आपल्या पत्नीची छेड काढली हे ऐकताच पती जमिनीवर कोसळले.! थेट रुग्णालयात, वाईट कृत्यानंतर एकावर गुन्हा दाखल.!

सार्वभौम (संगमनेर) :-

मळ्यात जनावरांना घास कापण्यासाठी गेलेल्या महिलेची एका व्यक्तीने छेडछाड केली होती. मात्र, या व्यक्तीच्या तावडीतून सुटून महिला घरी गेली आणि घडला प्रकार आपल्या पतीस सांगितला. आपल्या पत्नीचा विनयभंग झाला हे शब्द कानावर पडताच पतीला टेन्शन आले. त्यांचा बीपी वाढला. यावेळी एकच पळापळ झाली आणि तत्काळ संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही धक्कादायक घटना गुरुवार दि. १७ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित महिलेचे पती बरे झाल्यानंतर महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले आणि घडलेली कैफियत अधिकार्‍यांपुढे कथन केली. तिच्या फिर्यादीनुसार पोपट हरिभाऊ गाढवे (रा. जांबुत बु, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी की, जांबुत बु परिसरात गुरुवारी एक महिला शेतात काम करीत होती. जनावरांसाठी घास कापत असताना तेथे आरोपी पोपट गाढवे हा तेथे आला. त्याने काही काळ इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या आणि नंतर त्याने वाईट नजरेने थेट पीडित महिलेला एकटे पाहून तीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यास सुरूवात केली. मात्र, पीडित महिलेने प्रसंगावधान राखून त्याचा हात झटकला आणि आपल्या घराकडे पळ काढला. घडला प्रकार कोणाला सांगू नये म्हणून गाढवे याने धमकी देखील दिली. मात्र, पीडित महिलेने घर गाठल्यानंतर या घटनेचा वाचा फोडली.

दरम्यान, महिला पळत घरी आल्यानंतर तिने घाबरलेल्या आणि भेदरलेल्या आवस्थेत मळ्यात घडलेला प्रसंग आपल्या पतीस कथन करण्यास सुरूवात केली. मात्र, आपल्या पत्नीसोबत जे काही कृत्य करण्याचा प्रयत्न झाला. त्याचा त्यांनी प्रचंड धसका घेतला. काही क्षणात त्यांना भुरळ आली, त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते जमीनीवर बसले. त्यानंतर पीडित महिला आणि सासुबाई यांनी तत्काळ एका गाडीत त्यांना साकूर येथील रुग्णालयात दाखल केले. जे काही घडले ते संबंधित व्यक्तीस ऐकवले नाही त्यामुळेच असा प्रकार घडल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

दि. १७ नोव्हेबार पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. जवळच्या व्यक्तीने अशा प्रकारचा घात करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने छेेडछाड होणे हे त्यांच्या जिव्हारी लागण्यासारखे होते. त्यामुळे, अचानक घडलेल्या प्रकारामुळे त्यांना सदमा बसला. त्यानंतर दोन दिवसानंतर त्यांना घरी आणले होते. जर अशा पद्धतीने एकट्या महिलेस पाहून कोणी असे घाणेरडे कृत्य करीत असेल तर त्यास शिक्षा मिळालीच पाहिजे. त्यामुळे, आरोपीस कोणत्याही प्रकारची क्षमा न देता पीडितेने थेट पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी पोपट हरिभाऊ गाढवे (रा. जांबुत बु, ता. संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, महिला अत्याचार आणि अगदी जवळच्या व्यक्तींकडून नको ते प्रकार घडण्याचे प्रमाण वाढले आहे. तर, अगदी नात्यांना काळीमा फासणार्‍या देखील घटना घडत आहे. त्यामुळे, पालकांनी जागरुक राहिले पाहिजे. तर, बाललैंगिक अत्याचार तसेच लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार, तसेच जमीन आणि वैयक्तीक वादातून खोट्या तक्रारी देखील वाढत चालल्या आहेत. तसेच राजकीय खोट्या गुन्ह्यांचा आलेख देखील राज्याप्रमाणे संगमनेरात वाढत चालला आहे. त्यावर अंकुश बसण्यासाठी पोलीस प्रशासनानेच पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत अनेक सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.