पिचड आणि भांगरे एक पारंपारीक लढत.! कोण विजयी होणार? इतिहास असे सांगतो, बापाच्या पराभवाचा बदला लेक घेणार का?


- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

 अगस्ति सहकारी साखर कारखान्याची निवडणुक सध्या स्थगित झाली आहे. मात्र, तरी देखील येत्या आठवडाभरात कारखाना गुलालाने भरलेला पहायला मिळेल. अर्थात या निवडणुकीत सर्वात मोठी लढत आहे. ती म्हणजे, मा.मंत्री मधुकर पिचड आणि मा.जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक भांगरे यांच्यात. या दोघांनी 1980 साली एकमेकांच्या विरोधात विधानसभेत दंड थोपटले. ते 2019 पर्यंत. आता कोठे वाटले होते. दोघे कट्टर विरोधक थांबून घेतील आणि त्यांच्या पुढील पिढ्यांमध्ये संघर्ष पेटेल. मात्र, तसे झाले नाही. पिचड साहेब शेवटची निवडणुक म्हणून रिंगणात उतरले आणि क्षणाचाही विलंब न करता भांगरे साहेबांनी देखील कपाळाला माती लावली. खरंतर, पिचड साहेबांना पराभूत करणारा एकच पहिलावान होता, तो म्हणजे स्व. यशवंतराव भांगरे. त्यांच्यानंतर त्यांच्या भावाने आणि मुलाने तर 42 वर्षे जिकरीने संघर्ष केला. मात्र, यश आले नाही. का? तर, पिचड साहेबांच्या पाठीशी पवार आणि काँग्रेस-राष्ट्रवादी नावाचे अभेद्य असे वलय होते. मात्र, जसे पिचड कुटुंब या चक्रव्युव्हातून बाहेर पडले. त्या क्षणी त्यांना 2019 साली पराभव पत्कारावा लागला. तर, जिल्हा बँकेत देखील माघार घ्यावी लागली. तेव्हापासून पराजयाचा झेंडा त्यांच्या हाती पडला आहे. केवळ मतांचे विभाजन हिच एकमेव जमेची बाजू घेऊन विजय पताका फडकविणारे पिचड पुन्हा विजयी होतील का? याकडे मात्र, संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

पिचड साहेबांचा पराभव.!

तो काळ 1977 चा तो काळ होता. शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये उद्योगमंत्री असताना 40 आमदार फोडून बंडखोरी केली आणि बाहेर पडून जनता जलाचे 90 आमदार घेऊन पुलोद सरकार स्थापने केले. पण, दरम्यानच्या काळात 1979 साली महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून पुलोद सरकार बरखास्त केले व 1980 ला अशोक भांगरे यांचे पिताश्री आदरणीय यशवंत भांगरे याचा परभाव करून मधुकर पिचड आमदार झाले. मात्र, हे अभ्यासत असताना 1977 साली झालेल्या निवडणुकीत मधुकर पिचड यांचा पराभव करून यशवंतराव भांगरे हे तिसर्‍यांदा अकोले तालुक्याचे आमदार झाले होते. त्यानंतर 1984 साली राजाभाऊ भांगरे यांनी पिचडांना शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कुचकामी ठरला. खर्‍या अर्थाने 1989 साली पिचड यांचे विरोधक म्हणून अशोक भांगरे यांचे नाव इतिहासाच्या पानावर लिहीले गेले. तेव्हा काशिनाथ साबळे यांचे नाव चर्चेत होते. पण, मा. आमदार गोपाळ भांगरे (1952) व यशवंतराव भांगरे यांच्या प्रचलित घराण्याचा अशोक भांगरे यांना वारसा होता. म्हणून कम्युनिष्ट, समाजवादी यांनी जनतादलाच्या सहकार्याने भांगरे यांच्या पाठीवर हात ठेवला. तेव्हा आज पिचड साहेबांना अचानक जाऊन मिळालेले ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, कारभारी उगले, शांताराम वाळुंज, मधुभाऊ नवले, गिरजाजी जाधव, काँग्रेसचे महाले यांनी एकत्र येऊन पिचडांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सगळ्या टिमला अपयश आले आणि पुन्हा पिचड साहेब 89 साली निवडून आले.                   

