उरुसत नाचताना धक्का लागल्याने दोन गटात तलवारीने वार व चाकुने भोकसा भोकशी.! संगमनेर शहरात सहा जणांवर गुन्हे दाखल.! हाफ मर्डर..!!!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                     उरुसमध्ये नाचताना धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्याची खुन्नस काढण्यासाठी दुसऱ्या दिवशी दोन गट एकमेकाला भिडले. त्यामुळे, किरकोळ कारणाचे रुपांतर मोठ्या वादात होऊन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. तर, तरुणांमध्ये फिल्मी स्टाईलने हाणामाऱ्या झाल्या. यात 18 वर्षीय तरुणावर तलवारीने वार केले तर 20 वर्षीय तरुणावर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना संगमनेर शहरातील अलकानगर परिसरात दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये अल्तामश पिंजारी, जुनेद शेख, फरदीन अन्सार शेख,आयान सादिक शेख (सर्व रा.जमजम कॉलनी, ता. संगमनेर) तर फरहान शेख, अमन शेख (रा जमजम कॉलनी रा. संगमनेर) यांच्यावर परस्पर विरुद्ध आर्मक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. तर, संगमनेरात वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. कोठे पोलिसांना मारहाण होतेय तर कोठे पुढारी कायदा हातात घेतात. राजरोस चोऱ्या होत असून महिलांची मंगळसुत्रे हिसकवून नेली जात आहेत.  अवैध धंद्यांना उत आला असून भरदिवसा शहरात नंग्या तलवारी नाचू लागल्या आहेत. वारंवार कायदा व सुव्यवस्था वेशिवर टांगला जात असून अद्याप गोहत्या मोठ्या प्रमाणावर सुरुच आहे. त्यामुळे, संगमनेरचे गुन्हेगारी ग्रहण कधी सुटणार? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना उपस्थित केला आहे.      

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फरदीन अनिस शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून दि. 18 ऑगस्ट 2022 रोजी निमोण येथे मोठा उरूस होता. तेथे फिर्यादी फरदीन शेख बरोबर त्याचा मित्र आयान शेख व इतर मित्र दुपारी 3 वाजता निमोण येथील उरूसमध्ये गेले होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उरूसमध्ये नाचताना आरोपी अमन शेख याचा धक्का फिर्यादी फरदीनला लागल्याने फरदीन म्हणाला की, माझ्या अंगावर येऊन मला धक्का देऊ नको. त्यामुळे, आरोपी अमन शेख यास राग आला आणि त्याने फिर्यादी फरदीन व त्याच्या मित्रास हाताने मारहाण केली. मात्र, फरदीन याने सामंजस्याची भुमिका घेत भांडण मिटवून सर्वजण घरी आले होते. दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 9: 30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी फरदीन व त्याचा मित्र आयान याच्या मोटारसायकलवर चहा पिण्यासाठी आयानच्या घरापासुन निघाले आणि अलकानगर येथे आले होते. तेव्हा त्यांच्या गाडीचे पेट्रोल संपल्याने गाडी अलकानगरमध्ये बंद पडली. फिर्यादी फरदीन व त्याच्या मित्र गाडी चालु करण्याचा प्रयत्न करत असताना त्याच वेळी आरोपी फरहान शेख व अमन शेख हे दोघे फिर्यादी फरदीन यांच्या जवळ आले. त्यावेळी आरोपी फरहानच्या हातात तलवार आणि आरोपी अमनच्या हातात हॉकीस्टीक होती. 

          आरोपी फरहान आणि अमन यांनी उरूसमध्ये झालेल्या वादाचा कड काढण्यासाठी फिर्यादी फरदीन व त्याचा मित्र आयान यास मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी फरदीन व आयान यांनी गाडी सोडुन पळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आरोपी फरहान याने त्याच्या हातात असलेल्या तलवारीने फिर्यादी फरदीनचा मित्र आयान याच्या पायावर तलवारीने वार केला. तो जमिनीवर पडताच आरोपी फरहान व आमन या दोघांनी हॉकीने लथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. फिर्यादी फरदीन मित्राला सोडवण्यासाठी गेला असता आरोपी आमनने फिर्यादी फरदीनला हॉकी स्टिकने डोक्यावर, खांद्यावर, मानेवर मारहाण केली. यात फरदीन व त्याचा मित्र जागीच रक्तबंबाळ अवस्थेत पडले. दरम्यान हा प्रकार आयान याच्या नातेवाईकांनी पाहिला असता त्यांना जखमींना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. फिर्यादीच्या जबाबा वरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी फरहान शेख, अमन शेख (रा.जमजम कॉलनी.ता. संगमनेर) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस नाईक गायकवाड करत आहे.

            दरम्यान, अमन इम्रान शेख याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की; दि.18 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास निमोण येथील आशापीर बाबा यांच्या उरूसानिमित्त फिर्यादी अमन सात ते आठ मित्रांबरोबर उरुसला गेलो होता. तेथे गर्दीत चालत असताना आरोपी फरदीन याला फिर्यादीचा मित्र फैजान याचा धक्का लागल्याने तेथे बाचाबाची केली. दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 9:30 वाजता अलकानगर येथे  अमन याचे काका मेडीकलमध्ये काम करत असताना फिर्यादी अमन याचा मित्र मोमीन पठाण आला व म्हणाला की, तु येथुन निघुन जा बाहेर तुला काही मुले शोधत आहे. त्याचवेळी अमन याच्या मोबाईलवर अल्तामश पिंजारी याचा अमनला फोन आला. तो म्हणाला की, तु कुठे आहे. मला तुला भेटायचे आहे. तेव्हा अमन म्हणाला की, मी घरी चाललो आहे. असे म्हणून फिर्यादी अमन रात्री 9 :45 च्या सुमारास अलकानगर येथील इलेक्ट्रॉनिक डीपी समोरून पायी घरी जात होता. तेव्हा अचानक फिर्यादी अमन समोर आरोपी आयान शेख, फरदीन शेख, अल्तामश पिंजारी व जुनेद शेख आले. यावेळी आरोपी अल्तामश पिंजारी व जुनेद शेख यांच्या हातात लाकडी दांडके होते. तर, आरोपी आयान व फरदीन याच्या हातात चाकू होते. 

                दरम्यान, आरोपी फरदीन हा अमन याला म्हणाला की, तुला फार माज आला होता. तुझा मित्र फैजान कुठे आहे. असे म्हणुन फिर्यादी अमनला शिवीगाळ करू लागला. तेव्हा फिर्यादी अमन म्हणाला की काल आमच्याकडून कुठल्याही प्रकारचा धक्का लागला नव्हता. असे म्हणताच आरोपी फरदीन याने त्याच्या हातातील चाकूने फिर्यादी अमन याच्या उजव्या हातावर चाकुने वार केला. आरोपी अल्तामश व जुनेद याने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादी अमन यास मारहाण करण्यास सुरवात केली. त्याचवेळी आरोपी आयान फिर्यादी अमनला म्हणाला की, तुला आता जिवंत सोडत नाही. असे म्हणुन आरोपी आयान याने फिर्यादी अमन याच्या पोटास डाव्या बाजूने खुपसुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी अमनच्या हातातुन व पोटातुन मोठ्याप्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्यावेळी तेथे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. फिर्यादी अमन याचे नातेवाईकांनी रक्तबंबाळ पडलेल्या अवस्थेतुन अमनला उचलुन खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. फिर्यादीच्या जबाबावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात आरोपी अल्तामश पिंजारी, जुनेद शेख,फरदीन शेख, आयान शेख (रा.जमजम कॉलनी. ता. संगमनेर) यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहे.