गायकर गटातील नेत्याकडे पाहुन बुथवर पिचड साहेबांना आश्रू अनावर.! सांगा ना.! काय कमी केलं होतं मी तुम्हाला.!!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्यात जगाशी संघर्ष करण्याचे सामर्थ असते. मात्र, जेव्हा आपल्या व्यक्तींपासून वेदना मिळतात. तेव्हा, अंत:करणातून प्रचंड वेदना होतात. म्हणून तर म्हणतात, आपनोंके घाव जादा चुंभते हैं.! अशीच काहीशी गत आदरणीय पिचड साहेबांच्या बाबत त्या दिवशी पहायला मिळाली. दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी अगस्ति कारखान्याचे मतदान सुरू असताना पिचड साहेब अगस्ति महाविद्यालयात आले होते. तेव्हा एक गायकर साहेबांच्या गटात सामिल झालेला नेता अचानक साहेबांच्या समोर आला. अपसूक साहेबांची नजर त्यांच्यावर गेली आणि थरथरत्या आवाजाने साहेब उच्चारले.! काय रे? आम्ही कोठे चुक केली? आम्ही तुम्हा सगळ्यांना मोठे केले नाही का? हीच आमची चुक आहे का? असे प्रश्न करीत नकळत साहेबांचे डोळे पाण्याने डबडबले. तीन मिनिटांचा हा संवाद पण उपस्थित व्यक्तींच्या काळजावर घाव करुन गेला. उतारवयात साहेबांच्या ह्या भावना म्हणजे अगदी दगडाला देखील पाझर पुटेल अशा होत्या. काय चुक आणि काय बरोबर, कोण चुक आणि कोण बरोबर हा फार नंतरचा विषय आहे. मात्र, एखाद्या वयोवृद्ध घायाळ सिंहावर कोणीतरी घाव घातले की काय? असे वाटत होते. काही झालं तरी हा तालुका साहेबांचे योगदान कधी विसरु शकत नाही. हे देखील तितकेच खरे आहे.
त्या दिवशी झाले असे की, साहेब तालुक्यातील प्रत्येक बुथला भेटी देत होते. दुपारी ते अगस्ति महाविद्यालयात आले होते. तेव्हा त्यांना त्यांचा पुर्वीचा निष्ठावंत कार्यकर्ता दिसला. काल ज्यांना मोठं केलं आज तेच आज माझ्या विरोधात उभे ठाकल्याच्या भावना त्यांच्या मनाच जागल्या आणि ते स्थिर झाले. सांग ना? तुम्हाला काय कमी केलं होतं? तुम्हाला मोठं करण्यात मी कोठे कमी पडलो? माझ्या म्हातारपणात तुम्ही साथ सोडली असे अनेक प्रश्न त्यांनी उमेदवाराच्या काळजावर फेकले. आता हाच प्रश्न अन्य कोणी केला असता तर त्याला उलट उत्तर देण्याची तयारी कोणीही दर्शविली असती. मात्र, साहेब हे साहेब आहेत. उमेदवार गप्प उभे होते. तर, त्यांच्यासोबत उभी हयात घातलेले नेते देखील बाजुला उभे होते. मात्र, त्यांनी साहेबांना पाहिले आणि आपली वाट काही क्षणात बदलुन घेतली. अर्थात साहेबांच्या डोळ्यात डोळे घालण्याचे सामर्थ्य अजून कोणाच्या उरी नाही, हाच आदर आणि श्रद्धा काही कमी नाही. काही क्षण साहेब जाग्यावर स्थिर होते. त्यांची डोळे अगदी रक्तरोहिड्यासारखे लालबुंद झालेले होते. अर्थात ५५ वर्षे त्यांनी राजकारण केले. त्यामुळेे, बुथवर गेल्यानंतर त्यांना दुपारीच अंदाज आला असावा. परंतु, त्या स्थिरावलेल्या पाऊलांमध्ये प्रचंड हतबलता दिसत होती. पण, काही झालं तरी माजी मंत्री मधुकर पिचड साहेब म्हटलं की तालुक्याची ओळख होते आणि त्यांचे नाव जरी घेतले तरी चर्चा राज्यात होते. म्हणून पराभव होऊन देखील हळहळ करणारी जनता देखील पहायला मिळाली. हे सत्य नाकारुन चालणार नाही.