1995 ची निवडणुक

 1994 सालापर्यंत अगस्ति सहकारी साखर कारखाना उभा राहिला होता. या दरम्यानच्या काळात कारखान्याहून दादासाहेब रूपवते, भाऊसाहेब हांडे यांच्यासह अनेक बहुजन नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. असे बोलले जाते. की, चेअरमन पद त्यावेळी बहुजन समाजाकडे असावे अशी अनेकांची मागणी होती. मात्र, ती पुर्ण होत नव्हती. साहेबांची एकाधिकार शाही यामुळे, त्याकाळी भाऊसाहेब हांडे, सिताराम पाटील गायकर, यांचे पिचडांशी मतभेद झाले होते. पुढे विधानसभा तोंडावर येऊन ठेपल्या होत्या. त्याचाच फायदा घेत 1995 साली अशोक भांगरे यांनी संधीचे सोने करण्याचा डाव साधला आणि त्यांच्या विरोधात अपक्ष चिन्ह-घड्याळ घेऊन आखाड्यात उडी मारली. या दरम्यानच्या काळात निळवंडे धरणाचा प्रश्न मार्गी लागत होता. तेव्हा दशरथ सावंत हे मधुकर पिचड यांच्या सोबत होते. त्यांनी 1995 च्या निवडणुकीत पहिल्यांदा पिचडांचे सारथ्य केले. म्हणजे सखे सोबती, वैरी झाले. तर कट्टर वैरी सखे झाल्याचे राजकारण अकोल्याच्या मातीने अनुभवले. तिच परिस्थिती आज 2022 मध्ये दिसत आहे. फरक फक्त इतका आहे. की, तेव्हा समर्थक पिचड साहेबांना सोडून गेला होते आणि आज पिचड साहेब पक्षच सोडून गेले आहे. त्यामुळे, इतिहास फक्त उदाहरणांसाठी साक्ष देईल मात्र, त्याची पुनरावृत्ती होणे शक्य वाटत नाही. कारण, 27 वर्षात अकोले तालुका भौगोलिक दृष्ट्या जाग्यावर असला तरी येथील मतदार जगासोबत फार पुढे गेले आहे.

पिचड साहेबांचा पक्षबदल.! 

पुढे 1997 नंतर दोन वर्षात म्हणजे 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी हा नवा पक्ष काढला आणि मधुकर पिचड यांनी पवारांचे घड्याळ हातात बांधले. त्यावेळी, अशोक भांगरे यांनी पिचड साहेबांचा विरोधक म्हणून 1999 साली काँग्रेसमध्ये प्रवेश करून पंजावर निवडणूक लढविली. त्या 1999 च्या निवडणुकीत अशोक भांगरे यांना अवघ्या 22 शे मतांनी पराभव स्विकारावा लागला. इतकी जनता भांगरे यांच्या पाठीशी होती आणि पिचड साहेबांच्या विरोधात वातावरण होते. मात्र, भांगरे यांना कधी यंत्रणाचा धोका बसला तर कधी मतांचे विभाजन त्यांना घातक ठरले. अगदी अपवादात्मक 2019 प्रमाणे एक देखील निवडणुक नाही. ज्यात पिचड साहेबांना 60 हजार पेक्षा जास्त निव्वळ लिड आहे. मत विभाजन ही नस फक्त शरद पवार यांना माहिती होती. त्याचा वापर त्यांनी बरोबर 2019 च्या निवडणुकीत केला. पिचडांचा पराभव पाहण्यासाठी या तालुक्यातील त्यांचे हजारो व लाखो विरोधक असुसले होते. ते सिद्ध झाले असले तरी त्यात अशोक भांगरे यांचे योगदान फार मोठे आहे.

झुकेगा नाही साला

अकोल्यातील बर्‍यापैकी कम्युनिस्ट आणि काँग्रेस ही तडजोडीच्या राजकारणात बर्‍यापैकी पिचड साहेबांना फॉर झाली होती. अर्थात हे राज्याचे व देशाचे धोरण होते. या नेत्यांना सत्तेत अंशत: सहभाग मिळु लागला होता. त्यामुळे, काही झालं तरी अकोल्यात शिवसेने आणि शिवसैनिक हे तळागाळापर्यंत पोहचलेले आहेत. हिदुत्व म्हणा किंवा भगवे राजकारण. पिचडांचा पराभव हेच त्यांचे उद्दिष्ट्य होते. त्यामुळे, अशोकराव भांगरे यांनी 2004 साली शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हा देखील शिवसेनेच्या तिकीटावर त्यांनी पिचडांना शह दिला. मात्र, मतांची गोळाबेरीज झाली नाही. कधी दोन अडिच हजार तर कधी 20 ते 25 हजार मतांनी भांगरे यांना पराभवाला सामोरे जावे लागत होते. मात्र, तरी उभी हयात गेली तरी बेहत्तर.! पण, झुकेगा नाही साला याप्रमाणे ते कट्टर पिचड विरोधी म्हणून उदयाला आले होते. जनतेत त्यांना आज देखील सहानुभुती आहे. मात्र, त्यांच्या वाटेत मत विभाजने आणि कधी तात्रिक आडचणींनी नेहमी घात केला आहे. मात्र, गेल्या 40 वर्षेत पिचड कुटुंबाचे जसे 50 ते 60 हजार हे हक्काचे तथा माननारे मतदान आहे. तसे अशोक भांगरे यांचे देखील 25 ते 30 हजार मतदान विरोधात राहून देखील कायम आहे. यांना माननारा वर्ग देखील चांगला आहे. मात्र, त्यांच्या विधानसभेच्या यात्रेचे स्वप्न हा तालुका पुर्ण करु शकला नाही. ही दुर्दैवी बाब आहे. 

उभी हयात संघर्ष

पुढे अकोले तालुक्यात विधानसभेला विरोधक वाढत गेले. एकीकडे मधुकर तळपाडे यांनी पोलीस खात्याचा राजिनामा देत पिचडांशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पाठोपाठ डॉ. किरण लहामटे होते. दुसरीकडे मारुती मेंगाळ नावाचं वादळ नव्याने तालुकाभर भिरभिरू लागलं होतं, सतिष भांगरे यांनी मंदानात उडी घेतली होती. त्यामुळेे, आता अशोक भांगरे हे पारंपारीक विरोधक असेल तरी पिचड साहेबांना विरोधी उपफांद्या निर्माण होऊ लागल्या होत्या. खरंतर 2009 मध्ये शिवसेनेची उमेदवारी मधुकर तळपाडे यांनी थेट मातोश्रीहून आणली. ज्या दमाने ते आले होते. त्याच दमाने त्यांनी तालुक्यात वातावरण देखील निर्मण केले होते. कारण, येथे शिवसेनेच्या हक्काचे 40 ते 50 हजार हक्काचे मत पॉकीट होते. मात्र, निवडणुक झाल्यानंतर ज्या दमाने तळपाडे साहेब आले. त्याच दमाने ते पुन्हा मुंबईकडे रवाणा झाले. आता मात्र, त्यांनी तालुक्यात ठाण मांडले आहे. हेच काम तेव्हा केले असते तर ते आज आमदार नव्हे.! शिंदे किंवा ठाकरे गटाकडून मंत्री असते. तेव्हापासून भांगरे यांच्या देखील मतांची विभागणी होऊ लागली. तळपाडे यांच्या शिवसेना ऐन्ट्रीने अशोकराव भांगरे यांनी मनसेकडून निवडणुक लढविली. तेव्हा अकोल्यात तिरंगी लढत झाली. काही झालं तरी पिचडांच्या विरोधात उभे राहून त्यांना पराभूत करण्यासाठी भांगरे यांच्यासारखा संघर्ष उभी हयात कोणी केला नाही. 

