तुला नवरी देतो म्हणून उतावळ्या नवर्याची फसवणुक.! तीनं पैसे घेऊन नंबर ब्लॉक केला.! लग्न जमविणार्या टोळ्यांपासून सावधान.!
कोरोनाच्या काळापासून अनेक तरुणांच्या नोकर्या गेल्या आहेत. शेतमालास बाजारभाव नाही, राज्यातील मोठ्या कंपन्या परराज्यात जात आहे. त्यामुळे, अनेक तरूणांच्या हाताला काम नाही. परिणामी लग्नाचे वय होऊन गेले, आई-बाप पोरगी पाहून वैतागले, मात्र तरी सुद्ध लग्न जमत नाही. म्हणून पैसे देऊन का होईना, नाव नोंदणी करुन का होईना, अन कशी का असेना.! पण, बायको हवी म्हणून अनेकांचा आटापिटा सुरू आहे. अशाच एका उतावळ्या मुलाने नेटवर माहिती घेऊन विवाह नोंदणी करण्याचा नंबर शोधला. त्यावर एका महिलेने यांना संपर्क केला आणि पहिल्या तडाख्यात पाचशे रुपये घेऊन मुलीची फक्त माहिती सांगितली. त्यानंतर दुसर्यांदा पाचशे घेऊन तिचा फोटो आणि नंतर अधिक मुली दाखविण्यासाठी तीन हजार रुपये सुद्धा घेतले. मात्र, ही रक्कम वाढत चालल्यामुळे आपली फसवणुक होते आहे, हे लक्षात आले आणि पुढील प्रवास या तरुणाने स्टॉप केला. आता पोलीस ठाण्यात नको.! पण, अशा कोणाची फसवणुक होऊ नये हीच त्याची इच्छा आहे. म्हणून सार्वभौमपुढे मांडलेला हा अट्टाहास होय.!!
त्याचे झाले असे की, अकोले तालुक्यातील एक मुलगा संगमनेर तालुक्यातील एका संस्थेवर कामास आहे. गेल्या काही वर्षापासून तो प्रामाणिकपणे काम करतो आहे. मात्र, त्याचे लग्नाचे वय होऊन देखील त्याला अद्याप मुलगी मिळालेली नाही. त्याचे लग्न जमावे म्हणून त्याच्या आई वडिलांसह नातेवाईकांनी फार प्रयत्न केले. मात्र, घरी जमीन असून देखील त्याचे दोनाचे चार हात झाले नाही. त्याच्या सोबत असणार्या काही मित्रांचे लग्न झाले असून त्यांचे संसार चांगले सुरू आहे. त्यामुळे, आपण देखील कपाळी बाशिंग बांधावे अशी त्याची ईच्छा होती. त्यासाठी तो देखील प्रयत्न करीत होता. पुर्वी शेतकरी असून कोणी मुलगी दिली नाही. म्हणून दोन रुपयांची नोकरी केल्यानंतर तरी अंगाला हाळद लागेल असे त्याला वाटत होते.
दरम्यान, कामावर गेल्यानंतर त्याच्या मित्राने वधुवर सुचक मेळाव्यात त्याचे नाव नोंदविण्याचा विचार केला. पुणे जिल्ह्यातील बानेर येथून एका महिलेने त्यांच्याशी संपर्क देखील केला. पहिल्याच चर्चेत त्या महिलेने यांच्याकडे पाचशे रुपयांची मागणी केली. रक्कम किरकोळ असल्यामुळे आणि भावना प्रबळ असल्यामुळे या बहादराने काही सेकंदात पाचशे रुपये दिलेल्या नंबरवर सेंड केले. त्यानंतर, मुलीचे नाव वैगरे सांगितले आणि बोलण्यासाठी त्यांनी एका दुसर्या महिलेला फोन कॉन्फरन्सवर घेतले. या महिलेने तिच्या मुलीबाबत सर्व माहिती याला दिली. ही मुलीची आई असल्याचे खात्रीलायक वाटले. यांनी वडिलांविषयी विचारणा केली असता तिने सांगितले. की, ते वाहन चालक आहेत. त्यामुळे, त्यांचे दौरे लांब असतात. तेथे बापाचा विषय संपून गेला. नवरी मिळणार असा आशेचा किरण कोठे निर्माण होणार, तोच फोन कट झाला. मात्र, यांनी सांगितले की नवरी राहुरी तालुक्यात पहायला मिळणार आहे.
दरम्यान, मध्यस्ती महिलेने तीन वेगवेगळ्या मोबाईल नंबरहून फोन केले होते. त्यातील एकावर पुन्हा संपर्क केला. मात्र, या दलाल महिलेने सांगितले. की, जर तुम्हाला मुलगी पहायची असेल तर किंवा बोलायचे असेल तर तीन हजार रुपये द्यावे लागतील. मग काय.! गुतली गाय अन फटके खाय. यांनी पुन्हा तीन हजार रुपये मोबाईलहून सेंड केले. त्यानंतर संबंधित महिलेने यांच्यात पुन्हा संभाषण घडवून आणले. दोघांमध्ये चांगली बोलणी झाली, मुलगा मुलगी पसंतीला कधी यायचे तारीख देखील ठरली. सगळं काही ओकेमध्ये होणार असे असताना बाईने पुन्हा फोन कट केला. त्यानंतर मात्र, नवरदेवासह त्याच्या मित्रांचे देखील टाळके सटकले. पुन्हा फोन लावला तर बाईसाहेब म्हणाल्या पुन्हा पाचशे द्यावे लागतील. अर्थात हा केवळ पैसा लुटीचा धंदा आहे. हे जेव्हा विवाहीत मित्राच्या लक्षात आले तेव्हा त्याने महिलेला चांगलेच फटकारले. तेव्हा मात्र, उताविळ तरुण प्रचंड नाराज झाला. तरी देखील अधिक गुंतत जाण्यापेक्षा मित्राने जो सल्ला दिला तो त्याच्यासाठी लाख मोलाचा ठरला. ती फसवीच टोळी असल्याचे लक्षात आले.
लेट होईल पण थेट होईल.
अर्थात हा सगळा लग्न जमविण्याचा प्रचंच कशासाठी? तर, लग्नांची बिकट परिस्थिती पाहून राज्यात काही फसवणुक करणार्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. प्रमुख्याने नाशिक, येवला, निफाड, कोपरगाव, संगमनेर, अकोले या परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. तर, नगर आणि नाशिक जिल्ह्यात अशा टोळ्या कार्यरात आहेत. हनीट्रॅप आणि बनावट लग्न.! याबाबत तरूणांनी सावध राहिले पाहिजे. अकोले पोलीस मिथुन घुगे आणि महेश आहेर यांनी ७ नोव्हेंबर २०२२ रोजी अशी टोळी जेरबंद केली आहे. पुर्वी नगर शहर, ग्रामीण, संगमनेर, पाथर्डी, अकोले या ठिकाणी हनीट्रॅप दाखल आहेत. त्यामुळे, अशा टोळ्यांपासून सावध राहिले पाहिजे. लेट होईल पण थेट होईल. त्यामुळे, लग्नासाठी चुकीच्या मार्गचा अवलंब करु नये असे अवाहन पोलिसांनी केले आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलीस शोध घेत आहे.