संगमनेरात लव जिहाद.? हिंदु मुलीशी मैत्री केल्याने विद्यार्थ्यास बेदम मारहाण, १५ जणांवर अपहरण व दरोड्यासह गंभीर गुन्हे दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
देशात आणि राज्यात लव जिहाद हा मुद्दा आजकाल फार अग्रभागी आला आहे. त्यामुळे हिंदु-मुस्लिम हा वाद प्रबळ होण्यास मोठा हातभार लागत आहे. असाच एक प्रकार संगमनेर शहरात घडला आहे. एका हिंदु मुलीवर प्रेम केले म्हणून कोल्हेवाडी रोड येथे राहणार्या दोन तरुणाचे अपहरण केले आणि विठ्ठलकडे येथील डोंगरावर नेवून त्यांना १५ जणांनी बेल्ट, काठी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. या मुलांकडील मोबाईल काढून घेत त्यांना शिविगाळ, दमदाटी करीत पुन्हा हिंदु मुलींच्या नादाला लागाल तर ठार मारु असे म्हणून धमकी दिली. संबंधित दोघे तरुण रुग्णालयात ऍडमीट असून त्यांच्या जबाबानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी करण संपत गलांडे (वय 21, रा.अभंगमळा), सोहम शेखर नेवासकर (वय 22, रा. गणेशनगर), ओंकार राजेंद्र जोर्वेकर (वय 19, रा.अकोले नाका), विश्वास सीताराम मोहरीकर (वय 21, रा.नेहरु चौक), संकेत बाबासाहेब सोनवणे (वय 21), अजीत अंकुश भरते (वय 24, दोघेही रा.कुंभार आळा), निशांत नंदू अरगडे (वय 21, रा.अरगडे गल्ली) व विक्रम खडकसिंग लोहार (वय 22, रा.घुलेवाडी) या आठ जणांना अटक केली आहे. तर, यात आणखी पसार असलेल्या आरोपींचा शोध सुरु आहे. तर, संगमनेरात लव जिहाद म्हणून सोशल मीडियात काही मेसेज फिरताना दिसले. मात्र, कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. दोन्ही गटाने सामंजस्याची भुमिका घेतली. तर, या प्रकरणात पीडित मुलीकडून देखील फिर्याद दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, मफाज पठाण (रा. कोल्हेवाडी रोड, संगमनेर) एक विद्यार्थी असून तो नेटसेटची तयारी करीत आहे. त्याचा मित्र मसीहुर याच्या क्लासमध्ये असणार्या एका विद्यार्थीनिशी पठाण याची तीन महिन्यापुर्वी ओळख झाली होती. त्यांच्यातील मैत्री अधिक पुढे गेली आणि दि. २५ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हे संबंधित मुलीला घेऊन पठाण व त्याचा मित्र सचिन महंतो हे डी. लाईट कॅफे मालदाड रोड संगमनेर येथे बसले होते. तेव्हा कॅफेत काम करणारा रोशन गोर्डे याने पठाण यास फोन करुन सांगितले. की, कॅफेच्या बाहेर काही मुले जमा झाले आहेत. त्यामुळे, तुम्ही तेथून निघुन जा.
दरम्यान, संबंधित मुलीला घेऊन हे दोघे बाहेर आले तेव्हा तेथे ५ ते ६ तरुण उभे होते. त्यांनी या दोघांना यांचे नाव गाव विचारले. त्यानंतर तेथे जमा झालेल्या तरुणांनी या दोघांना दुचाकीवर बसविले आणि थेट विठ्ठलकडे येथील डोंगरावर नेले. तुम्ही लोक हिंदु मुलींना घेऊन कॅफेत बसता काय? त्यांच्याशी मैत्री करता काय? असे म्हणून त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तेव्हा तेथे आणखी १० ते १५ जण जमा झाले. त्यांनी देखील हिंदु मुलींना कॅफेत घेऊन बसता कशाला असे म्हणून बेल्ट, काठी आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. तर, तेथे उपस्थित असणार्या एका व्यक्तीने पठाण याच्याकडील एक मोबाईल बळजबरीने काढून घेतला.
दरम्यान, हा जो काही प्रकार घडला आहे. तो कोणाला सांगितला तर तुला जीवंत सोडणार नाही. असे म्हणून शिविगाळ दमदाटी केली. त्यानंतर या दोघांना मारहाण करुन पुन्हा सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास पुन्हा मालदाड रोडला आणून सोडले. त्यानंतर या दोघांनी त्यांच्या गाडीहून जे.डी.लॉन्स गाठले. त्यांची कपडे फाडलेली असल्यामुळे पठाण याने त्याच्या काही मित्रांना फोन करुन दुसरे कपडे मागविले आणि तेथे कपडे बदलले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. सर्व नातेवाईक जमा झाल्यानंतर पठाण याने जबाब दिला आणि त्यानुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १५ जणांवर अपहरण आणि दरोडा यांसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आठ आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
पालक संतापले.!
संगमनेर शहरात शंभर पेक्षा जास्त कॅफे आहेत. नाव कितीही सोबर वाटत असले तरी तेथे अक्षरश: शालेय आणि कॉलेजच्या मुलींना नासविले जाते. पालक घरी काबाड कष्ट करतात आणि अल्पवयीन मुलींना झोपडपट्टी बहाद्दर पहिल्यांदा मैत्रीची आणि नंतर प्रेमाची भुरळ घालतात. यांना भेटण्यासाठी कॅफे, लॉज आणि काही हॉटेल अगदी राजरोस सुरू असतात. तासावर पैसा घेऊन अक्षरशा यांनी कुंटणखाने सुरू ठेवले आहेत. अर्थात हे कोणाच्या आशिर्वादाने ? तर, अर्थातच वर्दीच्या वरदहस्ताने. त्यामुळे, मलिद्यासाठी लेकरा बाळांच्या चारित्र्यावर जाऊन खिसे भरणे कितपत योग्य आहे? किमान वर्दीची नैतिकता आणि पावित्र्य तरी राखले पाहिजे. याहून वाईट म्हणजे कॅफे, लॉज आणि काही हॉटेल वाल्याना देवाने लेकी दिल्यात की नाही? स्वत:च्या घरातील व्यक्तीबाबत असे काही झाले तर त्यांना सहन होईल का? असा संतप्त सवाल आता शेतकरी आणि कष्टकरी पालक उपस्थित करु लागले आहेत. गेल्या आठवड्यात अकोले तालुक्यात पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी सर्व कॅफे, लॉज आणि हॉटेल यांच्यावर छापे टाकले होते. असले फालतू धंदे आम्ही खपवून घेणार नाही असे म्हणत थेट गुन्हे दाखल केले होते. तर, अगदी काल देखील त्यांच्या पथकाने सर्व कॅफे, लॉज आणि काही हॉटेल पुन्हा चेक केले. अशा प्रकारे संगमनेरात असेल धंदे का बंद होऊ शकत नाही? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.