बाळासाहेब थोरात यांच्या भावाचा पिंपरणे गावात पिस्तूल घेऊन राडा, डॉक्टरच्या डोक्याला पिस्तूल रोखला.! 65 जणांवर संगमनेरात गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे जोर्वे गावातील गाव गुंडांनी एका डॉक्टरच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये 50 ते 60 लोक डॉक्टरांच्या घरासमोर हातात लोखंडी रॉड, कोयते, कुऱ्हाडी घेऊन उभे होते. यामधील सुरेश थोरात यांनी डॉक्टरच्या डोक्याला पिस्तुल लावला व म्हणाला की, तुझा भाऊ पत्रकार कुठे आहे. तो जास्त माजलाय तुमच्या घरातला कोणी पण जोर्वे गावात दिसल्यास त्याच्या खांडोळ्या करून नदीत फेकुन देईल. आमच्या नादाला लागले तर तुमचा काटाच काढतो अशी जीवे मारण्याची धमकी दिली. धक्कादायक घटना गुरुवार दि.18 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये आरोपी सुरेश जगन्नाथ थोरात, योगेश शांताराम जोशी उर्फ पप्पु गुरू, भाऊसाहेब बाबुराव दिघे, सुनील जगन्नाथ थोरात, मुकेश विठ्ठल काकड (सर्व रा. जोर्वे ता. संगमनेर) व अन्य 50 ते 60 लोकांवर फिर्यादिनुसार तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. विवेक चत्तर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, काल दि. 18 ऑगस्ट 2022 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विवेक चत्तर हे जनावरे तपासण्यासाठी जोर्वे येथे गेले होते. त्यावेळी फिर्यादीच्या वडीलांनी विवेक चत्तर यांना फोन करून कळविले की 50 ते 60 लोक घरी येऊन धमकावत आहे. संपूर्ण भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तेव्हा तु लवकर घरी ये. असे फोनवर बोलल्याने फिर्यादी विवेक चत्तर हे ताबडतोब घरी गेले. घरी जाताच घरासमोर 50 ते 60 लोक हातात लोखंडी रॉड, कोयते, कुऱ्हाडी हातात घेऊन घरासमोर उभे होते. तेव्हा फिर्यादी विवेक चत्तर यांनी विचारले की, तुम्ही येथे काय करता.? तेव्हा आरोपींनी हे फिर्यादी चत्तर यांना शिवीगाळ करून दमदाटी करु लागले. आरोपी हे विवेक चत्तरवर धाऊन जाताच चत्तर घाबरून घरात पळाले. त्यावेळी घरामध्ये सुरेश थोरात हातात पिस्तुल घेऊन उभे होते. हे पाहताच फिर्यादीची आई व भावजई मोठ-मोठ्याने रडत होती व आरोपी सुरेश थोरात यांच्या हातापाया पडत होती.
दरम्यान, आरोपी योगेश जोशी व भाऊसाहेब दिघे यांनी विवेक चत्तर यांना घरात जाऊन पकडले. तेव्हा सुरेश थोरात यांनी फिर्यादी विवेक चत्तर यांच्या डोक्याला पिस्तुल लावला आणि म्हणाले की, तु आणि तुझा भाऊ स्वानंद चत्तर अशा दोघांना जीवे मारून टाकीन अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. तर तुझा भाऊ पत्रकार कुठे आहे.? तो जास्त माजलाय, तुमच्या घरातला कोणीपण जोर्वे गावात दिसल्यास त्यांच्या खांडोळ्या करून नदीत फेकुन देईल. आमच्या नादी लागले तर तुमचा काटाच काढतो. असे म्हणून फिर्यादी विवेक चत्तर यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी सुरेश थोरात व मुकेश काकड यांनी घरात येऊन फिर्यादीची आई, भावजई व अंध वडील यांना शिवीगाळ करून धक्काबुकी केली व जाताना म्हणाले की तुझ्या पत्रकार भावाला गोळ्या घालु असे म्हणून ते निघुन गेले. मात्र, विवेक चत्तर याने थेट तालुका पोलीस ठाणे गाठले व घडलेली कैफियत पोलीस ठाण्यात सांगितली यावरून आरोपी सुरेश जगन्नाथ थोरात, योगेश शांताराम जोशी उर्फ पप्पु गुरू, भाऊसाहेब बाबुराव दिघे, सुनील जगन्नाथ थोरात, मुकेश विठ्ठल काकड (सर्व रा. जोर्वे ता. संगमनेर) व अन्य 50 ते 60 लोकांवर तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे करत आहे.
दरम्यान, माजी महसुलमंत्री आ. बाळासाहेब थोरात साहेबांनी राहाता मतदार संघासाठी तथा कट्टर विरोधक राधाकृष्ण विखे यांना शह देण्यासाठी जो चेहरा जनतेच्या समोर आणला ज्यांच्यावर २०१९ साली शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार म्हणून जबाबदारी दिली तोच चेहरा गावात भांडण करत असेल, पिस्तुल लावुन जीवे मारण्याच्या धमक्या देत असेल, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ यांना ठार मारण्याच्या धमक्या देत असेल. तर, यामध्ये आ. थोरात साहेबांची प्रतिमा मलीन होत असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. दुर्दैव इतकेच की, राजकारण्यांनी केली ती मस्ती आणि सामान्यांनी केला तो दंगा ! आशा पद्धतीने लोकशाही सांगणाऱ्या आणि मानणाऱ्या तालुक्यात लोकप्रतिनिधींच्या भावाकडूनच हुकुमशाही आणि प्रशासनावर दडपशाही अवलंब केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्यामुळे, सुरेश थोरात यांचा चेहरा शिर्डी मतदारसंघात लॉन्च केला आहे. त्यांच्याकडून अशा घटना पक्षाला देखील चिंतन करायला लावणाऱ्या आहेत. असे पक्षांतर्गत कार्यकर्ते चर्चा करु लागले आहेत. तर, या प्रकरणात कायदेशिर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता फिर्याद दाखल झाली आहे. यात काय खरे आणि काय खोटे.? हे पोलीस शोध घेतील आणि जो कोणी दोषी असेल. त्यास न्यायालयात शिक्षा होईलच आणि अन्याय झाला असेल त्याला न्याय मिळेल. तोवर वेट & वॉच..!!!