बड्या नेत्याच्या शाळेत शिक्षकाचा मुलांशी जातीयवाद.! मास्तर थेट पोलीस ठाण्यात.! त्याची बदली करा अन्यथा आंदोलन.!
सार्वभौम (अकोले) :-
हा देश कितीही सुधारला तरी येथील जातीयवाद कधीही नष्ट होऊ शकत नाही. एवढेच काय.! ज्या शिक्षकांच्या खांद्यावर भावी पिढी घडविण्याची जबाबदारी दिली आहे. तेच मास्तर वर्गात जातीयवाद करतात तर विद्यार्थ्यांशी अगदी उपकाराची भाषा बोलतात. हे दुर्दैवाने हे चित्र कोठे युपी बिहार येथे नव्हे.! तर पुरोगामीत्वाचा झेंडा मिरविणार्या अकोले तालुक्यात घडला आहे. विशेष म्हणजे ही शाळा एका बड्या नेत्याची असून असे होत असेल तर तालुक्याची नेमकी काय उन्नती होणार आहे देव जाणे. चक्क एक शिक्षक एससी-एसटी विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करतो काय.! छेडछाडी करतो काय, मुलींशी नकोतसे बोलतो काय, बायल्यासारखे घालुनपाडून बोलतो काय.! हे म्हणजे शिक्षकी पेशाला काळीमा आहे. चांगल्या शिक्षकांच्या कर्तुत्वाला काळा डाग आहे. जेव्हा या विकृत शिक्षकाचे कारनामे मुलांनी थेट पोलीस ठाणे गाठून पोलीस अधिकार्यासमोर मांडले. तेव्हा, शिक्षक पोलीस ठाण्यात हजर झाला. साहेब कान पकडून माफी मागतो. पण, पुन्हा असा जातीयवाद करणार नाही. असे अश्वासन दिल्यानंतर तसेच अनेक बड्या नेत्यांनी व जातीयवादास पाठीशी घालणार्या सहकारी मित्रांनी मध्यती केल्यानंतर एक सामजिक भान म्हणून ही तक्रार मागे घेण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी अकोले तालुक्यातील खडकी परिसरात असणार्या एका शाळेत आदिवासी समाजाच्या मुलांची पटसंख्या कमी आहे. त्यामुळे, शाळा टिकली पाहिजे, तिला अनुदान मिळाले पाहिजे, नको ती मानसे पोसली गेली पाहिजे म्हणून एसटी सोबत एससी मुलांना शाळेत प्रवेश देऊन अनुदान घेतले जाते. पण, जेव्हा काही वाटप करण्याची वेळ येते तेव्हा एससी सामाजाच्या मुलांना हिनवले जाते. जे देतोय ते उपकार समजा. मिळतेय ते गुपचूप घ्या, आम्ही देतोय म्हणून तुम्हाला मिळतेय अशा प्रकार तुच्छ बोलुन हिनवले जाते. एक उदा. म्हणजे, जेव्हा आदिवासी मुलांना कपडे येतात तेव्हा त्या मुलांची पटसंख्या नसल्याने ते कपडे एससीच्या मुलांना दिले जातात. जर शर्ट आला आणि पॅन्ट येत नसले. हा प्रश्न शिक्षकाला सांगितला तर दिले तेच उपकार माना असे उत्तर तोंडावर फेकूण मारले जाते. जर कधी निकृष्ट अन्न असेल आणि त्यावर प्रश्न केला तर जेवायला भेटतय हेच आभार माना अशी उत्तरे मिळतात. इतका जातीयवाद आणि दुजाभाव केला जातो.
