अखेर सत्य की जीत; कॉंग्रेस-भाजपाचे उमेदवार सत्यजीत तांबे झाले आमदार.! भाजपाला मविआचा धक्का.!

 


- सागर शिंदे

सार्वभौम (संगमनेर) :- 

नाशिक पदवीधर मतदार संघात तांबे की पाटील या दोन उमेदवारात नेमकी कोण विजयी होणार.! याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. याचा निकाल हाती आला असून विजय होण्यासाठी आवश्यक असणारी मते सत्यजीत सुधिर तांबे यांना मिळाली असून ते विजयी झाले आहेत. तांबे यांना 68 हजार 999 मते त्यांना मिळाली असून द्वितीय स्थानी शुभांगी पाटील यांना 39 हजार 534 मते मिळाली आहे. त्यामुळे, तांबे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळविला आहे. राज्यात कोकण विभागातून भाजपाचे ज्ञानेश्‍वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत. तर, नागपूर शिक्षक मतदार संघातून सुधाकर आडवले हे विजयी झाले आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदार संघातून महाविकास आघाडीचे विक्रम काळे हे चौथ्यांदा विजयी झाले आहेत. तर, आमरावती मतदार संघातून महाविकास आघाडीचे धिरज लिंगाडे हे विजयी झाले आहेत. त्यामुळे, भाजपाला हा फार मोठा धक्का महाविकास आघाडीने दिला आहे. तांबे यांना 29 हजार 465 मतांची आघाडी आहे.

कॉंग्रेसचा ताठरपणा आणि बंडखोरी.!

राज्यात २०१९ साली प्रदेशाध्यक्ष म्हणून बाळासाहेब थोरात हा प्रांजळ चेहरा महाराष्ट्राने स्विकारला, म्हणून ४४ जागांवर पक्षाने भरारी घेतली. त्यानंतर सलोख्याने अशक्य असे सरकार देखील स्थापन झाले. त्यानंतर मात्र, नाना प्रश्‍न कॉंग्रेसपुढे उभे राहिले आणि कॉंग्रेसचा आलेख पुन्हा पडता झाला. म्हणजे, विधानपरिषदेच्या वेळी कॉंग्रेसने चंद्रकांत हांडोरे यांना मतदान करण्याचा व्हीप जारी केला होता. मात्र, तेथे भाई जगताप यांना अधिक मतदान झाले आणि हांडोरे पडले. म्हणजे, तेव्हा कोण्या आमदारांना निलंबित करण्याची हिम्मत झाली नाही. आज देखील डॉ. सुधिर तांबे यांनी माघार घेत सत्यजीत यांना कॉंग्रेस उमेदवार म्हणून प्रोड्युस केला होते. मात्र, पक्षाने प्रचंड ताठरता दाखविली. दोघा पिता पुत्रांना निलंबित देखील केले. मात्र, त्यांनी पक्ष कसा बांधला हे सिद्ध केले. विशेष म्हणजे भाजपाने देखील पाठींबा द्यावा इतके शुद्ध राजकारण तांबे व थोरात कुटुंबाने केले. असे वाक्य खुद्द चंद्रकांत पाटील यांनी वापरले होते. आता, बाळासाहेब थोरात यांना कोडीत पकडण्यासाठी म्हणा किंवा अंतर्गत मिलीजुलीचे राजकारण म्हणा. पण, ना. विखे पाटील यांनी देखील सत्यजीत यांना सपोर्ट केला आणि आज म्हणून इतका मोठा विजय तांबे यांना खेचून आणता आला.

कॉंग्रेस की भाजपाचा आमदार..!

आम्ही जन्मजात कॉंग्रेसचे आहोत, आमच्या रक्तात कॉंग्रेस आहे. असे म्हणून भाजपात प्रवेश न करता कॉंग्रेसचा अधिकृत पाठींबा घेण्याचा प्रयत्न तांबे यांनी केला. मात्र, कॉंग्रेसचा ताठरता त्यांच्याच माथ्यावर मिर्‍या वाटून गेली. त्यामुळे, बाळासाहेब थोरात आजारपणात मग्न राहिले. मात्र, त्यांची भुमिका काय होती हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, अनेक कॉंग्रेसच्या नेत्यांनी तांबे यांना खुलेआम पाठींबा दिला. कार्यकर्ते दिवस रात्र त्यांचा प्रचार करीत होते. संघटना त्यांच्या पाठीशी होत्या. त्यामुळे, महाविकास आघाडी म्हणून कॉंग्रेसने धर्म निभावला असे म्हणणे फार धाडसाचे ठरले. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीने तरी शत प्रतिशत धर्म पाळण्याचा प्रयत्न केला. प्रश्‍न उरतो तो भाजपाचा. आता भाजपाला आयात उमेदवार घेण्यात फार स्वरस्य असते. म्हणून २०१४ ते २०२३ हा इतिहास तपासला तर यांची रणनिती नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यांनी अंतीम क्षणापर्यंत आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांला संधी दिली नाही. सत्यजीत तांबे हे आपल्याकडे येतील आणि तेच आपले उमेदवार असतील या आशेवर ते कायम होते. एकीकडे ना. विखे यांना आ.थोरात यांना कोंडीत पकडायचे होते. तर, दुसरीकडे एक कर्तुत्वान तरुण म्हणून तांबे यांना संधी द्यायची होती. त्यामुळे, अंतीम क्षणी त्यांनी तांबे यांना पाठींबा जाहिर केला. अखेर तांबे यांनीच सगळ्यांना मामु बनविले आणि बहुमतांनी निवडून देखील आले. शेवटपर्यंत ते कोणाचे? हे सिद्ध होऊ शकले नाही. पण, ते आता कॉंग्रेसचे म्हणून गणले जाऊ शकतात..!

सत्यजीत ताबे हे कॉंग्रेसचे आमदार..!

थोरात आणि तांबे घराण्याचा इतिहास अगदी कॉम्रेड भाऊसाहेब थोरात यांच्यापासून कॉंग्रेस विचारांचा राहिला आहे. आ. बाळासाहेब थोरात यांनी निवडणुकीच्या बाहेर राहुन शांततेत केलेली क्रांती आणि तांबे कुटुंबाच्या विचारांचा कल हा कधी भाजपमय होऊ शकला नाही. सत्तेसाठी वाट्टेल ते असे असते तर तांबे यांनी कोणताही विचार न करता थेट भाजपाची उमेदवारी स्विकारली असती. मात्र, त्यांनी अपक्ष राहणे पसंत केले. आता आमरावतीत कौर दाम्पत्य कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर निवडून आले आणि त्यांनी भाजपाचा रस्ता धरला, नगरमध्ये शंकराव गडाख यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीने पाठींबा दिला आणि ते आमदार झाले. मात्र, आज ते शिवसेनेत आहेत. त्यामुळे, भाजपाने पाठींबा दिला म्हणजे फार काही जगावेगळे नाही. तांबे यांनी पंतप्रधान मोदीजी यांच्या बॅनरला काळे फासले होते. हे कट्टर भाजपावल्यांच्या स्टेटसला दिसत होते. मात्र, कट्टर कॉंग्रेस असो वा महाविकास आघाडीचे घटक. त्यांच्या स्टेटसला आणि सोशल मीडियात तांबे यांच्या समर्थनार्थ पोष्टर झळकत होते. एकंदर, तांबे यांचा कल हा भाजपाकडे कधी झुकेल असे वाटत नाही. त्यामुळे, ज्यांनी उभी हयात पुरोगामी विचारांचे धडे दिले आणि गिरविले ते कॉंग्रेसची साथ सोडणार नाहीत असे अनेकांना वाटते आहे.

नातं गोतं कामी आलं.! 

