संगमनेर पोलिसांचा भोंगळा कारभार, आरोपी रात्री अटक सकाळी घरी.! हा चोर-पोलीस खेळ कशासाठी? अधिकार्‍यांनी गांभिर्य नाही ना?


सार्वभौम (संगमनेर) :-

         प्रॉपर पोलिसिंग म्हणजे काय? आता हे संगमनेर पोलिसांनाच शिकविण्याची वेळ आली आहे. विशेष करून वरिष्ठ अधिकार्‍यांना आपली नियुक्ती ही गुन्हे निर्गती, प्रॉपर पोलिसिंग, उपलब्ध कर्मचार्‍यांमध्ये अचूक नियोजन, अवैध धंद्यांवर बंदी, कायदा आणि सुव्यवस्था तसेच गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी एसपी ते तपासी अधिकारी यांची असते. मात्र, विभागनिहाय डेप्युटी ते तपासी अधिकारी यांनी आपली कायदेशिर जबाबदारी पार पाडली तर गुन्हेगारांना जरब बसविण्यात यश येते. दुर्दैवाने येथे बेकायदेशिर कामांना प्रायोरिटी आणि वैध कामांना अक्षरश: कोलुन दिले जाते. म्हणून तर संगमनेर सारख्या सुसंस्कृत शहराचे बिहार होत चालले आहे. यासाठी अगदी कालचे उदाहरण पहा ना.! पोलिसांच्या डीबी पथकाने एटीएम चोरीतील आरोपी मोठ्या शिताफीने पकडून आणले आणि त्यांना कोर्टासमोर हजर केले तर त्याच दिवशी अट्टल चोरांना जामिन झाला. म्हणजे, संगमनेरात आजवर सहा ते आठ एटीएम फोडीच्या चोर्‍या आणि त्यात कोट्यावधी रुपयांचा गेलेला मुद्देमाल. हे सर्व कायम तपासावर असताना साधी एक दिवस पोलीस चौकशी होऊ शकली नाही. हे अपयश कोणाचे आहे? अर्थात पोलीस उपाधिक्षक आणि पोलीस निरीक्षक यांचे म्हणावे लागेल. कारण, अटक ते दोषारोपत्र आणि कोर्टाचा पैरवी अधिकारी ते साक्ष यापर्यंत वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे. मात्र, येतोय पागर आणि चाललय तसं चाललं..!! मात्र, ज्यांच्या घरी चोर्‍या होतात त्यांच्या वेदना यांना काय माहित? ज्याच्या घरी दरोडे पडतात याची झळ यांना काय माहित, रस्तालुटीत होणार्‍या घटनेत काय होते याना काय माहित. ज्याचे जळते त्याला कळते अशी एक म्हण आहे. त्यामुळे, चोर्‍या करणार्‍यांना असे सहज सोडून देणे म्हणजे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो आहे.

काखेत कळसा,गावाला वळसा.!

गेल्या आठवड्यात संगमनेर शहरात एकाच वेळी 12 ठिकाणी चोर्‍या घरफोड्या झाल्या होत्या. त्यात एटीएम देखील फोडले होते. या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या विशेष पथकाने मोठ्या शिताफीने पकडले होते. पुर्वी देखील एटीएम चोरीच्या घटना घडल्या त्यात चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी दिल्ली ते गल्ली पालथी घातली. पण, काही हाती लागले नाही. म्हणतात ना.! काखेत कळसा अन गावाला वळसा.! आरोपी हे शहरातलेच होते. मग मौजमजा करण्यासाठी पथक निसर्गरम्य ठिकाणी जातात का? त्यासाठी शासकीय तथा समाज्याच्या पैशांचा वापर करतात का? याची चौकशी केली पाहिजे. कारण, यापुर्वी तापासाच्या नावाखाली किंवा सुट्ट्यांच्या नावाखाली गोवा वारी करणारे पोलीस अधिकारी देखील आपण पाहिले आहेत. दुर्दैवाने पोलीस म्हटलं की, नको नादाला लागायला, झाकली मुठ सव्वा लाखाची अशी वास्तववादी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, खरे काम करणारे पोलीस देखील वर्दीत आहेत. त्यांचे कौतुक करणे हे देखील महत्वाचे आहे. कारण, गेल्या कित्तेक दिवसांपासून संगमनेरात चोर्‍या, घरफोड्या, रस्तालुट, एटीएम फोडण्याचे प्रकार घडत आहे. ते ओपण करण्याचे काम डीबी करीत आहे. किमान चोर आणून दिल्यानंतर त्याला पोलीस कोठडी घेणे, त्याच्याकडून अधिकची माहिती काढणे, सहआरोपी आणि मुद्देमाल रिकव्हर करणे अशी कामे तपासी अधिकार्‍यांनी केली पाहिजे. मात्र, देरे बाबा खाटल्यावरी अशी भुमिका काही पोलीस बजावत असतात. त्यांच्यावर पीआय, डेप्युटी यांचा काही वचक आहे का? त्यांना मार्गदर्शन आहे का? याचे आत्मचिंतन वर्दीने करणे अपेक्षित आहे.

काय आहे हे प्रकरण.!