साहेब भाजपात गेले त्यामुळे त्यांच्यामागे सगळेच नेते आणि कार्यकर्ते येतील असे त्यांनी गृहीत धरले होते. अर्थात तसे झाले देखील, मात्र, जनता काही त्यांच्यासोबत आली नाही हे नाकारून चालणार नाही. वैभव पिचड साहेब यांचा पराभव झाला आणि हळुहळू एकएकेने कल्टी मारायला सुरूवात केली. सुदैव म्हणा की दुर्दैव पण राज्यात पवार पॅटर्न पावरफुल चालला आणि महाविकास आघाडी या गोंडस नावाने राज्यात वेगळे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे, सत्ता नाही, आमदारकी नाही मग नेत्यांना सत्तेशिवाय करमत नाही. अखेर भाजपाचे विचार पटत नाही या अजेंड्याखाली अनेकांनी पिचड साहेबांना सोडायला सुरूवात केली. आता भाऊ आमदार झाले असते तर कोणी भाजपातून सुद्धा बाहेर पडले असते असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मात्र, परिस्थिती तशी नव्हती. त्यामुळे, जो तो स्वगृही परतला आणि हळुहळू पिचड साहेब एकटे पडत गेले.
खरंतर, साहेब एकटे पडले आणि म्हणून १९९५ ची पुनरावृत्ती होईल अशा प्रकारचे अनेकांनी वक्तव्य केले. मात्र, ज्यांनी असे वक्तव्य केले. त्यांनी तरी पिचड साहेबांना निवडणुकीत साथ दिली का? ते सुद्धा तेलंगणाला निघुन गेले. त्यामुळे, लोकांच्या झेंड्यावर पंढरपूर होत नाही. हे तितकेच खरे आहे. तर, दुसरीकडे १९९५ चा काळ वेगळा होता. शिक्षण, सोशल मीडिया, तरुणाईचा हस्तक्षेप आणि राजकारणात स्वारस्य असणारी मानसे कमी होती. आज जग फार बदललं आहे. त्यामुळे, एकटेपण आणि सहानुभूती हा विषय राहिला नाही. ११ वेळा आमदार असणारे गणपतराव देशमुख गेल्यानंतर त्यांच्या नातवाला देखील सहानुभूती मिळाली नाही. त्यामुळे, आता मतदार मनाने कमी आणि बुद्धीने जास्त चालतात. या १९९५ च्या भरोशावर आणि सहानुभूतीवर ग्रामपंचायत गेली, जिल्हा बँक गेली, कारखाना गेला. आमदारकी गेली त्यामुळे, आता तरी साहेबांनी ठोस भुमिका घेतली पाहिजे. उतावीळ कार्यकर्ते नको तर बुद्धीजीवी व्यक्ती जवळ केल्या पाहिजे. म्हणजे उद्याच्या यशासाठी फार काही नियोजनपुर्वक काम आत्तापासूनच उभे करावे लागणार आहे.
पहिला ते शेवटचा पराभव.!
अनेकजण पिचड साहेबांना अपराजित योद्धा म्हणतात. परंतु, वास्तवत: १९७२ नंतर ते पंचायत समितीत सभापती झाले आणि त्यानंतर त्यांनी १९७८ साली स्व. यशवंतराव भांगरे यांच्या विरोधात विधानसभा लढविली. तेव्हा साहेबांना तीन नंबरची मते मिळून ते पराभूत झाले होते. तो त्यांच्या राजकीय जिवणाचा पहिला पराभव होता. तर, १९७९ साली शरद पवार यांचे पुलोद सरकार बरखास्त झाले आणि १९८० साली पुन्हा निवडणुका लागल्या. तेव्हा इंदिरा गांधी यांच्या समर्थनार्थ जेलमध्ये बसल्याने पिचड साहेबांना तिकीट मिळाले आणि ते निवडून देखील आले. तेव्हा त्यांनी यशवंतराव भांगरे यांचा पराभव केला होता. आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राजाराम भांगरे (१९८५) आणि त्यानंतर अशोकराव भांगरे (१९९०) यांनी अतोनात प्रयत्न केले. अशोकराव भांगरे साहेब यांना ९ वेळा पक्ष बदल करावा लागला. मात्र, पिचड साहेबांना ते पराभूत करु शकले नाही. म्हणजे पिचड साहेबांच्या आयुष्यातला पहिला पराभव भांगरे यांनी केला आणि आता शेवटचा पराभव देखील भांगरे यांनीच केला. कधी न जिंकणारे पारंपारीक युद्ध भांगरे साहेबांनी जिंकले आणि पहिला पराभव ते शेवटचा पराभव हा एक इतिहास घडून गेला. मात्र, १९८० ते २०१९ पिचड साहेबांनी तालुक्यावर निर्वीवाद वर्चस्व गाजविले.