फक्त गायकर बदनाम करुन त्यांना संपविण्याचे हे षडयंत्र.! जे बापनं कमविलं ते पोराला नाही करता आलं.! ठरवा.! दडपशाहीला बळ द्यायचं का?

 


सार्वभौम (अकोले) :-

            2019 नंतर अकोल्यात परिवर्तन झाले. त्यावेळी लोकांनी कोणत्याही नेत्याचे, कोणत्याही व्यक्तीचे आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता राष्ट्रवादीला मतदान केले. यात काँग्रेस, शिवसेना, अंशत: भाजप, रिपाई, माकप, शेकप संगळ्यांनीच भुमिका घेतली. काही झालं तरी चालेल. पण, पिचड कुटुंबाची परंपरा खंडीत करायची. जनतेने घेतलेला निर्णय सार्थ ठरला आणि भाऊंचा पराभव झाला. त्यानंतर, त्यांच्या गटातून एकएकजण बाहेर पडले. त्यात सर्वात मोठा झटका म्हणजे सिताराम पाटील गायकर यांची घरवापसी जिव्हारी लागली. आम्ही त्यांना काय कमी केलं? हा प्रश्न पुढे आला तेव्हा पवार कुटुंबाने त्यांना काय कमी केलं? याचे आत्मचिंतन त्यांच्याकडून झाले नाही. परिणामी हर हालतमध्ये गायकर यांचे राजकारण संपवायचे, त्यांना बदनाम करायचे, त्यांचे वस्त्रहरण करायचे. यासाठी नाना प्रकारचे षडयंत्र आखले गेले. मग कधी पिंपळगाव खंड धरणाला आग लावली, कधी ऐज्युकेशन सोसा. आग लावली, कधी नगरपंचायतीत धोतराची मिरवणुक काढली, कधी त्यांच्या पतसंस्थांच्या चौकशी सुरू केल्या, कधी कारखान्यात त्यांच्यावर मानसे सोडली. इतक्या निच पणाचे राजकारण उभ्या आयुष्यात माजी.मंत्री पिचड साहेबांनी देखील कधी केले नव्हते. तितके भाऊंच्या काळात होऊ लागले आहे. इतक्या द्वेशाचे राजकारण त्यांना आयुष्यभर कधी आमदार करणार नाही. जे बापानं कमविले ते लेकाला जमनार नाही. त्यामुळे, केवळ काही झालं तरी गायकर बदनाम करायचे आणि त्यांचे राजकारण संपवायचे.! असली भूमिका येथील बहुजन समाज कधीच खपवून घेणार नाही. त्यामुळे, भाजपने याला राजकीय लढाई नव्हे.! तर, बहुजन समाजाला उध्वस्त करण्याचे षडयंत्र आखले आहे. हेच येथील जनतेने लक्षात घ्यावे. कारण, उभ्या आयुष्यात तालुक्याचा विकास झाला नाही. पण, ज्या संस्था-पतसंस्था बहुजनांना काढल्या त्या मोडीत निघाल्या तर लोक जातील भिवंडीला निघुन. तुम्ही अन्नासाठी महाग झाल्याशिवाय राहणार नाही असे मत कचरूपाटील शेटे यांनी व्यक्त केले आहे.

खरंतर, आम्ही 1983-84 पासून राजकारणात सक्रिय झालो. काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी त्यानंतर कोणत्या पक्षाच्या विचारधारा आम्हाला कधी आपल्याशा वाटल्या नाही. पण झक मारली अन पिचड साहेबांमुळे गायकर साहेबांना भाजपच्या प्रवाहात जावे लागले. त्यांच्या पाठोपाठ आम्ही देखील मंडळी चालते झालो. पण, ते सुड बुद्धीचे विचार, नको त्या जयंत्या ज्या लोकांची नावं देखील आम्हाला माहित नाही. त्यांना हार तुरे वहात बसलो. फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र त्यामुळे, तो विचार काही आम्हाला पटला नाही. त्यानंतर गायकर साहेब राष्ट्रवादीत आले आणि आम्ही देखील स्वगृही परतलो. पण, पिचड पिता-पुत्राला त्याचा इतका झटका आला. की, त्यांनी थेट गायकर साहेबांना टारगेट केले. अर्थात भाजपचे विचार आणि रणनिती कशी आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, इकडे आल्यानंतर भाजपच्या लोकांनी पहिल्यांदा त्यांची बदनामी सुरू केली. पिचड साहेबांनी त्यांना काय कमी केले होते? पण, त्यांच्याकडे राजकीय प्रगल्भता नव्हतीच.! त्यामुळे, त्यांनी स्वत: विचार केला नाही. की, राष्ट्रवादीने 1980 पासून ते 2019 पर्यंत काय कमी केले होते? मंत्री, कॅबिनेटमंत्री, विरोधी पक्षनेता, पक्षाध्यक्ष असे अनेक पदे दिली. मग अचानक काय झाले? असो ते सर्वांना माहित आहे. पण, जे स्वत:भोवती झाले.! तेच त्यांनी इतरांभोवती सुरू केले. चौकशा आणि बारा भानगडी. हे असले राजकारण अकोल्यात चालत नाही. मग अशोकराव भांगरे देखील भाजपत होते. त्यांनी कधी कोणत्या पतसंस्था आणि अन्य संस्थांच्या चौकशा लावल्या नाही. इतकं गलिच्छ राजकारण अकोल्यात शिजत असेल तर जनतेने विचार केला पाहिजे. येथे भाजपला बळ द्यायचे की नाही?

