संकेत नवलेची मृत्युनंतर बदनामी, पोलिसांनी चुकीचे आरोपी अटक करुन खोटी स्क्रीप्ट तयार केली.! नाटकी नाल्यातील खुनाची नाटकी कहाणी..
सार्वभौम (संगमनेर) :-
संकेत नवले या विद्यार्थ्याची हत्या झाल्यानंतर तब्बल दोन महिने हा तपास सुरू होता. काल (दि.९) पोलिसांनी हो-ना करता करता आरोपी देखील अटक केले. मात्र, खरोखर हेच संकेतचे मारेकरी आहेत का? असे प्रश्न आता नगण्य व्यक्तींनी उपस्थित केले आहे. कारण, यात एक ऍपलोकेशन आणि त्यातून मिळालेले पुरावे वगळता कोणताही सबळ पुरावा नाही. विशेष म्हणजे आरोपी हे अनेक वेळा पोलीस ठाण्यात येऊन गेले, पोलिसांनी संशयीत म्हणून त्यांची चौकशी केली. मात्र, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे, सलमान शेख आणि शाहरुख शेख यांना अटक केल्यानंतर संगमनेरात प्रचंड मोठी नाराजी पहायला मिळाली. तर, मुस्लिम संघटनांनी या दोघांना बळजबरीने गोवल्याचा आरोप करीत काल आंदोलनाचा इशारा दिला. यात अधिक महत्वाचे म्हणजे आरोपीच्या वकीलाने जो युक्तीवाद केला. त्यात म्हटले. की, संकेतच्या मारेकर्यांचा तपास लागावा म्हणून नातेवाईकांनी मोर्चा काढला, मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले त्यामुळे, प्रलंबित तपास पोलिसांनी ३७७ ची बनावट स्क्रिप्ट तयार केली आणि एका उच्चशिक्षित व हुशार तरुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. तर, आरोपी हे पावभाजीच्या हातगाडीवर काम करतात आणि मजुरी करतात. त्यांना हकनाक यात गोवण्यात आले आहे. त्यामुळे, एकंदर तपासातील संदिग्धता, गोंधळलेले पोलीस, असबळ पुरावे आणि एक ऍप्लिकेशन यात संकेत न्यायापासून वंचित तर राहणार नाही ना? असे प्रश्न संगमनेरकर आणि अकोलेकर उपस्थित करु लागले आहेत.
गुन्ह्याचा तपास फारच सविस्तर मांडणे हे थोडे कठीण आहे. कारण, प्रचंड हुशार, सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित तरुण अशा पद्धतीने कागदावर येणे म्हणजे एकतर तपासात दोष म्हणावा लागेल. किंवा खरोखर तसे असेल तर पोलिसांचे कौतुक करावे लागेल. आता गुन्हा का आणि कसा घडला यावर फार मांडणी करण्यापेक्षा तो गुन्हा कागदावर आणून तो सिद्ध करणे हे पोलिसांपुढील आव्हान फार मोठे आहे. कारण, जनतेचा रोष क्षमविण्यासाठी वर्दी काय करु शकते हे आपण महाराष्ट्रभर अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिले आहे. त्यामुळे, दोन महिने चाललेला तपास एका ऍप्लेकेशवर येऊन स्थिरावला. अर्थात हा गुन्हा फार काही कोल्ड माईंडेड मर्डर वैगरे मुळीच नव्हता. परंतु, जसा घडला तसा उलगडा देखील अद्याप पोलिसांना झाला नाही. का हे कारण तात्पुरते समजू शकतो. मात्र, कसा व कशाने याचे उत्तर खुद्द पोलिसांकडे देखील नाही. त्यामुळे, एक सुत मिळाले तरी पोलिसांना स्वर्ग काही गाठता येईना.! बरं इतका मोठा गुन्हा उघड झाला, तरी पोलिस प्रेसनोट देईना, माहिती देईना, कोणी श्रेय्य घेईना, अधिकारी गुन्ह्याचे कारण सांगेना म्हणून जनताच काय, प्रशासन देखील संभ्रमात असल्याचे दिसते आहे.
खरंतर, गुन्हा घडल्यानंतर संशयीत व्यक्तीला अटक होते. मात्र, जोवर त्याच्यावरील आरोप सिद्ध होत नाही. तोवर तो गुन्हेगार नसतो. मग मयत व्यक्तीला न्याय द्यायचा कोणी? दुर्दैवाने संकेत नवले या विद्यार्थ्याच्या बाबत असे काही घडू नये. कारण, अकोले तालुक्यातील उंचखडक बु येथील वेदांत देशमुख हा बालक अद्याप न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. विरगाव येथे जो दरोडा पडला होता. त्यात आरोपी दाखविले, तो खटला चालला आणि आरोपी निर्दोष देखील झाले. पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे तिघांची खांडोळ्या करुन हत्या झाली होती. तिघांना अटक करुन खटला चार वर्षे अंडर ट्रायल चालला. गेल्या काही दिवसांपुर्वी तिघे निर्दोेष सुटले. जामखेड तालुक्यातील नितीन आगे प्रकरणात देखील १३ जण निर्दोष सुटले. त्यामुळे, संकेत संदर्भात आरोपी अटक करणे हे हेतु किंवा उद्देश मुळीच नाही. तर, ज्याने कोणी त्याची हत्या केली आहे. त्या व्यक्तींच्या विरोधात सबळ पुरावे जमा करुन प्रबळ दोषारोपपत्र तयार करावे आणि त्याला फाशी किंवा जन्मठेप होईल असे प्रयत्न करावे अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र, जनप्रक्षोभ वाढला, दबाव पडला म्हणून कोणाचातरी बळी द्यायचा आणि चालढकल करायची असे प्रकार फार वेळा झाले आहेत. फार दुरचे नाही. तर, अकोले तालुक्यातील खानापुर येथे दोन वर्षापुर्वी एका आदिवासी तरुणीवर बलात्कार झाला होता. भाजपाने मोर्चा पुकारला आणि भलताच गतीमंद व्यक्ती अटक केला. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पप्पु कादरी यांनी खरे आरोपी अटक केले आणि नंतर या निष्पाप व्यक्तीला कलम १६९ नुसार गुन्ह्यातून वगळण्यात आले. असेच संकेतच्या बाबतीत होऊ नये. जे कराल ते सबळ पुरव्याने करावे अशी मागणी संगमनेर-अकोलेकरांची आहे.