एकास एक उमेदवार

 पुढे 2014 साली शिवसेना-भाजप युती झाली नाही. त्यामुळे शिवसेनेकडून मधुकर तळपाडे यानी उमेदवारी केली. पर्यायाने विचार जुळत नसले तरी चालेल. पण, पिचड साहेबांचा कोठे ना कोठे जाऊन पराभव करायचा. हेच धोरण भांगरे यांचे होते. त्यामुळे, त्यांनी पर्याय म्हणून भाजपात प्रवेश केला. त्यावेळी पुन्हा तिरंगी सामना उभा केला. हे सर्व वातावरण पिचड घराण्याला पोषक ठरत गेले आणि ते निवडून येत राहिले. हा विजयी रथ आता कोणी रोखू शकत नाही. यावर पिचड साहेब ठाम झाल्यानंतर त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचे बळ कशात आहे. हे शरद पवार साहेब जाणून होते. पिचड भाजपत आले मग दोन तलवारी एकाच म्यानात राहणे शक्य नाही. त्यामुळे, भांगरे साहेबांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पवार साहेबांनी भांगरे, मेंगाळ, तळपाडे, यांच्यासह सगळ्यांना थांबण्याची विनंती केली. जोवर तुम्ही पिचडांचा पराभव करीत नाही. तोवर एकाही व्यक्तीला राजकीय भविष्य नाही. त्यामुळे, या सर्वांना थांबविण्यात आणि स्वत: थांबून घेण्यात अशोकराव भांगरे यांचा फार मोठा वाटा आहे. अखेर एकास एक करुन सगळ्यांनी पिचड साहेबांचा पराभव केला. यात बर्‍याच व्यक्तींचे श्रेय्य असले तरी भांगरे यांचा वाटा सर्वाधिक आहे. शेवटपर्यंत त्यांनी पिचड समर्थनास साद दिली नाही. हारलो तरी चालेल पण माघार नाही. ही भुमिका त्यांनी सलग 42 वर्षे घेतली आहे.

फक्त एकदा सहकार्य करा.!

गेली 42 वर्षे मी पिचड विरोधी संघर्ष केला. मला कधी पुर्ण यश आले नाही. आता ही माझी शेवटची निवडणुक आहे. त्यामुळे, मला आपण सहकार्य करावे. जोवर पिचड पक्षाशी एकनिष्ठ होते, तोवर तुम्ही त्यांना साथ दिली. पण, आता ना विचारधारा राहिली ना निष्ठा. तालुक्याच्या विकासासाठी, शेतकर्‍यांच्या हितासाठी, कारखाना टिकविण्यासाठी, पवार कुटुंबाला बळ देण्यासाठी, ज्यांनी गद्दारी केली त्यांना धडा शिकविण्यासाठी एकदा तरी माझ्या पदरी कौल द्यावा. उभी हयात त्यांनी तुम्ही विजयी केलं, आता एकदातरी माझा विचार मतदार करतील. माझी देखील शेवटची निवडणुक आहे. कारखान्यातील आदिवासी बांधवांनी मला शब्द दिला आहे. तो नक्की सार्थकी ठरेल. जनतेच्या अग्रहास्तव 2019 ला भांगरे कुटुंबाने निवडणुक लढविली नाही. पिचडांच्या विरोधात 9 वेळा मी संघर्ष केला आहे. अंतीम निवडणुकीत मला नक्की विजय मिळणार आहे. माझ्या प्रामाणिक पणाचे फळ मला कारखान्याच्या निवडणुकीत मिळणार आहे. 42 वर्षे केवळ विरोधक म्हणून मिरवत राहिलो. वेळ अशा होत्या तेव्हा पक्ष बदलण्यापलिकडे पर्याय नव्हता. पण, माझा संघर्ष पाहिला तर राजकारणामुळे, आयुष्यात खूप काही गमविले आहे. त्यामुळे, ही अंतीम निवडणूक असून त्यात मला यश येईल. इतकी मला खात्री आहे.

- अशोकराव भांगरे (रा. काँ. ज्येष्ठ नेते)