अकोले-संगमनेरात पांगरमल हत्याकांडाची पुनरावृत्ती.! बनावट दारुवर वरदहस्त कोणाचा.! तडजोडे साहेब.! मोक्का अंतर्गत कारवाई करा.!

 


- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले/संगमनेर) :- 

संगमनेर तालुक्यात गेल्या कित्तेक दिवसांपासून बनावट दारुचे कारखाने सुरू आहेत. त्यांनी अनेकांचे बळी देखील घेतले आहेत. मात्र, यांना भल्याभल्या राजकीय व्यक्तींनी पाठीशी घालण्याचे काम केले आहे. संगमनेरात वाळु तस्कारांनी भर दिवसा आणि खुलेआम सामान्य मानसांना चिरडून वाळुतस्करी केली जाते. शहराच्या मध्यवर्ती भागात आजही हाय प्रोेफाईल वेश्या व्यावसाय केला जातो. या अवैध धंदेवाईकांना कोणाचे बळ आहे? अर्थात खादीच्या कपड्यांचे.! हे स्तोम केवळ संगमनेर तालुक्यापुरते मर्यादीत राहिले नाही. तर, अकोले तालुक्यात देखील पसरले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी खटपटनाका येथे अगदी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बालाजी वाईन शॉॅपीवर रेड पडली होती. चक्क तेथे बनावट दारुचा कारखाना चालविला जात होता. तर संगमनेर येथील रायते परिसरात जो छापा टाकला त्यात १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यातील आरोपी सुरेश मनोज कालडा व त्याचा भाऊ शिवा मनोज कालडा या मुख्य व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. तर, याचे अकोले शहरात रासने कॉम्पलॅक्स येथे देखील दुकान असून त्याचा परवाना रद्द करावा अशी मागणी शेतकरी पुत्र सुरेश नवले व अन्य  समाजसेवकांनी केली आहे. दुर्दैव असे की, पैशासाठी लोकांच्या जिविताशी खेळणे हे कितपत योग्य आहे? विशेष बाब म्हणजे राज्यउत्पादन शुल्क अधिकार्‍यांच्या वरदहस्ताने अजून किती लोकांचा जीव जाणार आहे? की, अकोले संगमनेरात पांगरमल हत्याकांडाची पुनरावृत्ती करायची आहे? असा प्रश्‍न नागरिक उपस्थिती करु लागले आहेत. 

संगमनेरची लत अकोल्याला.!!

खरंतर, संगमनेर तालुक्याची विकासात्मक आणि राजकीय जितकी व्याप्ती आहे. तितकीच गुन्हेगारी प्रवृत्तीची देखील आहे. येथे पुणे, मुंबई, नगर अशा ठिकाणी होणारे हाय प्रोफाईल गुन्हे संगमनेरात घडत आहेत. मात्र, हा अवैध माज आला कोठून? याचे आत्मचिंतन नागरिकांनी करणे अपेक्षित आहे. तर, संगमनेर तालुक्यामुळे अकोले तालुक्यात देखील तीच लत लागु पहात आहे. कारण, गेल्या कित्तक दिवसांपासून संगमनेरात वेश्या व्यावसाय करणार्‍या व्यक्ती आठवड्यातून दोन दिवस अकोल्यासाठी राखून ठेवतात. संगमनेर तालुक्यातील बनावट दारु ही अकोल्याच्या दारुड्यांना पुरविली जाते, संगमनेरचे मटका किंग अकोल्यात रुजू झाले आहेत, अगस्ति थेटर आणि अन्य काही ठिकाणी अद्याप देखील संगमनेर तालुक्यातून गांजाचा पुरवठा होतो आहे. इतकेच काय.! संगमनेरचे काही अधिकारी, बिल्डर आणि नेते यांनी अकोल्यातील जमिनी देखील अवैध रित्या हडप केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, अगदी कालपर्यंत विचारांनी, चळवळीने आणि धाकले-थोरले म्हणणारे तालुके आज मोठा छोट्या भावाला अवैध मार्गाला नेतोय की काय? असा प्रश्‍न सुज्ञ नागरिक करीत आहे.

संगमनेर-अकोल्याचे पांगरमल.!

