आजारी महिलेला निट करण्यासाठी निर्लज्ज भोंदुने जादुटोना करण्यासाठी मातंग महिलेचे केस मागितले.! समाज एकवटला, दोघांना अटक.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावात अंधश्रद्धेचा एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. बहीण आजारी असल्याने एका भोंदु मांत्रीकाने सांगितले की, एखाद्या मातंग महिलेच्या डोक्याची केस आना. त्यामुळे, आरोपीने मागासवर्गीय महिलेच्या मुलाकडे फोनवर आईच्या केसांची मागणी केली. मंग काय.! केस आणण्यासाठी आरोपींनी थेट मागासवर्गीय महिलेच्या घरी जाऊन केसांची मागणी केली. त्यानंतर पिडीत महिलेच्या आणि समाजाच्या भावना दुखावुन अघोरी विद्या करण्याचा प्रयत्न या विकृत व्यक्तींनी केला. यावरून पिडीत महिलेने थेट तालुका पोलीस ठाणे गाठले व घडलेली कैफियत पोलीस ठाण्यात सांगितली. ही धक्कादायक घटना रविवार दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 दरम्यान घडली. याप्रकरणी आरोपी संतोष विठोबा निठवे (रा.डीग्रस, ता. संगमनेर), भाऊसाहेब रामा कुदनर (रा. शिंदोडी, ता. संगमनेर) या दोघांवर अट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने करत आहे. तर संगमनेरात काही दिवसांपुर्वी एका भोंदुबाबाने भुत उतरवण्यासाठी एका महिलेवर बलात्कार केला होता आज पुन्हा एका भोंदुबाबाने अनुसूचित जातीच्या महिलेची डोक्याची केस आणायला सांगतीली. यावरून संगमनेरात दिवसेंदिवस अंधश्रद्धा वाढत आहे की काय असा प्रश्न संगमनेरातील सुज्ञ नागरिकांना पडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत महिला मालुंजे परिसरात मोल मजुरी करून आपला संसाराचा गाडा मोठ्या कष्टाने चालवते. घरी काही गाया असल्याने पिडीत महिला रविवार दि.18 सप्टेंबर 2022 रोजी गाया चरण्यासाठी घराशेजारील शेतात घेऊन जाते. पिडीत महिला सकाळी 10 वाजता शेतात गाया चारत असताना आरोपी संतोष निठवे व भाऊसाहेब कुदनर हे घरी आले काही काळ थांबले आणि थोड्यावेळाने निघुन गेले. त्यानंतर पिडीत महिला घरी आली व तिने सुनेला विचारले की, हे दोन लोक कशासाठी आले होते. तेव्हा सुनेने सांगितले की, ते गाया पाहण्यासाठी आले होते. त्यानंतर पुन्हा तेच दोन लोक सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पुन्हा घराजवळ आले. तेव्हा पिडीत महिला घराजवळील रोडच्या कडेला जनावरे चारत होती. तेव्हा पिडीत महिलेने त्यांना विचारले की, तुम्ही येथे कशासाठी आले ? असे विचारले असता तेव्हा एका आरोपीने सांगितले की, माझी बहीण आजारी आहे. एका बुवाने मला मातंग महिलेच्या डोक्याचे केस आणायला सांगितले आहे. तुम्ही केस द्या. तेव्हा पिडीत महिलेने केस देण्यास नकार दिला. त्यावेळी दोन्ही आरोपी तेथुन मोटारसायकलवर निघुन गेले.
दरम्यान, पिडीत महिलेचा मुलगा सायंकाळी 6 वाजता घरी आला. तेव्हा पिडीत महिलेने सांगितले की, दोन लोक माझ्याकडे केस मागण्यासाठी आले होते मी त्यांना केस दिले नाही. असे सांगत असताना 15 मिनिटानंतर पिडीत महिलेच्या मुलाला आरोपीचा फोन आला की, तु कुठं आहेस? तेव्हा पिडीत महिलेचा मुलगा म्हणाला की, मी गावात आहे. तुझे काय काम आहे? तेव्हा आरोपीने फोनवर पिडीत महिलेच्या मुलाला सांगितले की, माझी बहीण आजारी आहे एका बुवाबाजी करणाऱ्याने मला तुमच्या समाजाच्या बाईच्या डोक्याचे केस आणायला सांगितले आहे. म्हणुन तुमच्या घरी आलो होतो. मला केस भेटले नाही मला केस घेऊन दे. असे फोनवर म्हणल्याने पिडीत महिलेच्या मुलाने आरोपी संतोष निठवे व भाऊसाहेब कुदनर याना घराजवळ बोलवले. त्यानंतर, 10 मिनिटांत मोटारसायकलवर आरोपी संतोष निठवे व भाऊसाहेब कुदनर हे घरा शेजारी आले. तेव्हा पिडीत महिलेच्या घरच्यांनी समाजाची लोक बोलवली व गावातील प्रतिष्ठित लोक बोलावुन त्यांना थांबवले व विचारपूस करून त्यांना नावे विचारून घेतली. त्यानंतर थेट तालुका पोलीस ठाण्यात आणुन गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने करत आहे.
दरम्यान, आंधश्रद्धा निर्मुलन करण्यासाठी नरेंद्र दाभोळकर यांनी स्वत:चा जीव बदिदान केला. मात्र तरी देखील ते असल्या भोंदुगिरीला नमले नाही. तर, जातीयता नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत:चा देह झिजविला. दुर्दैवाने आजही आंधश्रद्धा बोकाळली आहे, आणि अजुनही जातीयता नष्ट झाली नाही. महार काय, मातंग काय, ब्राम्हण काय आणि मराठा काय.! सर्वांकडे पहिले माणूस म्हणून पाहिले पाहिजे असे थोर लाेक सांगून गेले. मात्र, विकृत मानसे आजही लहान मुलांना बळी देतात. कोठे पशुप्राण्यांना बळी देतात तर काही ठिकाणी वस्र, रक्त, पायाखालची वाळू, डोक्याचे केस आणि अभद्र प्रकारच्या मागण्या करतात. विशेष म्हणे या भोंदुना आदिवासी, किंवा दलित लोकच काशासाठी पाहिजे असतात हे अद्याप न उलगडलेले कोडे आहे. मात्र, असल्या विकृती ठेचून काढण्यासाठी पोलिसांनी आणि अनिसा तसेच सामाजिक संघटनांना पुढाकार घेतला पाहिजे. हे फिर्यादी सदर घटनेच्या विरोधात पुढे आले त्यांचे कौतुकच आहे. मात्र, असे कित्तेक लोक आहेत. जे असा प्रकारचा अन्याय सहन करतात. त्यांनी देखील यास बळी पडू नये. यात आणखी एक महत्वाचे म्हणजे आंधश्रद्धांना बळी पडणारे एसी, एसटी बांधव मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्यात देखील सामाजिक जागृती करण्याची गरज आहे.