व्यापार्‍यांनो सावधान.! बनावट चेक देऊन माल नेणारी टोळी आली, अकोल्यात दोन व्यापार्‍यांची ३ लाखांना फसवणुक.! दोघांना अटक, मास्टरमाईंड पसार.!


 
सार्वभौम (अकोले) :- 

माझे काम अगस्ति मंदिर, गर्दणी, कारखाना रोड, देवठाण या ठिकाणी चालु आहे. माझ्याकडे कॅश पैसे नसून मी चेक देतो मला इलेक्ट्रीकल किंवा अन्य (दुकान ज्याचे असेल तो) माल द्या. तुम्ही चेक वटवून घ्या असे म्हणून हजारो आणि लाखो रुपयांचा माल ही टोळी उचलते. मात्र, जेव्हा बँक सांगते. की, हे चेक खोटे आहे, हे खाते बंद झालेले आहे. तोवर मात्र मालही दिलेला असतो आणि फसवणुक देखील झालेली असते. हीच घटना अकोले शहरात अनेक व्यापार्‍यांसोबत झाली आहे. मात्र, अक्षय संजय देशमुख या तरुणाने पुढे येऊन गुन्हा दाखल केला आहे. जे त्याच्याबाबत झाले. ते अनेकांच्या बाबत होऊ नये म्हणून त्याने जबाबदारी म्हणून पुढे येत मुख्य आरोपी अशोक मगन मोहिते (रा. म्हसरुळ, जि. नाशिक), विक्रम विलास वरखेडे (रा. सायखेडा. ता. निफाड, जि. नाशिक) व राहुल विष्णु शिरसाठ (रा. चाटोरी, ता. निफाड) अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देशमुख यांचे अगस्ति शाळेसमोर इलेक्ट्रीक बॅटरी आणि इन्व्हर्टर यांचे दुकान आहे. माल चांगला आणि खात्रीलायक असल्यामुळे त्याच्याकडे ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे, आरोपी अशोक मोहिते याने देखील त्याचे दुकान गाठले. दि. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास मोहिते हा दुकानावर आला होता. तो म्हणाला मी ईलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर असून माझे काम अगस्ति मंदिर, गर्दणी, कारखाना रोड, देवठाण या परिसरात चालु आहे. आता हा आरोपी नाशिकचा असला तरी त्याने तालुक्याच्या शेजारी असणारी चार ठिकाणे सांगितली. त्यामुळे, त्याच्यावर विश्‍वास बसणे सहाजिक होते. तो म्हणाला माझ्याकडे कॅश पैसे नाही, पण मी चेक देतो आणि मटेरियल घेऊन जातो. त्याच्यातील आत्मविश्‍वास आणि बोलता-बोलता त्याने संपादन केलेला विश्‍वास यात व्यापार्‍यांना भुरळ पडते आणि ते माल देण्यास तयार होतात. देशमुख यांच्याबाबत देखील तसेच झाले.

दरम्यान, आरोपी मोहिते याने देशमुख यांच्याकडून पहिल्या दिवशी तब्बल २२ हजार ५०० रुपयांचे मटेरियल नेले. त्या बदल्यात पाच सिलींग फॅन, दोन टेबल फॅन, ३३ वायरीचे बंडल घेऊन गेला आणि बँक ऑफ बडोदाचा एक चेक दिला. त्यानंतर दुसर्‍या दिसशी मोहिते हा पुन्हा देशमुख यांच्या दुकानात आला आणि त्याने पुन्हा ८६ हजार ३९५ रूपयांची खरेदी केली. याचे पैसे आदा करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक चेक दिला आणि निघुन गेला. मात्र, जेव्हा देशमुख हा संबंधित चेक बँकेत घेऊन गेला. तेव्हा तो बनावट आणि खोटा असल्याचे लक्षात आले. जेव्हा आपली फसवणुक झाली असे लक्षात आले तेव्हा त्यांनी अन्य काही दुकानदार यांच्याशी संपर्क केला. तेव्हा त्यात नानासाहेब बबन मालुंजकर यांना देखील याच आरोपीने १ लाख ९९ हजार रुपयांना फसविल्याचे समोर आले. त्यासाठी आरोपीने एकच पद्धत वापरल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, या आरोपीच्या मुसक्या कशा आवळायच्या? असा प्रश्‍न पडलेला असताना आरोपीचा देशमुख यांना फोन आला. मला काही वायर आणि बॅटर्‍या हव्या आहेत. तुम्ही त्या नाशिकला घेऊन या अशी विनंती केली. आता हिच वेळ होती त्या आरोपीचा शोध घेण्याची आणि मुसक्या आवळण्याची. त्यानंतर पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी देशमुख आणि मालुंजकर यांना थेट नाशिक येथे माल घेऊन पाठविले. जेव्हा, हा माल घेण्यासाठी दोघे एक गाडी घेऊन आले. त्या दोघांना या दुकानदारांनी ताब्यात घेतले. त्यांना रात्री अकोेल पोलीस ठाण्यात ठेवले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता तेव्हा मुख्य आरोपी अशोक मगन मोहिते याचे नाव पुढे आले. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर ताब्यात घेतलेल्या दोघांना पोलिसांनी मोहिते याच्या घरी नेले. तेव्हा लक्षात आले. की, हा कट्टर गुन्हेगार आहे. त्याच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र, तो पोलिसांना घरी मिळून आला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

व्यवहार करताना सावधान.! 

एकतर विश्‍वास आणि ओळख या दोन गोष्टी असेल तर अशा प्रकारचे व्यवहार केले पाहिजे. विशेष म्हणजे ज्याला माल द्यायचा आहे त्याची ओळख पटवून स्वत: त्याच्या नावेच चेकचा व्यावहार केला पाहिजे. अन्यथा हरविलेल्या चेकचा गैरवापर होऊन आपली फसवणुक होऊ शकते. तसेच माल देण्यापुर्वी चेक खरा की खोटा याची देखील शहनिशा केली पाहिजे. अन्य व्यक्तींच्या नावाचा चेक घेऊन देखील तुमची फसवणुक होऊ शकते. त्यामुळे, मुळात अज्ञात व्यक्तीसोबत अशा प्रकारचे व्यवहार करुच नका. केले तरी पुर्ण खात्री करुन व्यवहार करा. जर अशा प्रकारची कोणाची फसवणुक झाली असेल तर संबंधित व्यापार्‍याने जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करावी. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.