अरे देवा.! बॅंकेची पुन्हा 82 लाख 57 हजारांची फसवणूक.! कर्जदारांना खोट्या सोन्यावर कर्जवाटप.! अधिकारीच फ्राॅड निघाले, 23 जणांवर गुन्हे दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीन फसवणुकीचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीवर पुन्हा एक नवा फसवणुकीचा गुन्हा या एकाच महिन्यात दाखल झाला आहे. या गोल्ड व्हॅल्यूअरसह खातेदारांचा पुन्हा एक घोटाळा उघडकीस आला आहे. संगमनेर शहरातील विद्यानगर येथील जी. एस. महानगर कॉ.ऑपरेटिव्ह बँकेत 26 खातेदारांनी बनावट सोने ठेऊन बँकेची 82 लाख 57 हजार 834 रुपयांची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ही घटना 2018 ते 21 फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान घडली. हे बँकेचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे यांच्या लक्षात आले. त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून 23 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
यामध्ये आरोपी जगदीश लक्ष्मण शहाणे (रा. एकता चौक मालदाड रोड, ता. संगमनेर), राजेश केशवराव नेवासकर (रा. गणेशनगर ता. संगमनेर), शशिकला विश्वनाथ पवार (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), शरद मारुती परर्बत (रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर), महेश रामचंद्र जोशी (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), मुकुंद मुरलीधर उपरे (रा. साळीवाडा, ता. संगमनेर), योगेश शंकर सुर्यवंशी (रा. ढोलेवाडी, ता. संगमनेर), संदिप नंदलाल काळंगे (रा. इंदिरानगर ता. संगमनेर), आयुब उस्मान पठाण (रा. घुलेवाडी,ता. संगमनेर) नवनाथ भरत घोडेकर (रा. घोडेकरमळा ता. संगमनेर), नाजीम अब्दुलमान शेख (रा. मोगलपुरा, ता. संगमनेर), रविंद्र रमेश राजगुरू (रा. मालदाड रोड, ता. संगमनेर) सचिन मनलभाऊ होलम (रा. सय्यदबाबा चौक ता. संगमनेर), अनिल राजाराम पावबाके (रा. पावबाकी रोड, ता. संगमनेर) ज्ञानेश्वर त्रंबक पगारे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), राजेंद्र काशिनाथ वाकचौरे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) प्रतिक नानासाहेब केरे (रा. निळवंडे, ता. संगमनेर), विजय भास्कर अवचिते (रा. पावबाकी रोड, ता. संगमनेर), रामभाऊ भावका पुणेकर (रा.डीग्रस,ता. संगमनेर), विशाल काशिनाथ वाकचौरे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), उषा शिवाजी दुधवडे (रा. सावरगावतळ,ता. संगमनेर), वैभव प्रकाश वाकचौरे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), राजेश विश्वनाथ पवार (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) आशा 23 जणांवर फसवणुकीसह विविध कलमान्वये संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जी. एस. महानगर बँक ही अग्रगण्य बँक आहे. या बँकेत दि.1 जुलै 2016 साली अधिकृतरित्या जगदीश शहाणे हा गोल्डव्हॅल्यूअर या पदावर होता. त्याने कर्जदाराने दिलेल्या सोन्याची शुद्धता तपासणी करून ते सोने खरे आहे की खोटे याची खात्री केल्यावर सोन्याच्या मूल्यांकणाची तपासणी प्रमाणपत्र व सोनेखरे आहे. असे प्रमाणपत्र दिल्यावर कर्जदाराला बँकेच्या नियमानुसार कर्ज दिले जाते. जर कर्जदाराने बँकेत कर्जासाठी तारण ठेवलेले सोने खोटे निघाले तर त्यास गोल्डव्हॅल्यूअर व सोने तारण ठेवणारा कर्जदार जबाबदार असतो. दि. 4 फेब्रुवारी 2023 व दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी माध्यमांमध्ये गोल्डव्हॅल्यूअर जगदीश शहाणे वर गुन्हा दाखल झाल्याचे जी. एस. महानगरचे व्यवस्थापक प्रदीप शिंदे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित मुख्य कार्यलयात संपर्क करून त्यांना बातमीचा प्रकार सांगितला. कार्यकारी संचालकांनी तात्काळ सोने तारण ठेवणाऱ्या कर्जदारांना दि. 