अकोल्याच्या वाळुसस्करांवर संगमनेरात गुन्हा अन सव्वालाख दंड.! तलाठ्यावर देखील कारवाई.! संगमनेरातुन गोमांस निर्यात, वाळु आयात.!


 

सार्वभौम (अकोले/संगमनेर) :- 

संगमनेरमध्ये वाळु मिळणे कठीण झाल्यामुळे तेथे लोक आता अकोले तालुक्यातील वाळु तस्करांशी संपर्क करु लागले आहेत. मिळेल त्या भावात वाळु द्या असे म्हणून रात्री अपरात्री अकोल्याकडून पिकअप, छोटा हात्ती, ट्रॅक्टर आणि ढंपर संगमनेरकडे पळु लागले आहेत. वर कृत्रीम वाळु आणि खाली नदितील वाळु असा बनावट कारभार करुन वाळुची तस्करी नव्याने पुढे येऊ लागली आहे. जेव्हा याबाबत एका समाजसेवकाने पुढाकार घेऊन वाळु पकडून दिली. त्यानंतर झोपेचे सोंग घेतलेल्या काही प्रशासकीय व्यक्तींना जाग आली. त्यानंतर पंचनामा झाला आणि खुद्द तहसिलदार महोदयांनी तब्बल १ लाख २५ हजार रुपयांचा दंड केला. त्यानंतर पुन्हा वाळुतस्कर आण्णासाहेब सुधाकर वाकचौरे (कळस बु, ता. अकोले) आणि सुहास पुंडे (रा. ढोकरी, ता, अकोले) या दोघांवर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर यात धंदरफळ तलाठी आर. एम. मुळे यांच्यावर तहसिलदार अमोल निकम यांनी शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २७ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका तक्रारदाराच्या अर्जानंतर महसुल विभागाला जाग आली होती. त्यानंतर त्यांनी धांदरफळ मिर्झापूर रोडवर त्यांची एक टिम उभी केली होती. ठरल्याप्रमाणे जेव्हा आरोपी आण्णासाहेब वाकचौर आणि मालक सुहास पुंडे यांचा एम.एच १७ बी.वाय ७७४४ हा ढंपर आला तेव्हा सर्कल महोदयांनी त्याची तपासणी केली. त्यात असे लक्षात आले की, ढंपरमध्ये वरवर कृत्रीम वाळुचा थर लावण्यात आला होता. तर, त्याच्याखाली जेव्हा उकरुन पाहिले तेव्हा खाली नदीची कृत्रीम वाळु होती. त्यानंतर प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी या फ्रॅड आणि चालाखीबाबत विचारणा केली. मात्र, त्याची उडवाउडविची उत्तरे मिळाली.

दरम्यान, संबंधित ठिकाणी महसुल विभागाकडून पंचनामा करण्यात आला. त्यानंतर कागदी घोडे रंगविल्यानंतर आरोप प्रत्यारोप देखील झाले. तर, या प्रकरणात एका व्यक्तीने अर्थपुर्ण तडजोड करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार देखील करण्यात आली. मात्र, त्याचे काही झाले नाही, त्यानंतर आरोपी यांना १ लाख २५ हजार रुपये दंड करण्यात आला. तर, नंतर वाळुतस्कर आण्णासाहेब सुधाकर वाकचौरे (कळस बु, ता. अकोले) आणि सुहास पुंडे (रा. ढोकरी, ता, अकोले) या दोघांवर गुन्हे नोंदविण्यात आले. या गुन्ह्याला नंतर राजकीय रंग देखील लागला होता. मात्र, पोलिसांनी आणि महसुल विभागाने यात जे काही कायदेशिर आहे ती कारवाई केली. तर, दरम्यानच्या काळात धांदरफळ तलाठी महोदय यांची अक्षेपहार्य क्लिप व्हायरल झाल्यानंतर ते अडचणीत आले होते. मात्र, महसुल विभागाला पुरावे मिळाले नाही म्हणून कारवाई टळली होती. त्यानंतर तरी मुळे हे थोडी सावध भुमिका घेतली असे वाटले होते. मात्र, त्यांच्यावर आता महसुल विभागाने शिस्तभंगाची कारवाई केली आहे.  

