दांडी यात्रा ते भारत जोडा यात्रा, अन्वयार्थ.! तेव्हा लाठ्या काठ्या खाल्ल्या, आजही उडविण्याच्या धमक्या.! कॉंग्रेस पुन्हा भारत जोडणार.!
सार्वभौम (महाराष्ट्र) :-
ब्रिटीश सरकारचा मनमानी कारभार, मिठावरील कर आणि अटी हा मुद्दा घेऊन दि. १२ मार्च १९३० रोजी महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रा सुरू केली होती. पहिल्यांदा ७८ सहकारी आणि दांडीत पोहचेपर्यंत लाखोंचा जनसमुदाय आजही इतिहासात नमुद आहे. तेव्हाचे लोकशाही मार्गाने चाललेले आंदोलन नेस्तनाबुत करण्यासाठी ब्रिटीश सरकारने लाठ्या काठ्या चालवून ते हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, झालं काय? संबंध भारत एकवटला आणि तीच यात्रा आपल्याला स्वतंत्र भारताकडे घेऊन गेली. आज देखील तिच स्थिती निर्माण झाली आहे. माणूस मेला तरी त्याची करातून मुक्तता होत नाही. शेतकर्यांना जगणे मुश्किल आहे. तरुणांना रोजगार नाही. इडी आणि सीआयडी सारख्या संस्थांवर दबाव आणून अनेक व्यवस्था वेठीस धरल्या आहेत. याला लोकशाहीत एकच पर्याय आहे. तो म्हणजे, जनतेत जाऊन त्यांच्याशी बोलणे आणि जे चालु आहे ते त्यांना सांगणे. ही यात्रा म्हणजे कॉंग्रेस उभी करण्याचा एक प्रयत्न आहेच.! मात्र, अनेक समस्यांनी जो भारत विखुरला आहे, खचला आहे, खंगला आहे, वेठीस धरला आहे अशा नागरिकांना तथा शेतकरी आणि तरुणांना जोडण्यासाठी ही यात्रा असल्याचे दिसते आहे. म्हणून महात्मा गांधीजींनी दांडीयात्रा काढून देश स्वातंत्र केला आणि राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा काढून वेठीस धरलेला देश मुक्त करतील अशी आशा पुरोगामी विचारांच्या विचारवंतांना वाटू लागली आहे.
अहिंसेचा मार्ग हा लोकशाहीचा आत्मा आहे. त्याचा पुरस्कार संविधान नसताना महात्मा गांधी यांनी केला होता. तर, या अहिंसेला कायद्याच्या चौकटीत बसविण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. म्हणून कॉंग्रेस आणि त्यांच्या समविचारी पक्षांकडे पुरोगामीत्वाचे चेहरे म्हणून पाहिले गेले. सुर्दैवाने नंतरच्या काळात इंदिरा गांधी ते अगदी आज राहुल गांधी यांच्यापर्यंत संविधानाची बहुतांशी मुल्य जोपासण्याचे काम झाले. मात्र, केंद्रात जेव्हापासून भाजपचे सरकार आले. तेव्हापासून राज्यांच्या सत्ता वाट्टेल त्या पद्धतीने हस्तगत करणे, विरोधक कायमचे संपविण्यासाठी किंवा त्यांना नमविण्यासाठी त्यांच्यामागे चौकशी आणि ईडीचा ससेमीरा लावून देणे अशी नाना कारणे आहेत. हे का झाले? याचे कधीतरी आत्मचिंतन केले पाहिजे. कारण, जनतेने भाजपला इतके बळ दिले. की, त्यांना विरोध करण्यासाठी सुद्धा बळ ठेवले नाही. त्यामुळे, एकहाती सत्तेचा माज अनेकदा जनतेने पाहिला आहे. विरोधी पक्ष म्हणजे केवळ कस्पटासमान करुन टाकले आहे. त्यामुळे, ना यांचे ऐकायचे ना यांचे मनावर घ्यायचे. वाट्टेल तो निर्णय घ्यायचा, वाट्टेल त्यास मंजुरी द्यायची, वाट्टेल ते विधेय्यक मंजूर करायचे आणि वाट्टेल तशा संस्था हाती धरुन दबावतंत्र करायचे. विरोधकांना शुन्य किंमत देवून मनमानी कारभार करायचा. यातील अंतीम पर्याय म्हणून थेट जनतेत जाऊन त्यांच्याशी बोलायचे आणि त्यांची मते जाणून घ्यायची. त्यासाठी ही भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांनी सुरू केली आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून ही यात्रा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि संसद यांना बहुमताने एकत्र जोडल्याशिवाय राहणार नाही. याची अनेकांना खात्री आहे.
