हणजे शाळेसाठी आलेल्या मुला-मुलींची शाळा तेथे भरते. व्यक्ती हॉटेल मधून आला आहे की चाळे करुन आला. हे लक्षात येत नाही. त्यामुळे, अगदी अल्पवयीन मुलींचा तेथे नास होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे, संस्कारक्षम व्यक्तींनी आणि कुटुंबांनी तेथे जेवणासाठी जावे का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तर, पोलिसांनी देखील अशा व्यक्तींना यानंतर कोणत्याही प्रकारचे अभय देऊ नये. तेथील आडोसे बनविलेले रुम उध्वस्त करावेत. अन्यथा येणार्‍या काळात पोलीस ठाण्यावर मोठा मोर्चा काढून निषेध केला जाईल. अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.