नगर जिल्ह्यात सत्यजित तांबे यांच्या नात्यागोत्याची पाळेमुळे कुठवर पसरलीय, हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे, मामाश्री आ. बाळासाहेब थोरात यांचेपासून ते शिवसेनेचे माजी मंत्री शंकराव गडाख आणि आ. मोनिकाताई राजळे यांच्यासह अनेक ठिकाणी त्यांची नाते गुंफलेली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व राजकीय घराणे असून त्यांच्याशी सुसंस्कृतपणे सलोख्याचे संबंध थोरात, तांबे परिवाराने राखले आहेत. जसा बाळासाहेब थोरात यांनी त्यांचा संगमनेर मतदारसंघ ध्रुवतार्‍यासारखा बांधला तसा माजी आमदार डॉ. सुधिर तांबे यांनी तीन वेळा आमदार झाल्यानंतर नाशिक पदविधर मतदारसंघाची बांधणी केली होती. त्यामुळे, संधी विरसा म्हणून मिळाली पण ती सिद्ध करण्यात सत्यजीत तांबे हे सिद्धीस उतरले आणि आज ते निवडून देखील आले आहेत.

नव्याने तरुणाईचे राजकारण.!

मागिल लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांनी कॉंग्रेसमधुन बंड पुकारले आणि थेट भाजपात दाखल झाले. त्यांच्या विरोधात आ. संग्राम जगताप यांनी निवडणुक लढविली. काय भयानक आरोप प्रत्यारोप होत होते. मात्र, विखे विजयी झाले आणि त्यांनी नगर शहरातील उड्डानपुलाचा प्रश्‍न हाती घेतला. तेव्हा, विखे आणि जगताप यांच्यातील विकासात्मक राजकारण हे संपुर्ण जिल्ह्याने पाहिले. आज देखील ते वेगवेगळ्या पक्षात आहेत. मात्र, त्यांच्यातील एकोपा हा भावा-भावासारखा दिसतो. आता त्यांनी सत्यजीत तांबे यांना सपोर्ट केल्याचे पहायला मिळतो. खा. विखे यांनी तांबे यांना भाजपमय होण्यासाठी प्रचंड गळ घातली. मात्र, तांबे देखील त्यांच्या विचारांवर ठाम होते. तर, संग्राम जगताप यांनी देखील तांबे यांना सपोर्ट केल्याचे बोलले जाते. तर, अकोले तालुक्यात माजी आमदार वैभवराव पिचड यांनी देखील तांबे यांच्यासाठी चांगली मेहनत घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे, नव्या पिढीत जे वेगळे राजकारण दिसू लागले आहे. ते द्वेषाचे नसून विकासात्मक वाटत आहे. विशेेष म्हणजे या तरुणाईला जनतेतून प्रचंड प्रतिसाद दिसतो आहे. म्हणून, तांबे यांच्या विजयात तरुण आमदार, खासदार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा देखील फार मोठा वाटा आहे.

====================

➡️ सत्यजित सुधीर तांबे : 68999

➡️ शुभांगी भास्कर पाटील : 39534

➡️ रतन कचरु बनसोडे : 2645

➡️ सुरेश भिमराव पवार : 920

➡️ अनिल शांताराम तेजा : 96

➡️ अन्सारी र. अ. कादीर : 246

➡️ अविनाश महादू माळी : 1845

➡️ इरफान मो इसहाक : 75

➡️ ईश्वर उखा पाटील : 222

➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे : 710

➡️ ॲड. जुबेर नासिर शेख : 366

➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले : 271

➡️ नितीन नारायण सरोदे : 267

➡️ पोपट सिताराम बनकर : 84

➡️ सुभाष निवृत्ती चिंधे :151

➡️ संजय एकनाथ माळी :187

➡️ वैध मते :116618

➡️  अवैध मते :12297

➡️  एकूण :129615

➡️कोटा : 58310