महात्मा गांधी यांनी १९३० साली जो प्रवास सुरू केला होता. तसाच प्रवास आज दुसर्या गांधीने सुरू केला आहे. येथे व्यक्तींच्या तुलना मुळीच होणार नाही. मात्र, परिस्थिती, प्रश्न, जोडत चाललेला समुदाय आणि महत्वाचे म्हणजे अंतीम यश. यात मात्र साम्य आहे. महात्मा गांधी यांनी ३३९ किमी प्रवास २४ दिवसात पार करुन क्रांती केली होती. राहुल गांधी हे देखील ५ महिन्यात, १२ राज्यात, ३ हजार ५७० किमी प्रवास करुन देशातील विषमता, जातीयवाद आणि जी हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. त्याचा बिमोड करुन लोकशाही पुन्हा बळकट करण्याची क्रांती करतील अशी स्थिती दिसते आहे. अर्थात हे वाटते तितके सोपे नाही. कारण, महात्मा गांधी यांच्या शेकडो कार्यकर्त्यांवर काठ्या पडल्या होत्या, अनेकजण फितुर झाले होते. ब्रिटीश सरकारच्या लॉर्ड व्हाईसरॉयने ही दंडीयात्रा मोडीत काढण्यासाठी बळाचा वापर करुन शस्त्र उचलली होती. तरी देखील लोक हटले नाही. आंदोलकांनी सविनय कायदेभंगाचा अवलंब केला. मारा काय मारायचे तितके मारा, पण आमच्या मागण्यांवर आम्ही ठाम आहोत.! याची दखल जागातील वृत्तपत्रांनी घेतली होती. तेव्हा बिटीश सरकार नमले होते. आज देखील भारत जोडो यात्रेत काय आहे.?
खरंतर केंद्र सरकारने बहुमताच्या बळावर एनआरसी, सीसीए आणि कृषी कायदे यांच्यासारख्या अनेक विधेयकं मंजूर केली. पंजाब सारख्या ठिकाणी अनेक शेतकरी चिरडले गेले. का? सत्तेच्या जोरावर.!! आज राहुल गांधी यांची यात्रा सुरू असताना किती आरोप होत आहेत. त्यांना उडवून देण्याचे पत्र येऊ लागले आहेत. त्यांच्या सभांमध्ये दलाली मानसे सोडली जात आहे, विकृत मीडियाबाजी होत आहे, यात्रा उधळून लावण्यासाठी छोट्या पक्षांना पुढे केले जात आहे, जे कागदी पुरावे आहेत त्यास अमान्य करुन वादंग उभा केला जात आहे, पुढील प्रवासात अनेक कायदेशीर अडथळे निर्माण केले जात आहेत. मात्र, झालय काय? तर, १२० कार्यकर्त्यांपासून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेत आता १ लाख २० हजार लोक रस्त्यावर चालु लागले आहेत. सभांना १० लाखांहून अधिक गर्दी दिसू लागली आहे. म्हणून तर विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे. जसे महात्मा गांधी यांनी धिरोदात्तपणे जनतेच्या मदतीने ब्रिटीशांवर विजय मिळविला. तसा विजय राहुल गांधी यांच्या भाळी लिहीलेला दिसतो आहे. तो ही अगदी सविनय कायदेभंगाच्या मार्गाने..!!
महाराष्ट्राला भावले.!
राहुल गांधी यांची भारत जोडा यात्रा नांदेड येथील देगलुरमध्ये येऊन धडकली. महाराष्ट्राच्या मातीत आल्यानंतर त्यांनी प्रत्येकवेळी शाहु, फुले, आंबेडकर यांच्यासह महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची नावे सन्मानाने घेतली. मॉं जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेकांची नावे घेण्यासाठी ते विसरले नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्राइतका प्रतिसाद मला कोठे मिळाला नाही असे त्यांनी अवर्जुन सांगितले. तर, जातीवंत तथा कॉंग्रेसचा खरा पाईक फक्त महाराष्ट्रातच पहायला मिळतो. विशेषत: विदर्भात, म्हणून तर महात्मा गांधी यांनी गुजरातचे साबरमती सोडून वर्धा येथे सेवाग्राम आश्रम पसंत केला होता. येणार्या काळात देखील महाराष्ट्र कॉंग्रेसला उभारी देईल. असे म्हणून त्यांनी कॉंग्रेसची विचारधारा जपणार्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आणि नागरिकांचे आभार मानले आहे.