दोन दिवसांपुर्वी डीबी पथकाने एटीएम चोरीच्या गुन्ह्यातील अनिकेत गजानन मंडलिक (रा. माळीवाडा, संगमनेर), सर्फराज राजू शेख (रा. लालतारा वसाहत, संगमनेर) व पोपट गणेश खरात (रा. लक्ष्मीनगर, संगमनेर) या तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांना अटक दाखवून सबळ रिमांड रिपोर्ट तयार करणे, सरकारी वकीलांना भेटून गुन्ह्याची तिव्रता समजून सांगणे आणि आरोपींना स्वत: न्यायालयात हजर करुण पोलीस कोठडी घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र, आरोपी आले, कोणीतरी कोर्टात नेले आणि जामिन होऊन घरी गेले. म्हणजे, पोलिसांनी काही गद्यपद्या नसल्यासारखा हा प्रकार पहायला मिळाला. आता जर यांना इतका सहज जामिन मिळतो तर याच आरोपी काय? पुढे कोणतेही आरोपी उद्या बँका फोडायला कमी करणार नाही. का? तर आज अटक अन उद्या घरी? ना मुद्देमाल द्यायचा, ना अटक व्हायचे, ना जेलमध्ये राहायचे, ना पोलीस कोठडीचा त्रास सहन करायचा. साधा अदखलपात्र गुन्ह्यात एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेतले तर 151 (1) ची कारवाई केली तरी त्याला 24 तास आत ठेवले जाते. इथे एटीएम फोडून तो आला आणि यू निघुन गेला. वा रे पोलिसांची तत्परता, वार रे तपासी अधिकारी आणि धन्य ते त्यांचे वरिष्ठ अधिकारी..!!


साहेब.! याची उत्तरे द्या..

गेल्या काही दिवसांपासून संगमनेरात पोलिसांकडून फारशी उल्लेखनिय कामगिरी पहायला मिळाली नाही. आता कोठे गुन्ह्ये उघड होण्यास सुरुवात झाली होती. मात्र, आरोपी असे सुटले तर काय खाक गुन्हे उघड होतील? पोलीस काय सबळ पुरावे जोडणार आहेत? काय मुद्देमाल रिकव्हर करणार आहे? त्यांनी आणखी कोठे-कोठे चोर्‍या केल्या हे पोलिसांना कोण सांगणार आहे? त्यांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे पोलीस कोठून उपलब्ध करणार आहे? या गुन्ह्यात आणखी कोण कोण होते? कशी व कोठून माहिती घेणार आहे? गुन्ह्यात वापरेली वाहणे कशी जप्त करणार आहे? घटनाक्रम कोणाकडून उलगडून घेणार आहे? पुर्वीची गुन्हे केली का? पुढे करणार होते का? याची माहिती कशी मिळवणार आहे? आजवर 8 ते 10 ठिकाणी एटीएम फोडले गेले आहेत त्यात यांचा सहभाग होता का? हे कसे कळणार आहे? असेल सहभाग तर पैसे काय केले? कट कसा रचला? कशी विल्हेवाट लावली, पुरावे कसे व कोठे नष्ट केले? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे आता अनुत्तरीत राहिली आहेत. त्यामुळे, जर गुन्हे निर्गती हा फार महत्वाचा मुद्द वाटत नसेल, जनतेच्या पैशांची, प्रॉपर पोलिसांग करण्याची फार गरज वाटत नसेल तर उगच जिवावर उदार होऊन पोलिसांनी चोरांच्या मागे जाऊन स्वत:चा जीव धोक्यात घालणे फार नाही संयुक्तीक वाटत नाही. कारण, रात्री पकडून चोर सकाळी घरी जाणार असेल तर हा चोर-पोलीस खेळ कशासाठी.????

संगमनेरची वाटचाल बिहारकडे.!

हे वाक्य जरा अनेकांना खटकेल. मात्र, युपी, बिहार सारख्या ठिकाणी पोलीस ठाण्यांना आरोपी फारसे मोजत नाही. राजकीय हस्तक्षेप आणि संघटीत गुन्हेगारी तसेच हाय प्रोफाईल गुन्हे. तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे वर्दीच गुन्हागारांना अभय देत असते. आता संगमनेरात तोच पायंडा पडू लागला आहे. येथे हर एक प्रकारचे गुन्हे आणि राजकीय हस्तक्षेप होऊन जिरवाजिरवी सुरू आहे. म्हणून तर तत्कालिन पीआय यांना आपले बस्तान गुंडाळावे लागले आहे. सामान्य व्यक्तींना ज्ञात नसावे. मात्र, संगमनेरात भलेभले सेलिब्रेटी येऊन गुंतवणूक करतात, अवैध धंद्यांमध्ये पांढर्‍या बगळ्यांच्या फार मोठमोठ्या गुंतवणुका असल्याचे समोर येत आहे. राज्यात संगमनेरचा मांस, येथून होणारा गांजा सप्लाय, गुटखा आणि मेडिकलसह अन्नधान्यातील भेसळ हा फार मोठा अंतर्गत काळा बाजार सुरू असल्याचे आरोप होत आहे. आता पोलिसांना खुले चोर सापडत नाही, जे सापडले त्यांच्याकडून गुन्हे निर्गती होत नाही त्यामुळे, त्यांच्याकडून अन्य अपेक्षा करणे चुकीचे आहे. मात्र, येणार्‍या काळात जसे जर्मन बेकरीचे हत्यारे नगर शहरात सापडले, आतंकवादी श्रीरामपुरमध्ये सापडले तसे येणार्‍या काळात संगमनेर अधिक असुरक्षित होऊ नये. हीच सामान्य नागरिकांची ईच्छा आहे.