खरंतर, राजकारण गेलं चुल्हात.! पण, एखाद्या व्यक्तीविषयी इतका द्वेष का असावा? हे समजत नाही. याच गायकरांनी यांना आमदार, मंत्री करण्यास हातभार लावला. त्यांनी पवारांना दगा दिला हे दिसत नाही पण दुसर्‍याचा दगा देणे कसे अचुक दिसते. राजकारणात हे चालुच असते. आता काल उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात गळा घालुन रडणारे आज शिंदे गटात जाऊन मिळालेे. ह्या राजकीय गोष्टी आहेत. मात्र, इतका व्यक्तीद्वेष या तालुक्याने कधी पहिला नाही. नगरपंचायतीला जेव्हा भाजपची सत्ता आली. तेव्हा, विजय साजरा करण्यासाठी यांनी अक्षरश: प्रतिकात्मक धोतर उडवून जल्लोष साजरा केला. इतका नंगानाच.! या तालुक्याने कधी पाहिला नाही. म्हणजे, कोणत्याही परिस्थितीत गायकर बदनाम झाले पाहिजे, त्यांच्या आब्रुची लक्तरं वेशिवर टांगण्याचे काम भाजपने केले आहे. ही धोतरं उडविणारे आज कारखान्याला भाजपाला जाऊन मिळाले आहेत. म्हणजे, हे आजचे नव्हे.! नगरपंचायतीपासून यांच्या काही गोष्टी पुर्वनियोजित होत्या. फक्त, तू मारल्यासारखे कर आणि मी रडल्यासारखे करेल. अशी यांची नौटंकी समोर येऊ लागली आहे. फक्त तालुक्यातील सुज्ञ नागरिकांनी विचार करायचा आहे. की, एखाद्याची आब्रु चव्हाट्यावर मांडणे, संस्थांच्या चौकशा लावून इडी सरकारच्या धमक्या देणे अशा प्रवृत्तींना पाठबळ द्यायचे आहे का?

