जुगार आड्ड्यावर पोलिसांचा छापा, प्रतिष्ठीत व्यक्तींसह १४ जणांवर गुन्हे, ५० हजारांचा मुद्देमाल जप्त.!


सार्वभौम (अकोले) :-

अकोले शहरात बस स्थानकाच्या जवळ धुमाळ संकुल  परिसरात शहर पोलिसांनी मटक्याच्या आड्ड्यावर छापा टाकला. यात दोन चालकांसह १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण अर्धा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहरात अगदी मध्यवर्ती आणि वर्दळीच्या ठिकाणी इतका मोठा मटका चालतो आणि त्यासाठी संगमनेरहून लोक खास मटका लावण्यास येतात ही खेदाची बाब आहे. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक घुगे यांना माहिती मिळताच त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.२६ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अकोले शहरात बस स्थानकाच्या जवळ धुमाळ संकुल परिसरात काही व्यक्ती मटका खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मिथुन घुगे यांनी एक पथक तयार करुन घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी तेथे १४ जण मिळून आले. तर, यांच्यातील काही व्यक्तींकडे रोख रक्कम, मटक्यांचे अंक लिहीलेले पान, मटक्याचे पुस्तक, रायटींग पॅड, कॅल्क्युलेटकर, एक कार्बन यांच्यासह अन्य ४२ हजार २८० रुपयांचे साहित्य मिळून आले. तर, आरोपी यांना पोलीस ठाण्यात नेवून त्यांच्यावर मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, त्यांची जामीनावर सुटका देखील करण्यात आली आहे.

या गुन्ह्यात सुभाष शिवाजी भिडे (वय २८ वर्षे रा. तांभोळ ता. अकोले), संतोष दगडु साळवे (वय ३० वर्षे रा. रुंभोडी ता. अकोले), रामदास मारुती पिचड (वय ४६ वर्षे, रा. धुमाळवाडी, ता. संगमनेर), सुरेश एकनाथ खोडके (वय ३० वर्षे रा. खानापुर ता. अकोले), बाळु डिंबा डोके (वय ४२ वर्षे रा. खानापुर ता. अकोले), दिलीप गंगाराम वाघमारे (वय ५२ वर्षे रा. शेरनखेल ता. अकोले), सुखदेव सोमनाथ कातोरे (वय २८ वर्षे रा. विरगाव ता. अकोले), रोहिदास केरु मोहिते (वय ४२ वर्षे रा. शाहुनगर अकोले), सखाराम लक्ष्मण बांबळे (वय ३७ वर्षे रा. माळीओझर ता. अकोले), रमेश अशोक खोडके (वय ३४ वर्षे रा. खानापुर ता. अकोले), राजु शिवाजी भिडे (वय ३८ वर्षे रा. तांभोळ ता. अकोले), किशोर भाऊसाहेब कोटकर (वय २६ वर्षे रा. कुंभेफळ ता. अकोले), शिवाजी धुमाळ व अतुल नवले दोन्ही (रा. अकोले) अशा १४ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुढारी आणि कार्यकर्त्यांचे मटके.!

अकोले शहरात एक काळ असा होता. की, खुलेआम काही कार्यकर्ते वाळु तस्करी आणि अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर करीत होते. मात्र, कालांतराने राजकीय परिस्थिती बदलली आणि वाळुतस्करी बंद झाली. मात्र, आता बहुतांशी राजकीय कार्यकतेर्र् अकोल्यात कोणी क्लब चालवितात तर कोणी मटका चालवितात. कोणाची भागीदारी आहे तर कोणाचे बळ आहे. त्यामुळे, पोलिसांना वाटले तरी ते राजकीय दबावापोटी तेथे कारवाई करत नाही. नंतर मात्र आतिरेख झाला की कारवाईला सामोरे जावेच लागते. बस स्थानक ते महात्मा फुले चौक या दरम्यान ३० पेक्षा जास्त मटक्याची दुकाने आहेत. त्यात पांढर्‍या बगळ्यांची भागिदारी फार मोठी असून. खुद्द राजकीय बडे नेते देखील त्यांच्याकडून हाप्ते वसुल करतात. त्यामुळे, झाकली मुठ सव्वालाखाची.! या म्हणीचा प्रत्यय येथे येतो.