सदस्य पळवापळवीत दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज, चिठ्ठीवर सरपंच निवड.! राष्ट्रवादी-शिवसेनेत तणाव.!
सार्वभौम (अकोले) :-
राज्यात शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असा सत्तासंघर्ष सुरू असताना अकोले तालुक्यातील तांभोळ येथे देखील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात सत्तानाट्य पहायला मिळाले. सरपंच-उपसरपंच पदाच्या वाटाघाटी सुरू असताना ठरल्याप्रमाणे दोन वर्षानंतर राष्ट्रवादीच्या सरपंचाने राजिनामा दिला आणि दुसरा सरपंच निवडीच्या आत शिवसेनेच्या गटाने सदस्य गायब केले आणि थेट मतदानाला हजर केले. त्यामुळे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि जी गाडी गुवाहटी मार्गाप्रमाणे थेट तांभोळमध्ये अवतरली त्या गाडीवर थेट दगडफेक झाली. गाडीवर हल्ला होताच गर्दी जमली आणि पुढे काही अनर्थ होण्याच्या आत तेथे उपस्थित असणार्या पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यामुळे, तांभोळचे वातावरण चांगलेच तणावपुर्ण झाले होते. यावेळी ९ सदस्यांपैकी एक गैरहजर राहिला त्यामुळे, आठ समांतर सदस्य झाले. म्हणून एका लहान मुलाच्या हातून चिठ्ठी काढून मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर जयश्री माने ह्या सरपंचपदी विराजमान झाल्या...!! आता सरपंच आमचाच हे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दावा करत असताना राष्ट्रवादीने देखील सरपंच कट्टर राष्ट्रवादी असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सरपंच यांच्याशी संपर्क केला असता फोन बंद लागला. मग तांभोळ ग्रामपंचायतीवर झेंडा नेमकी कोणाचा हे मात्र गुलदस्त्यात राहिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, तांभोळ येथे गेल्या दोन वर्षापुर्वी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या होत्या. त्यात मंगेश कराळे (राष्ट्रवादी) तर सुदाम नवले (शिवसेना) या दोघांचे गट होते. तेव्हा कराळे यांच्या गटाला ६ सदस्य, तर नवले यांच्या गटाला ३ अशा प्रकारे ९ सदस्यांची बॉडी तयार झाली होती. तेव्हा अनुराधा चव्हाण यांना सामोपचाराने दोन वर्षासाठी सरपंच म्हणून नियुक्त केले होते. त्यांचा कार्यकाळ संपला असता त्यांनी शब्दबद्ध होऊन राजिनामा दिला. त्यामुळे, आता नव्याने सरपंच नेमणुक होणार होती. आता या सहा सदस्यांचा कौल ज्या बाजुने असेल तोच सरपंच म्हणून बसणार यात काही तिळमात्र शंका नव्हती. अर्थात हे लोकशाहीला धरुन आहे. मात्र, ज्याच्या हाती बहुमत तोच सत्ताधारी हे शिवसेना गटाला शाश्वत माहित होते. अर्थात शिवसेनेने ते राज्यात अनुभविले असून ते गुन्हाळ अद्याप सुरूच आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या गटाकडील सहा सदस्यांपैकी दोन सदस्य शिवसेनेच्या गटाने फोडण्याचा प्रयत्न केला. (शिवसेना म्हणजे गटाचे नेतृत्व करणारा व्यक्ती) अर्थात तो यशस्वी झाला देखील. म्हणून तर जेव्हा सरपंच पदाची निवड सुरु झाली. तेव्हा गायब झालेले सदस्य अचानक एका गाडीतून ग्रामपंचायतीपुढे आले. मात्र, यात महत्वाचे म्हणजे एक व्यक्ती मतदानाला हजर राहिला नाही. त्यामुळे, दोन्ही बाजुंनी चार-चार असे संख्याबळ झाले. नियमानुसार दोन्ही गटाकडे स्पष्ट बहुमत नव्हते. त्यामुळे, एका लहान मुलास बोलावून त्याच्या हातून एक चिठ्ठी काढण्यात आली. अर्थात चिठ्ठीवर निवड म्हणजे सदस्य व्हेन्टीलेटरवर तर असतातच, मात्र सगळा गाव श्वास रोखून पाहत असतो. त्यामुळे, फार मोठा जमाव ग्रामपंचायतीवर एकवटला होता. यावेळी चिठ्ठी निघाली ती शिवसेना गटाची महिला जयश्री माने यांची. त्यामुळे, कादेशीर रित्या त्यांना सरपंच म्हणून घोषीत करण्यात आले.
दरम्यान, जेव्हा एक सदस्य मतदान करण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये आणला गेला. तेव्हा, विरोधातील अनेकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. महिला देखील आक्रमक स्वरुपात पहायला मिळाल्या. ज्या गाडीत सदस्य महोदय यांचे आगमन झाले त्यावर दगड फेकून गाडीच्या काचा फोडल्या गेल्या. यावेळी, त्या परिसरात एकच गर्दी पहायला मिळाली. आरडाओरड आणि एकच कल्लोळ झाल्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी तेथील काही व्यक्तींना वर्दीचा प्रसाद दिला. अर्थात तसे केले नसते तर पुढे आणखी काही अनर्थ घडला असता. त्यामुळे, जसे पोलीस आक्रमक झाले तसे हैसे-नवसे-गवसे यांनी तेथून पळ काढला. तर, पोलिसांनी ग्रामपंचायतीचा ताबा घेतला. तेथे कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घेतली. त्यानंतर सरपंच पदाचे मतदान शांततेत पार पडले आणि वेगळी क्रांती झाली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नव्हती.
एक गणवेश ते एक सदस्य.!
एकीकडे एक शाळेचा गणवेश घेण्यासाठी प्रचंड यातायात करणारा विद्यार्थी गणवेश चित्रपटातून दाखविला गेला. ते गाव म्हणजे तांभोळ आहे. अन याच ठिकाणी ग्रामपंचायतीचा एक सदस्य फोडण्यासाठी किती वणी-दिंडोरी करावी लागली. यात किती मोठा विरोधाभास आहे. दुसरीकडे लोकशाही आणि विकास ह्या किती विभिन्न बाजु आहेत हे देखील दिसून येते. कारण, दोन वर्षे एक सरपंच, नंतर, दिड-दिड वर्षे अन्य दोघे. मग यांना विकास करण्यासाठी वेळ मिळणार तरी काय? यांना किती ग्रामपंचायत समजणार? त्यामुळे, जनतेने विचार केला पाहिजे. येथे मानसे पदे भुषविण्यासाठी निवडून दिली जातात की विकास करण्यासाठी? त्यामुळे, असले प्रकार म्हणजे मतदरांची दिशाभुल, गावाच्या विकासाला खिळ आणि लोकशाहीची पालमल्ली असल्याचे बोलले जात आहे.