खरंतर, या व्यक्तीरिक्त फार अवहेलना आहे. मात्र, ती सांगण्यात योग्यता नाही. पण, तरी देखील अन्याय सहन करायला देखील काही मर्यादा असते. त्यामुळे, येथील एका शिक्षकाचे आती झाले आणि विद्यार्थ्यांनी थेट बंड पुकारला. जेथे जगायला शिकविले जाते, उभे रहायला शिकविले जाते, वाघीनीचे दुध प्यायला दिले जाते. तेथे साधे जेवायला देखील धड मिळत नाही आणि जगण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. अशा ठिकाणाला शाळा म्हणावी का? असा प्रश्न खुद्द मुलांना पडला. म्हणून विद्यार्थ्यांनी काही सामाजिक संघटना आणि पोलीस अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. घडला प्रकार अतिशय गंभिर होता. त्यामुळे, यात गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, अकोले तालुक्यात जातीयवाद आणि सामाजिक विकृतीला पाठीशी घालणारे देखील काही लोक आहेत, त्यांनी दबाव निर्माण केला आणि पोलीस ठाण्यात गेलेले प्रकरण पुन्हा शांत झाले. मात्र, या प्रकरणात आता त्या विकृत शिक्षकाला संबंधित शाळेतून दुसरीकडे बदली केली पाहिजे. अन्यथा मुलांवर प्रचंड ताण येईल आणि अनेक मुले शाळा सोडून देतील. या शिक्षकाला दुसरीकडे टाकले नाही तर येणार्या काळात सामाजिक संघटना थेट शाळेवर आंदोलन करतील अशी प्रतिक्रीया काही संघटनांनी दिली आहे.
खरंतर मुलांची मने ही ओल्या मातीसारखी असतात. त्यांना जसा आकार आपण देऊ तसे त्यांना वळण लागते. त्यामुळे, भले आदिवासी मुलांच्या योजना या मुलांना लागु होत नसतील. तरी त्या आपल्यासाठी कशा नाहीत हे समजून सांगणे आणि त्या योजनांची आंमलबजावणी करताना दुजाभाव होणार नाही याची काळजी घेणे ही शिक्षकाची कसब आहे. आहे त्या गोष्टींचा वापर करुन प्रसंगावधानुरूप विद्यार्थी विकास करणे ही कला शिक्षकाच्या अंगी असावी. मात्र, तुम्ही एससी आणि तुम्ही एसटी हे आजच त्यांच्या मनावर बिंबविले तर त्यांच्यावर काय परिणाम होईल. आज देखील कित्तेक शिक्षक असे आहेत. त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहेत. दुर्गम भागात शाळा एक रोल मॅडेल करणारे आदर्श शिक्षक आहेत. स्वत:च्या पगारातून मुलांना कपडे, बुट, पुस्तके आणि फी देखील भरणारे आदर्श शिक्षक या तालुक्यात आणि जिल्ह्यात आहे. अकोले शहरात तर जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे खितपत पडलेला वाडा तयार झाला होता. आज अगदी धनबलाढ्या खाजगी शाळांना लाजवेल अशी ती शाळा आहे. त्यामुळे, जोवर शिक्षकातीला सामाजिक जुुनून जागा होत नाही. देशाचा तरुण आपण घडवत आहोत हे आत्म्यातून येत नाही. तोवर जगावेगळे काही करण्याचे सामर्थ्य निर्माण होत नाही. तालुक्यात सामाजिक आत्मियता असणारे शिक्षक फार आहेत. मात्र, असे विकृत देखील आहेत. ही तालुक्याला लागलेली किड म्हणवी लागेल.
खरंतर आपण म्हणतो, अकोले तालुका आदिवासी आणि दुर्गम भाग आहे. म्हणून येथे अनेक आदिवासी आश्रम, आश्रमशाळा आणि अनेकांनी संस्था उभ्या केल्या. दुर्दैवाने येथे मुलांना शिक्षण मिळतेच त्याच बरोबर त्यांचे शोषण देखील होते. याच आश्रम शाळांमध्ये अल्पवयीन मुली गरोदर राहिल्याच्या घटना नव्या नाहीत. तर, राजरोस मुले अन्नातून आळया बाहेर काढून पाण्यासारख्या भाजीत भाकरी चुरून खातात. पण करणार काय.! शिकण्याची आवड आहे पण शिकवायला कोणाला सवड नाही. लाखो नव्हे.! कोटी रुपयांचे आनुदान येते पण, शाळा आजही गळते, मुलांना धड अन्न नाही, ज्याची त्याची टक्केवारी शाबीत आहे, शिक्षक जातीयवाद करण्यात दंग आहे. शाळा टिकाव्यात म्हणून अफरातफर सुरू आहे. अनुदानावर भुजंग बसले असून मुले उपाशी आणि नेत्यांच्या पोळ्या भाजत आहे. त्यामुळे, दुर्दैवाने फक्त मतांसाठी आदिवासी समाजाचा पुळका दाखवायचा. मात्र, त्यांच्या अंगावर अजून देखील अंगभर कपडा नाही, त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा देखील पुर्ण होत नाहीत. याकडे कोणीतरी उघड्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे.