शिक्षण विभागात धाड.! पाच हजारांची लाच घेताना महिला अधिकारी अटक.! शिक्षकाच्या मयत पत्नीच्या बीलावर डोळा.!
कोरोनाच्या काळात श्रीरामपूर येथे कार्यरत असणार्या एका शिक्षकाची पत्नी मयत झाली होती. त्याचे बिल शिक्षकाने भरले होते. ते मंजूर होण्यासाठी संबंधित शिक्षकाने जिल्हा परिषद अहमनदगर येथे जमा केली होती. ती मंजुर करण्यासाठी वरिष्ठ सहायक प्राथमिक शिक्षण विभाग येथील महिला चंदा चंद्रकांत ढवळे यांनी शिक्षकाकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग नगर यांच्याकडे धाव घेतली होती. पोलीस उपाधिक्षक हरिष खेडकर यांनी सापळा रचून चंदा ढवळे हिला पाच हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्यातील एका शिक्षकाची पत्नी कोविड पॉझिटीव्ह झाली होती. अनेक प्रयत्न करुन देखील त्या माऊलीचा जीव वाचला नाही. ती २०२१ मध्ये मयत झाल्यानंतर पत्नीचे रुग्णालयात झालेले बिल शिक्षकाने भरले होते. त्यानंतर ती फाईल करुन शिक्षकाने जिल्हा परिषदेत जमा केली होती. मात्र, बराच पैसा घालुन देखील पत्नी गेल्याचे दु:ख आणि त्यात बिल मंजुर होण्यासाठी लाच मागणारे अधिकारी आणि कर्मचारी. त्यामुळे, वर्षे दिड वर्षे होत आले तरी बिल निघत नव्हते. खरंतर, अधिकारी भ्रष्ट नसतील तर त्यांनी याची चौकशी केली पाहिजे. की, तक्रारदार यांनी दिलेल्या फाईल पुर्वी किती बिले मंजुर झाली आहे आणि त्यानंतर किती बिले मंजुर झाली आहे. त्यात दुध का दुध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. पण, सगळ्यांचेच हात रंगलेले असतील तर..!!
आता शिक्षक महोदयांनी फाईल जमा केल्यानंतर अनेकदा त्याचा पाठपुरावा केला होता. मात्र, म्हणतात ना, पैसा फेको, तमाशा देखो.! त्याप्रमाणे पैैसे दिले नाही म्हणून फाईल टांगून धरली होती. पत्नीला बरे करण्यासाठी फार पैसा गेला आहे. त्यामुळे, आता पैसे मागू नका. उलट मदत करण्याचा प्रयत्न करा अशी विनंती शिक्षकाने केली होती. मात्र, मॅडम ऐकण्यास तयार नव्हती. दि. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांनी शिक्षकाकडे पाच हजार रुपयांची मागणी पैसे दिले तर तत्काळ फाईल मंजूर होईल असे म्हणून लाच मागितीली होती. मात्र, शिक्षक हे येणारी पिढी घडवत असतात. त्यांना अशा प्रकारचे कृत्य करणे योग्य वाटले नाही. भ्रष्टाचार करु नका असे विद्यार्थ्यांना सांगणार्या शिक्षक महोदयांनी थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.
दरम्यान, लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधिक्षक खेडकर यांनी जिल्हा परिषद अहमदनगर येथे सापळा रचला आणि चंदा चंद्रकांत ढवळे या वरिष्ठ सहायक प्राथमिक शिक्षण विभागात काम करणार्या महिलेस पाच हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, त्यांची बँकेची खाती तपासणे, घरघडती घेणे, त्यांनी कोणाच्या सांगण्याहून पैसे मागितले का? यात आणखी कोणी आहे का? अशा विविध गोष्टींची चौकशी करण्यासाठी महिलेच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ही कामगिरी महिनीनाथ गमे, पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, संतोष शिंदे, विजय गंगुल, रमेश चौधरी, रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, संध्या म्हस्के, राधा खेमनर, हारुन शेख आदी पथकाने केली.