बारवर कामास गैरहजर राहिल्याने आदिवासी तरुणांना कोंडून बेदम मारहाण.! शेठ इतका माज बरा नव्हे.!

  सार्वभौम (अकोले) :- 

               कामावर गैरहजर राहिल्याने अकोले शहरातील महात्माफुले चौक परिसरात असणार्‍या एका बार मालकाने दोन आदिवासी तरुणांना एका खोलीत कोंडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. लाथाबुक्क्या, बुट आणि खुर्चीने मारहाण झाल्यामुळे एक भांगरे नामक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. हा तरुण देवगाव येथील रहिवासी असून दुसरा ढोकरी येथील रहिवासी आहे. यातील एक तरुण आदिवासी बांधव असल्यामुळे धनदांडग्यांपुढे आपले काही चालणार नाही म्हणून, जखमी आवस्थेत त्यांनी शांत राहणे पसंत केले. मात्र, पोटच्या लेकराला इतकी मारहाण झाल्याचे आईला पहायवले नाही. तिने थेट पोलीस ठाणे गाठले. सहा.पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी बार मालकास तत्काळ ताब्यात घेतले. मात्र, काही वेळापुर्वी गुर्मीत असणारा मालक मारहाण झालेल्या मुलाच्या पाया पडू लागला. मी पुन्हा असे करणार नाही असे त्याने लेखी दिली. त्यानंतर मोठ्या समाधानानं मुलाच्या आईनं साहेबांना हात जोडले आणि ती चालती झाली. तर, साहेब.! गोरगरिबाला पोलीस ठाण्यात न्याय मिळतो याची खात्री झाली असे म्हणून तिने पुन्हा हात जोडले आणि आनंदाश्रु घेऊन ती निघुन गेली..!!

त्याचे झाले असे की, अकोले तालुक्यात वर्षानुवर्षे रोजगाराचा प्रश्‍न कायम आहे. त्यात आदिवासी तरुणांचे तर फार बिकट हाल आहे. म्हणून डोंगराच्या दरीखोरीतून यायचे आणि अकोले शहरात पोट भरण्यासाठी मिळेल ते काम करुन शिक्षण घ्यायचं. हिच बिकट आवस्था अकोल्यात आहे. त्यामुळे, लॉज, बियर बार, दारुची दुकाने आणि बर्‍याच अवैध धंद्यांवर मागासवर्गीय मुले काम करताना दिसत आहे. त्यातलेच भांगरे आणि घुले होय.! यातील एक लॉजवर काम करतो आणि दुसरा बियर बारवर काम करतो. ही दोघे शुक्रवारी देवगाव येथे घरी गेले होते. रात्री उशिर झाल्यामुळे त्यांनी घरीच मुक्काम केला आणि दुपारी पुन्हा कामावर हजर झाले. 


दरम्यान, ही दोघे कामावर आल्याची माहिती मिळताच मालक महोदय आले आणि त्यांनी गैरहजर राहण्याबद्दल जाब विचारला. जे होते ते स्पष्ट सांगितल्यानंतर मालकाने या दोघांना एका खोलीत घेऊन अक्षरश: बुटाने मारहाण केली. तर, लाथाबुक्क्या आणि जवळ असणार्‍या खुर्चीने त्यांना मारले. यात भांगरे या तरुणाच्या हाताचे हाड फॅक्चर झाले असून बुटाने मारल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. मालकाच्या तावडीतून सुटल्यानंतर भांगरे याने एका रुग्णालयात उपचार घेतले आणि तो घरी गेला. मात्र, घरी गेल्यानंतर त्याचा हात वळत सुद्धा नव्हता, त्यामुळे अक्षरश: त्याच्या आईने त्याला जेवण भरविले. हे सर्व सहन करण्याची ताकद मुलात होती. मात्र, त्याच्या आईत नव्हती. त्या माऊलीने थेट पोलीस ठाणे गाठले.

हा सर्व प्रकार सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या समोर कथन केला. मुलाची जी आवस्था होती. ती सुद्धा समोर दाखविली. मुलगा पुर्वीच काही आजारांनी त्रस्त असल्याच्या फायली त्या माऊलीने साहेबांच्या टेबलावर मांडल्या. अर्थात घुगे यांनी देखील अशा प्रकारचे घटनेचा खेद व्यक्त केला आणि संबंधित बार मालकाला तत्काळ पोलीस ठाण्यात हजर करण्याच्या सुचना केल्या. पैसा गरिबांना गप्प करू शकतो. मात्र, कायद्याला नाही. त्यामुळे, महाशय तत्काळ हजर झाले. साहेबांनी त्याला ताब्यात घेण्याचे आदेश केले आणि गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मात्र, साहेब जेवण करण्यास गेले आणि बार मालकाने जे झाले त्याबाबत वारंवार माफी मागण्यास सुरूवात केली.

दरम्यान, या दोघांमधील रोष थांबावा म्हणून काही व्यक्तींनी मध्यस्ती केली आणि झाल्या गोष्टींची दिलगिरी व्यक्त केल्यानंतर वादावर पडदा पडला. बार मालकाने पोलीस ठाण्यात लेखी स्वरुपात दिले. की, माझ्याकडून भांगरे या तरुणास पुन्हा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. वारंवार विनंत केल्यानंतर हे आदिवासी कुटूंब हाळवे झाले आणि त्यांनी मोठ्या मनाने त्यास माफ केले. चुक झाली तर कामाहून काढून टाका, नुकसान झाली तर भरपाई घ्या, वाईट वागला तर समजून सांगा. पण, अशा पद्धतीने मारहाण करणे हे चुकीचे असल्याची समज मालकास देण्यात आली. मात्र, पोलीस ठाणे हे सामान्य मानसांचे नाही, तेथे न्याय मिळत नाही, पोलीस बड्या मानसांचे ऐकतात अशा प्रकारचे भ्रम त्या माऊलीच्या डोक्यातून निघुन गेले. त्यांनी घुगे साहेबांचे आभार मानले आणि तेथून काढता पाय घेतला...!!