6 फेब्रुवारी 2023 व 15 फेब्रुवारी 2023 रोजी नोटीसा काढुन त्यांना कर्ज दिलेल्या सोन्याची पुर्ण तपासणी करणे आहे. तुम्ही बँकेत हजर रहा अशी कर्जदारांना व गोल्डव्हॅल्यूअरला नोटीस देण्यात आली. मात्र, गोल्डव्हॅल्यूअर जगदीश शहाणे याच्यावर जेव्हा पासुन गुन्हा दाखल झाला आहे तेव्हापासून तो संगमनेरातुन दिसेनासा झाला आहे. त्यामुळे, आरोपी जगदीश शहाणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, बँकेने 32 सोने तारण कर्जदारांना नोटीसा बजावल्या त्यापैकी 14 सोने तारण कर्जदार बँकेत उपस्थित राहिले. त्यानुसार सद्याचे बँकेचे व्हॅल्यूअर गणेश बेल्हेकर यांनी हे सोने तपासुन अहवाल सादर केला. त्या अहवाला मध्ये चार सोने तारण कर्जदार यांचे खरे सोने आढळले तर दहा जणांनी बनावट सोने ठेवल्याचे लक्षात आले. त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकांनी पुन्हा 21 फेब्रुवारी 2023 रोजी 35 नोटीसा बजवल्या त्यामध्ये 14 सोने तारण कर्जदार उपस्थित राहिले व 21 सोने तारण कर्जदार उपस्थित राहिले नाही. यात बँकेचे कायदेशीर सल्लागार, व्यवस्थापक, व्यवस्थापक सुरक्षा विभाग, दोन पंच, गोल्डव्हॅल्यूअर यांच्या समक्ष संचालक मंडळाने व्हिडीओ शुटिंग द्वारे प्रत्यक्ष पंचनामा करण्यात आला. त्यामध्ये असे आढळुन आले की, 19 सोने तारण कर्जदाराचे सोने हे खरे आहे.
दरम्यान, बाकीचे 16 सोने तारण कर्जदाराचे सोने बनावट असल्याचे लक्षात आले. हा अहवाल बँकेत सादर केला त्यामध्ये 49 कर्जदारांपैकी 26 सोने तारण कर्जदारांचे सोने खोटे असल्याचे लक्षात आले. हे सर्व आरोपी गोल्डव्हॅल्यूअर जगदीश शहाणे याला माहीत असताना त्याने खोटे मूल्यांकन प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणुक केली आहे. आता हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपी जगदीश शहाणे व खोटे सोने ठेवणाऱ्या 23 खातेदरांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवार दि. 24 मार्च 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. हा आरोपी जगदीश शहाणे याने अनेक बँकांना टोपी घातल्याने याचा अजुन किती घोटाळा आहे?तो कुठे आहे?किती जणांना याने बनावट सोने दिले. हा संगमनेरातील सुज्ञ नागरिकांना प्रश्न पडला आहे. त्यामुळे, हा व्यक्ती फसवणुक करण्यासाठी सराईत गुन्हेगार असल्याचे लक्षात येत आहे. आता या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरात कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याच्या फिर्यादी दाखल होत आहेत. मात्र, पोलिसांकडून त्याची फार कसोशीने चौकशी होताना दिसत नाही. गेल्या पंधरा दिवसात असाच मोठा एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यामध्ये एक बडा नेत्यासोबत हा फसवणुकीतील आरोपी पोलीस ठाण्यात आला आणि चर्चा करून गेला. हा आरोपी रेकॉर्डवरील असून देखील तो वजनदार व्हाईट कॉलर नेत्यासोबत येतो काय आणि कायद्याला ढाब्यावर बसवून मोठ्या ऐटीत फिल्मि स्टाईलने बाहेर जातो काय.! त्यामुळे, संगमनेर शहरात कायद्याचा धाक राहिला की नाही? महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वत: संगमनेरात लक्षा घालुन देखील. ये रे माज्या मागल्या अशीच गत होताना दिसत आहे की काय.! असा प्रश्न संगमनेरातील जनतेला पडला आहे. तर, येथील अधिकारी सिंघम नावाने आले आणि मलिदे डबल करुन गप पोलीस ठाण्यात जाऊन बसले असली चर्चा आता रंगू लागली आहे. अर्थात म्हतारी मेल्याचे दु:ख नाही. पण काळ सोकावता कामा नये. असे संगमनेर पोलीस ठाण्यात होऊ नये म्हणजे झालं. कारण, विखे पाटील यांनी संगमनेरची वाळू, गोमांस व येथील गुन्हेगारी संपुष्टात यावी म्हणून नवे अधिकारी दिले होते. पण, त्याच अधिकाऱ्यांच्या समोर सराईत गुन्हेगार येऊन सलाम ठोकून मलिदा वाटून ऐटीत बाहेर पडीत असतील तर काळ पुन्हा सोकावल्याशिवाय राहणार नाही. अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.