अहमदनगर तालुक्यातील पांगरमल हत्याकांड सर्वांना प्रचलित आहे. यात राजकीय पुढार्‍यांनी सामान्य मतदारांना घशात बनावट दारु घातली आणि १३ जणांचे बळी गेले तर ८ जण आधु झाले होते. ही दारु चक्क जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये बनविली जात होती. बनावट दारु तयार करताना इथेनॉलचे प्रमाण जास्त झाले आणि किड्या मुंगीसारखे लोक तडफडून मरुन पडले तर काही कायमचे आधु झाले होते. आज देखील असेच होत आहे, लोक बनावट दारु पितात आणि झिजून-झिजून मरता. कोणाची किडणी खराब होते तर कोणाला पोटाचे विकार होतात, कोणाच्या मेंदुवर परिणाम होतो तर कोणी कॅन्सरचा बळी ठरतो. त्यामुळे, आजवर जे लोक मयत झाले आहे. त्यांची आकडेवारी पहाता वार्षीक १५० पेक्षा कमी नाही. म्हणून बनावट दारु विक्रेत्यांवर पहिल्यांदा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. अकोले-संगमनेरात असे कित्तेक तरुण आहेत. जे दारुच्या आहारी गेले आहेत. त्यांना कमी पैशात अधिक नशा देणारी दारु मिळते. तर, याच बनावट कारखान्यांमधून खेडोपाडी मद्याचे वितरण होते. कमी रकमेत स्वस्त साठा मिळाल्याने किरकोळ विक्रीवाला देखील जास्तीत जास्त ग्राहक तयार करतो. एव्हाना तो मृत्युला निमंत्रण देत असतो. त्यामुळे, किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा असे कारखाने उध्वस्त करणे अपेक्षित असते. मात्र, दुर्दैवाने राज्य उत्पादन शुल्क यांना त्यांचे उत्पादन मिळते. त्यामुळे, झाकली मुठ सव्वा लाखाची या म्हणीप्रमाणे ते आपली भुमिका पार पाडतात. तर, पोलिसांना कारवाईचा अधिकार नसला तरी त्यांच्यात अर्थपुर्ण तडजोडी होत असल्याने तुमचे बिहार होऊ नाहीतर  पांगरमल त्यांना काही घेणेदेणे नसते..!!

दारु पिला की फाशी घेतो.!

अकोले शहरात १५ ऑगस्टच्या दिवशी समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांच्यासह अनेकांनी शाहुनगर परिसरात आंदोलन केले होते. दुर्दैवाने भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, येथील गोरगरिबांची गुलामगिरी कमी झाली नाही. हाताला रोजगार नाही, चांगले शिक्षण नाही, ना आरोग्य ना निवारा त्यामुळे पुरक विचारसारणी नाही. परिणामी मरत नाही म्हणून जगायचे आणि व्यसनाधिन होऊन आयुष्य मृत्युच्या दारात लोटायचे. अक्षरश: सर्वात जास्त बळी हे शाहुनगर परिसरात गेले आहेत. त्यामुळे, शहरातील बेकायदेशिर दारु बंद करा अशा प्रकारची मागणी नागरिकांनी केली आहे. तर आणखी एक विशेष म्हणजे, अकोल्यातील निब्रळ हे एक छोटंसं गाव आहे. मात्र, तेथे देखील जुगार, मटका आणि अवैध दारुचा सुळसुळाट झाला आहे. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. की, तालुक्यात कोठे नव्हे इतक्या निब्रळ येथील मद्यपी लोकांनी फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. तर, महिलांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे काम दारु करते आहे. यावर प्रतिबंध म्हणून तेथील नागरिकांनी गेल्या आठवड्यात प्रशासनाला कारवाईचे साकडे घेतले आहे. पण, आपण दोघे भाऊ मिल बॉंट के खाऊ.! कोणी कारवाई करायला धजत नाही. परिणामी या तालुक्यात एकदा तरी पांगरमल हत्याकांड झाल्याशिवाय राहणार नाही असे मत नागरिक व्यक्त करीत आहे. हे थांबविण्यासाठी जागरुकता आणि प्रत्येक बेकायदेशीर दारु विकणार्‍यांवर मोक्का अंतर्गत कारवाई होणे अपेक्षित आहे.