फक्त संगमनेरच का?

राज्यात आणि देशात ईडी ही फक्त विरोधी लोकांवरच कारवाई करते आहे. तर, जे भाजपात आणि त्यांच्या मित्रपक्षात येतील त्यांना क्लिन चिट मिळत आहे. अशा प्रकारचे आरोप राजरोस होत आहे. म्हणजे, ठराविक लोक आणि प्रदेश टार्गेट होताना दिसतो आहे. अगदी तसेच.! राज्यात सगळीकडे वाळु तस्करी जोमात आहे. अगदी लोणी पासून ते शिर्डी, राहुरी, कोपरगाव, नेवासा, सिन्नर, आळेफाटा आणि अकोल्यात सुद्धा. माग संगमनेरच का? तर, दोन नेत्यांच्या वादात आता लोकांची घरे बांधणी प्रलंबित राहिली आहे. कोणाची गोठे तर कोणीची बंगले, दिवाळीचा मुहूर्त टळून गेला पण अनेकांचा बांधकामाआभावी गृहप्रवेश झाला नाही. कारण, काही केल्या वाळु मिळत नाही. म्हणून संगमनेरचे सामान्य लोक बाजुच्या तालुक्यातून वाळु घेत आहेत. मग, बंदच करायची आहे तर सर्वत्र का नाही, संगमनेरच का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मात्र, ईडी कारवाई विरोधकांवरच होते.! भाजप, शिंदे गटावर का नाही? याचे प्रश्‍न जसे अनुत्तरीत आहे. तसेच संगमनेच्या वाळुचे उत्तर देखील अनुत्तरीतच आहे.!! 

संगमनेरात वाळु आयात.! 

अकोले तालुक्यात राजरोस वाळु सुरू आहे. तर, गौणखनिज देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र, येथील महसुल प्रशासन केवळ मलिदा खाण्याचे काम करीत असल्याचे बोलले जात आहे. अकोल्यातून संगमनेरात वाळु जाते, अकोल्याच्या मुळा आणि प्रवरेतून वाळु उपसा होतो. सिन्नर भागातून संगमनेर आणि अकोल्यात वाळु येते, याला कोणाचा वरदहस्त आहे? यावर महसुलमंत्र्यांनी अधिकार्‍यांना सुचना केल्या पाहिजे. कारण, संगमनेरातून गोमांस राज्यात निर्यात केले जात असून वाळु मात्र आयात करावी लागत आहे.  

लोणी-संगमनेरचा वाद तस्करांच्या जिवावर.!

संगमनेर तालुक्यात किती मोठ्या प्रमाणावर वाळु व्यवसाय होत होता हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र, जसे ना. विखे पाटील राज्याचे महसुलमंत्री झाले. तेव्हापासून फक्त संगमनेरातच वाळुचा कण देखील मुश्कील झाले आहे. त्यामुळे, अनेक महसुली आणि वर्दीतले अधिकारी मलिद्यावाचून तडफडत असून संगमनेरात कोणी अधिकारी यायला सुद्धा धजत नाही. एकीकडे या दोघांचे राजकीय भांडण आणि त्यात अधिकार्‍यांचा भुगा त्यामुळे, एकेकाळी संगमनेरची बाजारपेठ इतकी तेजीत नव्हती.! इतके प्रशासन तेजीत होते. मात्र, जशी शिंदेशाही राज्यात रुजु झाली. तेव्हापासून संगमनेरचे कत्तलखाने वगळता गौणखनिज क्षेत्र प्रचंड अस्वस्थ आहे. त्यात वाळु तस्कर तर भाजपात जाण्याच्या तयारीत असून काही शिंदे गटात गेल्याचे बोलले जात आहे.