होय.! गायकरांना बदनाम करण्याचे व संपविण्याचे हे षडयंत्रच आहे.! पहिली गोष्ट म्हणजे, महात्मा फुले चौकात धोतर उडविणारा व्यक्ती हा कोणाचा कट्टर समर्थक आहे? आणि आत्ता कोणी भाजपला पाठींबा दिला आहे? याची सुज्ञ लोकांनी शहनिशा करावी. दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा परिवर्तनाच्या नावाखाली गाव-गाव पिजले जात होते. तेव्हा पिचड साहेबांवर फार कोणला बोलु वाटत नव्हते. पण, गायकर साहेबांवर व्यक्तीगत टिका टिप्पणी करण्यात आली. नको-नको त्या शब्दांचा वापर केला. केवळ, स्वत: नामानिराळे राहून दुसर्‍यांकडून विकृत बोलणे व कामे करुन घेण्यात आली हे देखील जनतेने आठविले पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे, पिंपळगाव खांड धरणात पिचड साहेब पडद्याआड होते. पण, किटल्या इतक्या गरम होत्या. की, कवडीचे योगदान नसणारे म्हणजे आम्ही वेळ आली तर जेलमध्ये जाऊ. मग आता कोठे गेले ते आंदोलन आणि कागदी आंदोलक? पण, फक्त मुळा पट्ट्यातून गायकर यांना विरोध करायचा, जनतेची माथी खोटीनाटी माहिती गळी उतरवायची? अशाने कोतुळेश्वर यांना माफ करेल का? तेथे देखील फक्त गायकरांना बदनाम करणे हाच मुळ हेतू होता. पण जनता काही दुधखुळी नाही. संबंध मुळा परिसर गायकर साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. चौथी गोष्ट म्हणजे, जनता काही साथ देत नाही म्हणून यांनी कारखान्याची चौकशी लावली. यांनी जनुकाय सगळा भ्रष्टाचार केला आहे असा अविर्भाव मिरविला आणि मोक्कार पत्रकार परिषदा घेऊन कारखाना कडेलोटाच्या भाषा केल्या. दुर्दैव त्यांचे की कारखाना बंद पडला नाही. शेवटी कारखाना आणि गायकर हे एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. हे जनतेने आणि परिस्थितीने देखील दाखवून दिले. तर, पाचवी गोष्ट म्हणजे, अगस्ति ऐज्युकेशन सोसा.आंदोलनात काही लोक प्रामाणिकपणे आंदोलन करीत होती. मात्र, काही नव्याने उदयाला येऊ पाहणारे नेते आणि जेष्ठ नेते हे त्यास सामिल झाले. जोवर गायकरांचा राजिनामा येत नाही. तोवर हे बहाद्दर मंडपात भाषणं ठोकत होत. अन राजिनामा झाल्यानंतर हे कोठे गायब झाले? तहसिलवर आंदोलन झाले तेव्हा कोठे गेले होते हे परिवर्तन करणारे महाशय? परंतु, केवळ गायकर संपले पाहिजे, त्यांचे राजकीय अस्तित्व संपले पाहिजे आणि राजुरच्या घशात सगळ्या संस्था घालण्याचा घट दोघा-तिघांनी घेतला आहे. शेवटी गायकरांना संपविण्याच्या नादात दमून गेलेली टोळी पुन्हा भाजला जाऊन मिळाली.

आता हे उपदव्याप करुन देखील गायकर लढत राहिले, जनतेने त्यांना बळ दिले. मग भाजपने अखेरचे शस्त्र काढले. ते म्हणजे इडी सरकार स्थापन होते कोठे नाहीतर भाजपकडून अधिकार्‍यांना आदेश गेले. त्यांनी गायकर साहेबांसह त्यांच्या समर्थनार्थ असणार्‍या अकोल्यातील पतसंस्थांना नोटीसा काढल्या.  ह्या पतसंस्था कोणत्या आहेत? ज्यांनी दुधसंघ, कारखाना, अगस्ति कॉलेज यांना वेळोवेळी कर्जपुरवठा केला आहे. यांचे तोंड दाबले म्हणजे या तिन्ही बहुजन नेत्यांचा श्वास बंद होईल. मग ही पद्धत वापरली. पण, दुर्दैवाने हे लोक खचले नाही. कारण, ही शरदचंद्र पवार साहेबांची लेकरं आहेत. त्यांनी चौकशांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. पण, कारखाना ताब्यात द्यावा म्हणून खेळलेल्या चालीला त्यांनी भिक घातली नाही. गेली 40 वर्षे या तालुक्यात राष्ट्रवादीची सत्ता होती. तेव्हा ना कधी कोण्या पत्रकाराच्या विरोधात तक्रार झाली. ना सरकारने चौकशी केली. मात्र, आता इडी सरकारच्या जोरावर लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न होत असेल. किंवा संविधानाला झुगारून कोणी हिटलरशाहीचा अवलंब करीत असेल. तर, अशा भाजपला बळ द्यायचे का? याबाबत अकोले तालुक्यातील सुज्ञ जनतेने विचार करून निर्णय घेतला पाहिजे. 

बदनामीचे षडयंत्र..! 

1) परिवर्तन मंडळाचे व्यासपिठ

2) नगरपंचायतीत धोतर फिरविले

3) पिपळगाव खांड पाण्याहून अपप्रचार

4) कारखान्यात चौकशी लावली

5) ऐज्युकेशन संस्थेत राजिनामा घेतला..

6) जुन्या क्लिपा व्हायरल करुन बदनामी..

7) जिल्हा बँकेत चौकशी लावली

8) अगस्तिसह 3 पतसंस्थांच्या चौकशी लावल्या

9) कारखान्यातील सर्व गायकरांवर लोटून मोकळे

10) आमदारांशी नव्हे, गायकरांशी वारंवार पंगा

11) सातत्याने आरोप प्रत्यारोप सुरू आहेत..